Thursday 30 May 2013

नजिकच्या भूतकाळात कोणताही वारसा नसताना शिवाजी महाराजांनी 'प्रजाहित' हे राजाचे आद्य कर्तव्य मानले.आणि अत्यंत धामधुमीच्या काळातही त्याचे कटाक्षाने पालन केले.  महाराजांच्या आज्ञापत्रावरून त्यांच्या प्रजाहितदक्षतेचा स्पष्टपणे प्रत्यय येतो.

महाराजांच्या नंतर दुर्दैवाने नंतरच्या राज्यकर्त्यांमध्ये हा पैलू क्वचितच  दिसून येतो . याला एक स्पष्ट अपवाद आहे. 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर' हा तो सन्माननीय अपवाद होय.

अतिशय बिकट परिस्थितीत राज्यकारभार हाती घेऊन त्यांनी जी प्रजाहितदक्षता दाखविली, ती त्यांचे असामान्यत्व स्पष्ट करते, यात शंका नाही.

आज त्या पुण्यश्लोक व्यक्तित्वाची पुण्यतिथी. त्या निमित्त त्यांना भावपूर्ण वंदन करण्याची संधी घेतो. 

Saturday 25 May 2013

आज बुद्ध पोर्णिमा अर्थात बुद्ध जयंती साजरी करण्यात येत आहे.
भगवान बुद्ध म्हणजे भारताच्या सामाजिक आणि आध्यात्मिक जीवनातील सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्व. सामाजिक समता व विचारांची स्वतंत्रता हे त्यांच्या विचारविश्वाचे महत्त्वाचे पैलू आहेत. जागतिक तत्त्वज्ञानाचा इतिहास भगवान बुद्धांच्या तत्त्वज्ञानाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, हे जाणकारांना मान्य आहे.
वेदोक्त कर्मकांडाच्या पार्श्वभूमीवर भगवान बुद्धांनी पुरस्कृत  केलेला   विशुद्ध जीवनाचा आग्रह हा आजच्या जीवनातही उपयुक्त ठरतो.

"बुद्ध भारताचा सर्वश्रेष्ठ पुरुष असल्याबद्दल भारतीय व पाश्चात्य विद्वानांमध्ये दुमत नाही." या शब्दांत प्रसिद्ध प्राच्यविद्यापंडित श्री शरद पाटील भगवान बुद्धांचा यथार्थ गौरव करतात.

बुद्ध पौर्णिमेनिमित्त भगवान बुद्धांप्रती कोटी कोटी प्रणाम. 

Thursday 23 May 2013

अतिरेकी सकारात्मकतेची परिणती  कटू वास्तवाकडे दुर्लक्ष करण्यात होऊ शकते.त्यामुळे आपली फसगत   होण्याची शक्यता असते. कटू वास्तवाकडे लक्ष वेधणे म्हणजे नकारात्मकता नव्हे. उलट त्यामुळे  नियोजन व डावपेच बदलण्याची जाणीव होते  आणि तसा बदल करण्याची संधीही उपलब्ध होते.  त्यासाठी ---

सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याबरोबरच वास्तवाकडे किंचितही दुर्लक्ष होऊ नये, असे मला वाटते. 

Tuesday 21 May 2013




जिथे आभाळच फाटले आहे, तिथे ठिगळे काय लावताय?

ठिगळे लाऊन स्वत:चे समाधान करून घेता काय ?

ठिगळे लावण्यालाही कोणाची हरकत असण्याचे कारण नाही.

पण आपल्याला आभाळ शिवायचे आहे, याची जाणीव ठेवा .

म्हणजे, आभाळ शिवण्याला ठिगळाचे योगदान लाभेल.

Saturday 18 May 2013

"ज्या प्रमाणे जिभेवरील मध किंवा विष चाखल्यावाचून राहत नाही, त्याप्रमाणे राजाच्या खजिन्यात वावरणाऱ्याकडून थोडातरी पैसा खाल्यावाचून राहणे शक्य नाही. पाण्यात राहणारे मासे पाणी केंव्हा पितात हे जसे कळत  नाही, तसे कामावर नेमलेले अधिकारी पैसे केंव्हा खातात, हे कळणे  शक्य नाही." 

हा अर्थ आहे कौटिल्याच्या 'अर्थशास्त्र' या साडे तेवीसशे वर्षापूर्वी लिहिलेल्या ग्रंथातील एका श्लोकाचा. 

मूळ श्लोक असा आहे. 


यथा हि अनास्वादयितुं न शक्यं जिव्हातलस्थं मधु वा विषं वा|

अर्थस्तथा हि अर्थचरेण राज्ञ:स्वल्पोअपि अनास्वादयितुं न शक्य:|
मत्स्या यथाअन्त: सलिले चरन्तो ज्ञातुं न शक्या: सलिलं पिबन्त:। 

Thursday 16 May 2013

आपल्या देशात विविध जाती,धर्म, संप्रदाय, कुळ, वर्ण, विचारधारा, परंपरा, इतिहास, आदर्श असलेले लोक राहतात. या विविधतेचा आपल्याला अभिमानही वाटतो. तथापि या विविधतेमुळे आपले कुठल्याच  विषयावर एकमत होत   नाही. प्रत्येक गोष्ट म्हणजे कोणतीही  घटना, इतिहास पुरुष , विचारधारा, परंपरा, विविध  संकल्पना,आपले ध्येय , आपला इतिहास इत्यादी बाबीकडे आपण  वर उल्लेखित चष्म्यातूनच बघत असतो. त्यामुळे आपले वरील  बाबतींमध्ये तीव्र मतभेद असतात. मानव प्राणी बुद्धिमान आहे. मतभेद स्वाभाविक आहेत. परंतु वरील  चश्म्यामुळे आपल्यांमध्ये अगदी साध्या साध्या विषयावरही टोकाचे मतभेद होतात. श्री चाक्रधरांचे एक  वचन आहे. " मनुष्य मात्र होवोनि असावे " थोडक्यात, सर्व चष्मे टाकून देऊन सर्व माणसाचा  फक्त मनुष्य म्हणुन विचार करावा.

या कृत्रिम मतभेदांमुळे आपल्या कुठल्याच चळवळी किंवा आंदोलने सर्वसमावेशक बनत नाहीत किंवा पुढे तसे चालू राहत नाहीत. याला याला एकाच उपाय --- मनुष्य  मात्र होवोनि असावे. ------पण  कसे ?
भर्तृहरी हा प्रथितयश कवी व विद्वान होता. त्याच्या कालावधीबाबत अनेक  मतभेद आहेत. तरी तो एक हजार वर्षापूर्वी होऊन गेला, या बाबतीत विद्वानांमध्ये एकमत दिसते. उज्जैन नगरीचा हा राजा त्याच्या शतकत्रयासाठी   प्रसिद्ध आहे. एक नीतिशतक,दुसरे शृंगारशतक तर तिसरे वैराग्यशतक होय.  त्यातही त्याचे सुलभ व लालित्यपूर्ण  भाषेतील नीतिशतक विशेष  प्रसिद्ध आहे. ते संस्कृत भाषेत असून सुंदर विचारांनी परिप्लुत आहे.

भर्तृहरीने  आपल्या शतकत्रयामधून  जीवनविषयक तत्त्वज्ञान अगदी सोप्या भाषेत मांडले आहे. भर्तृहरीच्या नितीशतकातील असाच एक मनोरंजनात्मक परंतु जीवनविषयक अनुभव मांडणारा एक श्लोक मी खाली देत आहे.
"यां चिन्तयामि सततं, मयि सा विरक्ता |
सापि अन्यं इच्छति जनं, स जनो अन्य असक्त:|
अस्मत्कृत्ये च परितुष्यति काचिदन्या |
धिक् तां च तं च मदनं च इमां च मां च |

अर्थ : जिचा मी नेहमी विचार करतो, ती माझ्याबद्दल उदासीन आहे. ती दुसऱ्याच मनुष्यावर प्रेम करते. आणि तो दुसरा मनुष्य मात्र आणखी कोण्यातरी दुसरीचाच विचार करतो. माझ्यावर कोणीतरी तिसरीच प्रेम करते.
या वर भर्तृहरी म्हणतो- तिचा , त्याचा , प्रेम भावनेचा , हिचा आणि माझाही धिक्कार असो.

हा अनुभव किमान एक हजार वर्षापूर्वीचा आहे बरं . 

Tuesday 14 May 2013


आज आद्य शंकराचार्य यांची जयन्ति. अद्वैत तत्त्वज्ञानाचे श्रेष्ठ प्रणेते . वेदांत तत्त्वज्ञान अतिशय प्रगल्भ आणि तर्कप्रतिष्ठित बनविण्यात शंकराचार्यांचा   वाटा फार मोठा आहे. तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात ९० % हून अधिक लोक अद्वैत तत्त्वज्ञानाचे अनुयायी आहेत, यावरून भारतीय तत्त्वज्ञानावरील त्यांचा प्रभाव स्पष्ट होतो.
"सर्व खलु इदं ब्रह्म"  (सर्व विश्व ब्रह्मस्वरूप आहे); "अहं ब्रह्म अस्मि"(मी ब्रह्म   आहे) ; या सारख्या सुत्राद्वारे  त्यांनी जीव आणि जगत हे ईश्वर स्वरूप मानले. वेदांताची पद्धतशीर मांडणी करण्याचे त्यांचे कार्य त्यांची प्रकांड बुद्धिमत्ता सिद्ध करते.
वयाच्या आठव्या वर्षी गृहत्याग करून त्यांनी संपूर्ण भारत वर्षात आपल्या तत्त्वज्ञानाचा परिणामकारकरित्या        
प्रचार आणि प्रसार केला.
सन ७८८  ते  ८२० या केवळ 3२ वर्षांच्या या  अल्प कालावधीत त्यांनी केलेले कार्य विस्मयकारक आहे, यात शंका नाही.
धर्म प्रचारासाठी त्यांनी भारताच्या चार कोपऱ्यामध्ये  चार मठ स्थापन केले. १. द्वारका २. पुरी ३. बद्रीनाथ ४. रामेश्वर .
अद्वैत तत्त्वज्ञानाच्या रूपाने त्यांनी समतेच्या तत्त्वाला आध्यात्मिक व तत्त्वज्ञानाचे अधिष्ठान पुरविले, असे मला वाटते .

डॉ . कमल  गोखले यांनी 'शिवपुत्र संभाजी' या संशोधनात्मक ग्रंथाद्वारे संभाजी राजे यांचा जीवनपट समर्थपणे उलगडून दाखविलेला आहे. राजे संभाजी यांच्याविषयी बरेचशे समज - गैरसमज या पुस्तकामुळे दूर होण्यास मदत झालेली आहे .हा ग्रंथ पूर्णपणे ऐतिहासिक साधनावर आधारित आहे.
 संभाजी राजे अतुलनीय शौर्यवान  होते , यात शंका नाही. पण ते विद्वान होते, हेही सिद्ध झालेले आहे.
त्यांच्या ऐतिहासिक बलिदानामुळे त्यांचे धाडस, सहनशक्ती, स्वाभिमान(धर्माभिमान म्हणजे स्वाभिमानच.) प्रखरपणे समोर आले.
त्यांच्या बलिदानामुळे मराठ्यांच्या मनात जी आग पेटल्या गेली, ती कित्येक वर्षे ज्वलंत राहिली. शिवाजी महाराजांचे स्वप्न पूर्ण होण्यात या बलिदानाचे योगदान फार महत्त्वपूर्ण राहिलेले आहे.
त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना सादर प्रणाम. 

Monday 13 May 2013

आज वेदांतावरील शंकराचार्यानंतरचे समर्थ भाष्यकार रामानुजाचार्य 

यांची जयंती. त्यांनी प्रथमच सामन्यांच्या भक्तिला वेदांताचा भाग 

बनविले. " विशिष्टाद्वैत " हा त्यांचा वेदांतावरील सिद्धांत. सोप्या 

पद्धतीने वेदांत सांगणारे हे आचार्य होते. अकरावे शतक हा त्यांचा 

कालावधी. प्रत्येक व्यक्ती ही बरे वाईट कर्म करण्यास स्वतंत्र असून

 फळ भोगण्यास मात्र परतंत्र आहे. म्हणजे त्याच्या कर्माचे चांगले वाईट 

फळ ईश्वर देतो. थोडक्यात, व्यक्ती चांगले काम करून आपले 

चिरकालीन भविष्य उज्ज्वल बनवू शकते , हे त्यांचे मत प्रत्येकास

 व्याक्तीविकासाची हमी देते . त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना सादर 

अभिवादन.
आज महात्मा बसवेश्वर यांची जयंती . 

बाराव्या शतकात कर्नाटक प्रांतात होऊन गेलेले महात्मा बसवेश्वर हे भगवान बुद्ध यांच्या नंतरचे त्या श्रेणीचे दुसरे समाज व धर्म क्रांतिकारक असले पाहिजेत , असे त्यांच्या या क्षेत्रातील कार्यावरून वाटते. 
धार्मिक व सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य अतुलनीय स्वरूपाचे असेच आहे . 
त्यांनी ---
* जातिभेदाला कृतीशील विरोध केला. 
* बहुदेवपूजा, कर्मकांड, व्रत्वैकल्य,बलीप्रथा,अंधश्रद्धा यांचा प्रखर निषेध केला.
* आंतरजातीय विवाह, विधवा विवाह यांचा सक्रिय पुरस्कार केला.
त्यांनी स्थापन केलेली सर्व जातीधर्माच्या तसेच पुरुषांबरोबरच स्त्रियांनाही आपले विचार , चिंतन मोकळेपणे मांडण्यास मुक्तद्वार देणारी "अनुभवमण्टप " ही संस्था आधुनिक लोकशाही संसदेचे मध्ययुगीन बीज वाटते.

" कायकवेकैलास "(Work is Heaven ) हा त्यांचा श्रमाला प्रतिष्ठा देणारा व श्रमाचा पुरस्कार करणारा महामंत्र त्यांचे वेगळेपण अधोरेखित करतो.

महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम.

Thursday 9 May 2013

विज्ञानाचा नितीमत्तेशी काहीही संबंध नसतो. याचा अर्थ विज्ञानातून नीतीला समर्थन मिळत नाही. तसेच विज्ञानाचा नीतीला विरोधही नसतो. थोडक्यात, विज्ञान हे नितिनिरपेक्ष असते. 
त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोनही नीती-अनीती निरपेक्ष कार्यरत राहतो. 

उदार अर्थव्यवस्था ही आर्थिक विकास करण्यासाठी प्रत्येकाला स्वातंत्र्य तसेच संधीची उपलब्धताही करून देते. आर्थिक विकासाला ती प्रतिष्ठा निर्माण करून देते. तसेच व्यक्तीमध्ये आर्थिक विकासाची प्रेरणाही निर्माण करते.

उदार आर्थिक व्यवस्था ही आर्थिक विकासाबरोबरच चंगळवादी प्रवृत्ती निर्माण करते. आणि त्यातूनच शोषणही वाढत जाते. कोणत्याही परिस्थितीत आर्थिक विकास हेच माणसाचे ध्येय बनून जाते. साहजिकच या प्रक्रियेत नितीमत्तेला फारसे महत्त्व राहत नाही.

सध्याचे युग हे वैज्ञानिक दृष्टिकोनाचे तसेच उदार अर्थव्यवस्थेचे आहे. त्यामुळे या युगात नीतीला फारसे स्थान नाही. नीतीचे समर्थन करणारे कोणतेही तत्त्वज्ञान/ विचारधारा समाजाला मार्गदर्शन करण्यास समर्थ ठरत नही.

प्रगतीचे भौतिक व सांस्कृतिक असे दोन अंग असतात. या दोन्हीही अंगांचा समतोल विकास होण्यातूनच प्रगती पूर्णत्वाला जाते. सध्या भौतिक प्रगतीला सीमा नाही. तथापि सांस्कृतिक प्रगतीचे काय ? आणि त्यातून निर्माण होणाऱ्या शोषण, द्वेष, संघर्ष यांचे काय ?

Monday 6 May 2013

जनतेला खऱ्या अर्थाने सुशिक्षित करण्यातूनच देशापुढील /समाजापुढील समस्या नष्ट होण्यास सुरुवात होईल.

जनतेला परिणामकारकरित्या  सुशिक्षित करण्याची सुरुवात प्राथमिक शिक्षणापासूनच होते, असे मला वाटते.

त्यासाठी शासनाने प्राथमिक शिक्षणावर , ते आता जितका खर्च करते, त्याच्या ५० पट अधिक खर्च केला पहिजे.

मुलांना शिक्षण देताना वैज्ञानिक दृष्टिकोन , सामाजिकता , नैतिकता, सृजनशीलता  इत्यादि  बाबी शिकविण्यावर  भर दिला पाहिजे . त्यासाठी अभ्यासक्रमात मूलगामी सुधारणा करणे आवश्यक आहे .

प्राथमिक शिक्षकासाठीची योग्यता आणि त्याला दिले जाणारे वेतन व सुविधा यात अनेकपट वाढ करणे अपेक्षित आहे .

पुढे चालून विद्यार्थी 'प्राथमिक शिक्षक' ही आपल्या करीयरची एक महत्त्वाची संधी मानतील , एवढी प्राथमिक शिक्षकाची योग्यता वाढविण्याची गरज आहे.

"शिक्षण सेवक" या संकल्पनेने प्राथमिक शिक्षणाचा बट्ट्याबोळ करण्यात मोठे योगदान दिलेले आहे , असे मला प्रामाणिकपणे वाटते .