Tuesday 19 July 2022

  नवा भारत घडविण्यासाठी,--

1) अवाढव्यतेचे प्रदर्शन(सरदार पुतळा, अशोक स्तंभ),
2) आक्रमकता (परधर्मीय व विरोधकांच्या बाबतीत, उदाहरणार्थ बुलडोझर संस्कृती. पाकिस्तान किंवा चीनच्या बाबतीत नव्हे),
3) आकर्षकता (बाह्यांगी), आरासवृत्ती (दिखाऊ सजावट),
4) देशभक्तीचे कर्मकांड(देशभक्तीच्या Essence कडे दुर्लक्ष करून म्हणजे आपल्या वर्तनातून देशहित साधण्याच्या वृत्ती निर्माण करणे किंवा अशा वृत्तीला प्रोत्साहन देणे याऐवजी घरांवर ध्वज लावणे, जवांनाना दिवाळी निमित्त पत्र किंवा संदेश पाठविणे या बाबींचा पुरस्कार. हे आवश्यक असले तरी त्यापेक्षा जवानांच्या आर्थिक व सेवांतर्गत समस्या सोडविणे अधिक महत्त्वाचे ठरावे),
5) कोणत्याही घटनेला, तिच्या आत्म्याकडे दुर्लक्ष करून, समारंभाचे स्वरूप आणणे( कोविडचाही इव्हेंट करणे)
6) कोणत्याही घटनेला, व्यक्तीला किंवा योजनेला संबोधण्यासाठी संस्कृतप्रचुर आणि भारून टाकणाऱ्या, पण पोकळ शब्दांचा वापर(अग्निपथ, अग्निविर, दिव्यांग. जहां संस्कृत भाषा है, वहीं संस्कृति है। जेपी नड्डा)
7) सांस्कृतिक किंवा धार्मिक प्रतिकांचा सढळ वापर,(शासकीय कार्यक्रमात पूजा अर्चा, राफेलला लिंबू मिरची बांधणे)
8) गुंगी किंवा नशा आणणारी शब्दयोजना करून, प्रसंगी ड्रामा करून, जागतिक परिप्रेक्षात प्रतिष्ठा वाढल्याची खोटीच बतावणी करून, त्यासाठी मीडियाचा सक्षम वापर करून वास्तविक अशा आर्थिक- सामाजिक प्रश्नांपासून जनतेचे लक्ष विचलित करणे,
9) दुसऱ्यांना तुच्छ लेखनारा किंवा त्यांचा द्वेष करणारा स्वश्रेष्ठत्वाचा गर्व,
10) कडवा राष्ट्रवाद(दुसऱ्याच्या द्वेषावर आधारित असलेले स्वश्रेष्ठत्व व स्वदेशप्रेम)
11) दुसऱ्याची रेघ छोटी करून स्वतःची मूळातील छोटी असलेली रेघ मोठी असल्याचे दाखविणे,
12) प्रत्येक कार्यक्रम, योजना, भाषणे यांत आवर्जून दिखावा ( फोटो सेशन करून Show off करणे),
13) विद्वान नसले तरी लालची आणि चापलुसी करणाऱ्यांनाच देशातील महत्त्वाच्या पदांवर आरुढ करणे,
14) कोणत्याही समस्येचे सुलभीकरण करून तिचे उत्तरही सुलभ करून जनतेसमोर मांडणे(नोटाबंदीने भ्रष्टाचार नाहीसा होईल व काळा पैसा बाहेर येईल),
15) आपल्या अजेंड्यात अडथळे आणणारे महापुरुष, विचार, ऐतिहासिक घटना, लोकसमूह यांची बदनामी करणाऱ्या तद्दन खोट्या गोष्टींचा जनतेवर रेटून आत्मविश्वासाने आणि वारंवार भडिमार करणे आणि आपल्याला सपोर्ट न करणारा किंवा प्रतिकूल इतिहास योजनाबद्ध रीतीने पुसून काढणे, उदाहरणार्थ अभ्यासक्रमांत तसा बदल करणे)
16) सामान्य जनतेवर प्रभाव टाकण्यासाठी राजकीय व शासकीय कार्यक्रमांत धार्मिक कर्मकांडांचा अंतर्भाव,
17) ठोस कार्यक्रमांचा आधार नसलेले पोकळ, पण आकर्षक असे आदर्श,
18) आदर्शांची दहशत( धार्मिक-सांस्कृतिक प्रतीकांची व विचारांची परखड चिकित्सा करणाऱ्यांना कारावासात टाकणे ),
19) जनमान्य महापुरुषांचे विकृतीकरण करून अपहरण करणे किंवा त्यांचे प्रतिमाभंजन करणे उदाहरणार्थ सरदार हिंदुत्ववादी आणि नेहरुंचे विरोधक असल्याचे दाखविणे; सुभाषचंद्र बोस समाजवादी व हिंदू-मुसलमान एकतेचा पुरस्कार करणारे होते आणि भगतसिंग कट्टर नास्तिक होते, हे लपविणे)
20) घटनात्मक संस्था आणि इतर महत्त्वाच्या संस्था गलिच्छ अशा पक्षकार्यासाठी वापरणे,
21) विरोधी शक्ती, मग ते पक्ष असो की कार्यकर्ते असो की विचारवंत असो, त्यांना विविध मार्गांनी (पक्ष फोडणे, गुन्ह्यांत अडकविने, पद व पैसा यांचा मोह दाखविणे किंवा त्यांच्या मालमत्ता व जिविताची भीती दाखविणे किंवा सातत्याने बदनामीची मोहीम चालविणे) शक्तिहीन करणे(उदाहरणार्थ इडी, आयकर विभाग यांची कार्यवाही,अर्बन नक्षलवादी ठरविणे) आणि आता देश चालविण्यासाठी दुसरा पर्यायच नाही,हे लोकांच्या मनावर बिंबवणे
22) सामान्य लोकांचे हित ज्यांत आहे, त्या बाबींऐवजी इतर गोष्टींकडे, उदा. धार्मिक बाबी, जनतेचे लक्ष वेधून घेणे व त्यांना त्या नशेत ठेवणे (झोपलेल्या लोकांना जागे करता येईल; पण नशेतील लोकांचे काय करायचे?)
23) जनतेला नशेत ठेवून किंवा त्यांच्यापुढे सवलतीचे तुकडे टाकून (एखादे पद किंवा मानसन्मान देणे, इंधन दर आधी 10 रुपयांनी वाढवून ते पुन्हा 5 रूपयांनी कमी करणे, निम्न वर्गांतील लोकांच्या खात्यात काही तुटपुंजे पैसे टाकणे, तेही विशेष करून निवडणुकीच्या तोंडावर) उद्योगपतींसाठी सत्ता राबविणे. वर देशाची प्रगती करण्यासाठी हे आवश्यक आहे, हे जनतेच्या मनावर ठसविने
24) लोकांमध्ये धार्मिक सांस्कृतिक वर्चस्वाची भावना ठसविने व त्याआधारे त्यांना वैर करण्यास प्रोत्साहित करणे.
याच बाबी आवश्यक आहेत काय?
यापैकी काही बाबी पूर्वींच्या सरकारांनीही केल्या असतील; पण ही बाब आताच्या सरकारच्या वरील धोरणांचे समर्थन म्हणून वापरणे, हा मूर्खपणा आहे, कारण कोणाकडूनही घडलेल्या वरीलसारख्या कृती आदर्श नाहीत.