Monday, 15 February 2016

मुस्लमान आणि आम्ही। विचार तर कराल।

दि. ०५-०२-२०१६ च्या वृत्तपत्रांमधील बराक ओबामा यांनी व्यक्त केलेले विचार जागतिक नेतृत्वाला मार्गदर्शक आणि दिशा देणारे ठरू शकतात. ‘अमेरिका इस्लामला दडपण्याचा प्रयत्न करीत नाही हे दर्शवून देणे हा दहशतवादाविरोधात लढण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे’, हे ओबामांचे उद्गार अतिशय महत्त्वाचे आहेत. इस्लामला विश्वासात घेतल्याशिवाय या लढ्यात आपल्याला त्यांचे भरीव सहकार्य घेता येणे शक्य नाही. मुसलमानांच्या मनांमध्ये  सुरक्षितता निर्माण करण्याची जबाबदारी आपणच पार पाडली पाहिजे. मुसलमानांना ते वेगळे आहेत हे जाणवून देणाऱ्या आपल्या कृती आणि उक्ती देशाला  हितावह नाहीत, हे आपण समजून घेतले पाहिजे. मुसलमानांकडे पूर्वग्रहदूषित दृष्टीने बघणे आपण आता सोडले पाहिजे. या पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनामुळे सर्वसामान्यांकडून काही चुकीच्या गोष्टी घडतात. आणि त्यातून मुसलमान युवकांमध्ये वैफल्याची भावना निर्माण होऊ शकते. या वैफल्यग्रस्त युवकांना भरकटत नेण्यासाठी काही दुष्ट शक्ती टपलेल्याच आहेत. आपल्या हातून त्यांना मदत होणार नाही, याची आपण काळजी घेणे आवश्यक आहे.
आज मुसलमान मोकळेपणाने व्यक्त होतात असे दिसत नाही. देशात घडणाऱ्या विविध घटनांबद्दल त्यांना काय वाटते हे समजून घेण्याची आपल्यालाही गरज वाटत नाही. किंवा त्यांना या घटनांबद्दल काय वाटते हे आपण आपल्या मनानेच निश्चित करीत असतो. एखाद्याने आपली अस्वस्थता थोडी जरी व्यक्त करण्याचा प्रयत्न केला तरी सर्व समाजमाध्यमे त्याच्यावर तुटून पडतात.त्यामुळे त्यांच्यामधील अस्वस्थतेमध्ये अधिकच भर पडते. कोणत्याही घटना, विचार याविषयी मुस्लिमांचाही काही विशिष्ट दृष्टीकोन असू शकतो, हे आपण का लक्षात घेत नाही? हा दृष्टीकोन आपण समजून घेण्याची आता  गरज निर्माण झालेली आहे. मुसलमानांमधील एखाद्या विघातक प्रवृत्तीवरून अखिल मुसलमान समुदायाला धारेवर धरायला आपल्याला आवडते. त्यमुळे या समुदायात किती अस्वस्थता निर्माण होत असेल याचा विचारही आपण करीत नाही. जणू काही हा समुदाय म्हणजे शत्रू ग्रहावरील निराळी वस्ती आहे.
सर्वसामान्य मुस्लिमांची आर्थिक अवस्था आपल्या कोणापासूनही झाकलेली नाही. त्याबद्दल आपल्याला कधी सहानुभूती वाटल्याचे दिसत नाही. सच्चर आयोगाचे कोणी नावही काढत नाही. असे का होते, याचा गंभीरपणे विचार करण्यची गरज आहे. मुस्लिमांमधील काही अपप्रवृत्ती  या त्यांच्यातील आर्थिक दारिद्र्याचीही उपज नसेल काय?

मुसलमान हे आपल्या देशाचे अपरिहार्य घटक आहेत, हे आपण मनातून स्वीकारण्याची आवश्यकता आहे. कारण त्यांना वगळून आपल्याला आपल्या देशाची कल्पना करता येणार नाही. धर्मावर आधारित द्विराष्ट्रवादाच्या भावनेला आपण थारा देता कामा नये. देश सुदृढ व्हायचा असेल तर देशाचा प्रत्येक घटक स्वस्थ असणे आवश्यक आहे. मुसलमानांना सोडून आपल्याला देशाची उभारणी करता येणार नाही. मुसलमानांनीही या देश उभारणीच्या कामात मनातून सहकार्य करण्याची वेळ आलेली आहे. त्यासाठी मुसलमानांनीही त्यांच्यातील विघातक प्रवृत्तींचा सक्रीय निषेध करून अशा प्रवृत्तींना  हतोत्साहित करण्याची गरज आहे. हिंदू-मुसलमान या दोन्हीही समुदायांनी एकमेकांकडे सकारात्मक दृष्टीने बघितले पाहिजे आणि देशाच्या उभारणीत एकमेकांना हात दिला पाहिजे.