Monday 26 October 2015

चरित्रनायक समजून घेताना-

कोणत्याही महापुरुषाचे चरित्र लिहिताना चरित्रकाराने तटस्थता तर बाळगलीच पाहिजे. त्यासोबतच तो चरित्रविषय असलेल्या महापुरुषाशी समरसही व्हायला पाहिजे. तटस्थता बाळगल्यामुळे तो त्या महापुरुषाचे विचार, कृती, उक्ती यांचे योग्य असे  मूल्यमापन करण्यात यशस्वी ठरू शकतो. आणि समरसतेमुळे त्या महापुरुषाने व्यक्त केलेले विचार व केलेल्या कृती कोणत्या विशिष्ट सामाजिक-राजकीय-आर्थिक  अवस्थेत आणि कोणत्या मानसिक अवस्थेत केलेल्या आहेत याचे आकलन चरित्रकाराला होऊ शकते. कोणत्याही महापुरुषाच्या उक्ती-कृतीला त्या त्या देश-काळ-स्थितीच्या मर्यादा असतातच. चांगला चरित्रकार महापुरुषाच्या उक्ती-कृतीची मांडणी-वर्णन-मूल्यमापन करताना त्या त्या वेळची सामाजिक-राजकीय-आर्थिक अवस्था व त्या महापुरुषाची मानसिक अवस्था पार्श्वभूमीवर ठेवतो. त्यामुळे वाचकाला त्या महापुरुषाचे आकलन योग्यप्रकारे होते. शाहू महाराजांचे चरित्र लिहिताना त्या काळाची राजकीय स्थिती लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण महाराजांना विशिष्ट राजकीय स्थितीच्या मर्यादेत आपले काम करावे लागलेले आहे. सावरकरांचे चरित्र लिहिताना सावरकरांची जन्माठेपेमुळे जी मानसिक अवस्था झालेली होती, ती लक्षात घेतलीच पाहिजे. म्हणजे त्यांच्या माफिनाम्याचाही अर्थ लागू शकतो तसेच त्यांचा माणूसघाणेपणाही समजून घेता येतो. फुल्यांचे चरित्र लिहिताना त्यांच्या शिक्षण व ज्ञानाच्या मर्यादा आपण लक्षात घेतल्याच पाहिजेत. ते ज्या वातावरणात वाढले होते त्या वातावरणात तेवढी ज्ञान-साधणे त्यांना प्राप्त होणे शक्य नव्हते. किंवा अशी ज्ञान-साधणे मिळाली असती तरी त्यांना प्राप्त परिस्थितीत त्यांचा वापर करता आला असता काय? हे जर आपण समजून घेतले तर इंग्रजी सत्तेची वास्तविकता त्यांना समजली नाही ही बाब आपल्याला समजावून घेता येते. समाजातील सर्वात तळाशी असलेल्यांच्या उद्धाराची त्यांची तळमळ आपण समजून घेतली तर असा उद्धार करण्यासाठी इंग्रजी सत्ता अधिक अनुकूल होती, हे आपणास मान्य करावे लागेल. आणि मग इंग्रजी सत्तेविषयीची त्यांची आपुलकीही आपणास समजू शकते. मध्ययुगीन संतांची चरित्र लिहिताना संतांना असलेल्या त्या काळाच्या मर्यादा आपण लक्षात घेतल्याच पाहिजेत. आताच्या सामाजिक सुधारणांची त्यांच्याकडून अपेक्षा करणे चुकीचेच ठरेल. संतांकडून त्या काळात बुद्धिवाद, इहवाद यांची अपेक्षा करणेही  अवाजवीच म्हणावे लागेल. उगीचच आधुनिक मुल्ये त्यांना चिकटवणे अनैतिहासिकच म्हणावे लागेल. अशी मुल्ये त्यांच्या चरित्रात दाखविता आले नाहीत म्हणून  संत छोटेही ठरत नाहीत.
या दृष्टीने विचार करता धनंजय कीर हे चरित्रकार सर्वात उजवे ठरतात, असे मला वाटते. महात्मा फुले, शाहूमहाराज, बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर यांना खऱ्या अर्थाने समजावून घ्यायचे असेल तर कीरांच्या चरित्रांना पर्याय नाही, असे मला वाटते. त्यांची चरित्रे वाचताना चरित्रनायक गुण-दोषांसहीत आपल्यासमोर स्पष्ट होतात. ही चरित्रे वाचताना आपणामध्ये  या चरित्रनायकांचे दोषही समजावून घेण्याची क्षमता निर्माण होते.
जाता जाता-

वरील पार्श्वभूमीवर आपण चरित्रनायकांना देवत्व बहाल करून या देवतांना एकेका जातीमध्ये बंद करून त्यांच्या आकलनाचे  मार्गच बंद करीत नाहीत काय?

Sunday 18 October 2015

ब्राह्मणेतरांमध्ये प्रामुख्याने दोन गट पडतात. एक गट स्थितीवादी आहे. ते आर्थिकदृष्ट्या बऱ्या स्थितीत असतात किंवा सामाजिक इतिहासाविषयी बऱ्यापैकी अनभिज्ञ असतात. दुसरा गट बंडखोर आहे. इतिहासाची थोडीफार तरी जानकारी यांना असते. हे क्रियाशील असतात. पण यांची क्रियाशीलता इतकी तीव्र असते की ते चटकन टोकाच्या  निष्कर्षांवर येतात.
१)      स्थितीशील ब्राह्मणेतरांना बहुत्येक वेळा इतिहासातील समांतर प्रवाहाची जाणीव नसते. ते मुख्य प्रवाहातील विचारांनीच प्रभावित झालेले असतात.
२)      दुसऱ्या टोकावरील थोड्या प्रमाणात असलेल्या बंडखोर  ब्राह्मणेतरांचा  ‘इतिहासातील सर्व पापे ब्राह्मणांनीच केलेली आहेत’ यावर पूर्ण विश्वास असतो.
३)      सर्वच ब्राह्मण कावेबाज असतात, याची त्यांना खात्रीच असते. त्यामुळे कोणी ब्राह्मण सद्हेतूनेच केवळ काही विचार मांडत असेल यावर त्यांचा विश्वास बसने शक्य होत नाही.
४)      ब्राह्मणांवर टीकाच करायची असल्याने ते त्यांचे चुकीचे संदर्भ आधारासाठी घेतात. आणि या संदर्भांचा सरळ अर्थ न लावता वाकड्यात घुसतात. त्यांच्या मते हाच त्या संदर्भांचा गर्भितार्थ आहे. खरे तर यांना ब्राह्मणांना अचूकपणे पकडताच येत नाही.
५)      परंपरांना ते आवर्जून विरोध करतात. मग त्या काही वेळा चांगल्या असल्या तरी. त्यासाठी त्या परंपरांचा ते स्व अर्थ साधक असा अर्थ लावतील. बहुजन समाजाने मोठ्या प्रमाणात स्वीकृत केलेल्या काही परंपरांचा ते ब्राह्मण विरोधी असा अर्थ लावतील.
६)      ब्राह्मणेतरांच्या मधील बहुसंख्य ब्राह्मणेतर या बंडखोर ब्राह्मणेतरांना विरोध करतात किंवा उपेक्षा तरी करतात. पुरंदरे प्रकरणात विश्वास पाटील आठवावेत.
७)      अशा बहुत्येक ब्राह्मणेतरांना परंपरेचा भाग व्हायला आवडते.
८)      अशा  ब्राह्मणेतरांना वाद नको असतात. सगळे गोडी गोडी असणे त्यांना निर्धोक वाटते. बहुत्येक करून अशी मंडळी आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असतात. किंवा प्रस्थापित व्यवस्थेत त्यांना आपापल्या जागा प्राप्त झालेल्या असतात.
९)      ब्राह्मणेतरांमधील या फुटीमुळे- जसे सर्वच ब्राह्मण पुरंदरेंना पाठींबा देतात तसे सर्व ब्राह्मणेतर पुरंदरेंना विरोध करीत नाहीत. त्यातील विश्वास पाटलांसारखे काहीजण तर पुरंदरे यांचे कट्टर समर्थकही असतात.
१०)  ब्राह्मणेतरांमधील बंडखोर ब्राह्मणेतर दलित आणि मुस्लीम यांच्याबद्दल बरे बोलत असतात. ब्राह्मणांच्या विरुद्ध लढावयाच्या लढ्यात त्यांना दलित आणि मुस्लीम यांना सोबत घ्यावयाचे आहे. इतर ब्राह्मणेतर मात्र दलित आणि मुस्लीम यांच्याबाबत खाजगीत प्रतिकूल शेरे मारीत असतातच.
११)  बंडखोर ब्राह्मणेतर हे प्राय: हिंदुत्ववादाविरोधी असतात. त्यामुळे हे  हिंदुत्ववादी विचार व विचारवंत यांच्याविरुद्ध तुटून पडतात. हिंदुत्वाची मांडणी करणारे सावरकर किंवा शिवाजी महाराजांची हिंदू राजा अशी प्रतिमा  रंगविणारे  पुरंदरे म्हणूनच त्यांच्या टोकाच्या टीकेचे लक्ष्य ठरतात. मग सावरकरांचे निरातिशय देशप्रेम व इतर गुण  त्यांना महत्त्वाचे वाटणार नाहीत. किंवा शिवचरित्र लोकप्रिय करण्याचे श्रेयही ते पुरंदरेंना देणार नाहीत.

जाता जाता – मला वाटते, ब्राह्मण व ब्राह्मणेतर यांचे एकमेकाविरुद्ध टोकांवर असणे हे क्रिया-प्रतिक्रियांचा खेळ आहे काय? एकाने टोकावर जाऊन क्रिया व्यक्त केली की दुसरा गट दुसऱ्या टोकावर जाणारच. समतोल विचार करताच येणार नाही काय?

Thursday 15 October 2015

ब्राह्मणी दृष्टिकोन म्हणजे दृष्टीचा कोणता कोण?

अनेकांच्या बोलण्यात आणि लिहिण्यात ‘ब्राह्मणी विचार’, ‘ब्राह्मणी दृष्टिकोन’ असे शब्द सहजपणे येतात. परंतु या शब्दांचा नेमका अर्थ काय, याचा फारसा विचार कोणी करताना दिसत नाही. मी अनेक ब्राह्मणेतरांशी या विषयावर बोललो. त्यांना या शब्दांचा काय अर्थ अभिप्रेत आहे, यावर चर्चा केली. अशा चर्चांमधून ब्राह्मणेतरांच्या दृष्टीकोनातून वरील शब्दांचा मला समजलेला अर्थ पुढीलप्रमाणे मांडीत आहे. चुकल्यास क्षमस्व. 
१)      ब्राह्मण बव्हंशी ‘परम्पराभिमानी’ असतात. या देशातील मुख्य समजल्या जाणाऱ्या प्रवाहातील विचार, इतिहास त्यांना प्रिय असतात. समांतर परंपरा, जसे चार्वाक, बुद्ध, बसवेश्वर, चक्रधर, कबीर इत्यादिसारख्यांविषयी ते फारसे प्रेम व्यक्त करीत नाहीत.
२)      ते जातिभेदाचा निषेध करतात, पण हळूच चातुर्वर्ण्याविषयी soft corner व्यक्त करतात किंवा चातुर्वर्ण्याचा नि:संदिग्धरित्या निषेध करीत नाहीत. चातुर्वर्ण्य हे मुळात आदर्श व शास्त्रीय आहे, असे सांगण्याचा मोह त्यांना बऱ्याच वेळा आवरत नाही.
३)      ते बहुत्येक करून हिंदुत्ववादी असतात. यात त्यांना ‘परंपरागत हिंदू माणूस’ अभिप्रेत असतो. यांचा हिंदुत्वाचा पाया बऱ्याच प्रमाणात ‘मुस्लिमद्वेष’ हा असतो.
४)      मनुस्मृतीचा कितीही निषेध करीत असले तरी दुरान्वयाने  तरी मनुस्मृतीचे  गुणगान केल्याशिवाय राहत नाहीत.
५)      लोकप्रिय महापुरुषांना परंपरागत हिंदू म्हणून पाहण्यात त्यांना आनंद वाटतो. उदाहरणार्थ, शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, सरदार पटेल.
६)      जन्माने ब्राह्मण असलेल्या महापुरुषांना ब्राह्मणेतर महापुरुषांच्या तुलनेत, कळत किंवा नकळत, अधिक महत्त्व देऊन जातात.  ज्ञानेश्वरांच्या तुलनेत नामदेवांचे मूल्यमापन करताना कमी पाने खर्च होतात. तसेच रामदासांच्या तुलनेत तुकारामांचे मूल्यमापन करण्यासाठी कमी शब्द पुरतात.
७)      स्वातंत्र्य, समता, बंधुता धर्मनिरपेक्षता इत्यादी मुल्यांचा स्रोतही त्यांना भारतीय इतिहासातच सापडतो. परंतु या मुल्यांचा फारसा आग्रह धरताना मात्र ते दिसत नाहीत.
८)      यातील काहीजण ब्राह्मणांनाही शिव्या देतात. असे वाटते की हे खरोखरच ब्राह्मणी प्रभावापासून मुक्त झालेले आहेत. पण ते शेवटी किंतु-परंतुने आपल्या लिखाणाचा शेवट करतात आणि जे सांगायचे ते सांगतातच.
९)      हे जात्याच हुशार असतात. कोणतेही लिखाण करताना अवाजवी किंवा आक्षेपार्ह शब्द, विधाने टाळूनही वाचकांना जे द्यायचे ते देतातच. असे लिखाण वाचून जो एकंदर प्रभाव निर्माण होतो तो ब्राह्मणेतर किंवा पुरोगामी यांना आवडत नाही. परंतु या प्रभावाला विरोध करण्यासाठी या ब्राह्मणेतरांना अशा लिखाणात नि:संदिग्ध पुरावे मात्र सापडत नाहीत.

पुरंदरे यांच्या शिवचरित्राने जनमानसांत शिवाजी महाराजांची जी हिंदुत्वप्रधान प्रतिमा निर्माण झालेली आहे ती पुरोगाम्यांना व ब्राह्मणेतरांना आवडत नाही. परंतु पुरंदरेंच्या विरोधात बोलताना त्यांना स्पष्ट संदर्भ मात्र सापडत नाहीत. मग ही ब्राह्मणेतर मंडळी आवश्यक असे संदर्भ कुठेतरी शोधण्याचा प्रयत्न करतात. असे करताना काहीतरी चुका करतात. आणि अशा चुका शोधण्यात संजय सोनवणी सारखे आपली विद्वत्ता व बुद्धिमत्ता खर्च करतात.
१०)  दलित-पिडीत-शोषित यांच्याविषयी सहानुभूती व्यक्त करतीलच, पण सामाजिक असंतोषातून निर्माण होणाऱ्या विद्रोहाबाबत मात्र असमाधान व्यक्त करतील. दलितांसाठी देवाचे दार बंद असेल तर ते उघडण्यासाठी बंड न करता वेगळेच मंदिर बांधतील.
११)  हे गांधी-नेहरूवर टीका करायची एकही संधी सोडणार नाहीत, पण त्या त्या वेळी बाबासाहेब आंबेडकरांची आवर्जून स्तुती करतील. परंतु असे करताना बाबासाहेबांचा विद्रोह, प्रभंजन या बाबींना मुळीच  high light  करणार नाहीत.
जाता जाता-
पुरंदरे प्रकरणात पुरंदरेंच्या समर्थनासाठी बहुसंख्य ब्राह्मण मैदानात उतरले असले तरी त्यामध्ये लक्षणीय प्रमाणात ब्राह्मणेतरांचाही समावेश होता. तथापि पुरंदरेंना विरोध करणाऱ्यांमध्ये मात्र एकही ब्राह्मण नव्हता. असे का व्हावे?     

Thursday 8 October 2015

लोकशाही समाजवादाची आवश्यकता.

‘लोकशाही समाजवाद’ हे आपले उद्दिष्ट असल्याचे आपली राज्यघटना उद्घोषित करते. परंतु मुक्त व उदार आर्थिक धोरणांमुळे परिपोषित होणारी व बहुसंख्य विचारवंतांकडून आणि नेत्यांकडून समर्थन प्राप्त असलेली भांडवलशाही सध्या लोकशाही समाजवादाला संदर्भहीन करीत आहे. त्यामुळे आता लोकशाही समाजवादाला फक्त ऐतिहासिक महत्त्वच तेवढे उरले आहे असे वाटत आहे. लोकशाही समाजवाद ही विचारसरणी खरोखरच कालबाह्य झालेली आहे काय, यावर आता गंभीरपणे विचार करण्याची वेळ  आलेली आहे. या विचारसरणीच्या आवश्यकतेविषयी चर्चा करण्यापूर्वी आपण लोकशाही समाजवाद म्हणजे काय, यावर थोडा विचार करूयात.
जगाचा इतिहास हा वर्गसंघर्षाचा असून आता सर्व साधनसंपत्तीची मालकी शोषित-वंचित कामगारांनी घेण्याची वेळ आलेली आहे असे मार्क्सने जाहीर केले आणि मार्क्सवादी तत्त्वज्ञानाचा उदय झाला. मार्क्सवाद अर्थात साम्यवादात केवळ देशातीलच  नव्हे तर जगातील भांडवलाची मालकी तसेच नियंत्रण कामगारांकडे अर्थात समाजाकडे येणे अपेक्षित होते. भांडवलाच्या अशा नियंत्रणातून संपत्तीचे समान वितरण घडवून आणणे हे साम्यवादी विचारसरणीचे अंतिम उद्दिष्ट होते. मार्क्सवादाचे प्रयोग करताना मार्क्सवादाच्या मर्यादा दिसून आल्या. मार्क्सवादाचे ध्येय हे माणसाच्या स्वार्थ व व्यक्तिवाद या मुलभूत प्रेरणेच्या विरुद्ध असल्यामुळे मार्क्सवादाचे अपयश अपरिहार्यच झाले. मार्क्सवादाच्या या उणिवांच्या पार्श्वभूमीवर समाजवादी विचारसरणीचा विकास झाला. यामध्ये प्रथम साधनसंपत्तीची मालकी सरकारकडे असणे अपेक्षित होती; परंतु असे सरकार लोकशाही तत्त्वावर अधिष्ठित असणे अभिप्रेत असते. आपल्या देशातही आपल्या अर्थव्यवस्थेला आकार आणि उभारी देण्यासाठी  पंडित नेहरूंनी रशियन समाजवादी व्यवस्थेकडून प्रेरणा घेतल्याचे दिसते. परंतु हे करताना लोकशाही मुल्ये ही समाजवादी व्यवस्था अंमलात आणण्यासाठी आधार मानली गेली. पंचवार्षिक नियोजनाच्या माध्यमातून पायाभूत क्षेत्रात सार्वजनिक उपक्रमांची स्थापना केली गेली. बँकिंग, रेल्वे, रोड वाहतूक या क्षेत्रात सरकारचे संपूर्ण नियंत्रण आले. एकंदर अर्थव्यवस्थेवर बाजाराच्या नियंत्रणाऐवजी सरकारी नियंत्रण प्रस्थापित झाले.  अशा प्रकारे लोकशाही मूल्यावर अधिष्ठित राज्यव्यवस्थेद्वारे अर्थव्यवस्थेवर संपूर्ण नियंत्रण प्रस्थापित करून साधनसंपत्तीचे समान वितरण घडवून आणण्याचे उद्दिष्ट मानणारी विचारसरणी म्हणजे  लोकशाही  समाजवाद असे सुरुवातीला अभिप्रेत होते. तथापि या प्रकारच्या लोकशाही समाजवादाद्वारे  वरील उद्दिष्ट साध्य करणे आपल्याला फारसे शक्य झाले नाही, हे पुढील काळात सिद्ध झाले. शेवटी सरकारने १९९१ पासून  देशाची आर्थिक स्थिती सुधारणेच्या उद्देशाने आर्थिक सुधारणा राबविण्यास सुरुवात केली. यात खजगी भांडवलाला प्राधान्य, अर्थव्यवहारांवर बाजाराचे नियंत्रण, सरकारी नियंत्रणात शिथिलता आदी उपायांचा समावेश होता. खरे तर अशा सुधारणांचा अवलंब म्हणजे समाजवादाचा त्याग आणि भांडवलशाहीकडे वाटचाल हेच होय. त्यामुळे आपली आर्थिक संकटातून सुटका झाली, असे वाटते. परंतु आर्थिक सुधारणेच्या या काळात गरीब व श्रीमंत यांच्यामधील दरी  वाढलेली आहे. जगातील सर्वांत श्रीमंत अशा १% लोकांकडे २००९ मध्ये एकूण ४४% एवढी संपत्ती होती. २०१४ मध्ये ही संपत्ती ४८% पर्यंत वाढलेली आहे. आपल्या देशातही या बाबतीत अशीच स्थिती आहे. भारतातील १०% उच्चत्तम श्रीमंत वर्गाकडे ७५% एवढी संपत्ती आहे. १०% सर्वोच्च श्रीमान्तांकडे  तळातील १०% लोकांपेक्षा ३७० पट अधिक संपत्ती आहे. दुर्दैवाने ही दरी उत्तरोत्तर वाढत आहे. उत्पन्नाच्या बाबतीतही सर्वोच्च १०% श्रीमंतांच्या उत्पन्नाचा वाटा १९९२ मध्ये २५.३२% होता. तो २०१० मध्ये २७.१६% पर्यत वाढला. या उलट तळातील १०% लोकांचे एकूण उत्पन्न १९९२ मध्ये ३.८४% होते . ते कमी होऊन २०१० मध्ये ३.६३% एवढे झाले. याचा अर्थ हे आकडे गरीब-श्रीमंतांमधील दरी उत्तरोत्तर वाढत असल्याचे दर्शवितात, हे उघड आहे. या वाढत्या दरीमुळे उत्तरोत्तर सामाजिक समतोल बिघडत चाललेला आहे. आर्थिक प्रगती करण्यास प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र आहे या तत्वामुळे पैशाला अधिकच प्रतिष्ठा मिळाली आहे. त्यामुळे समाजात पैसा मिळविण्यासाठी स्पर्धा व त्यातूनच  संघर्ष सुरु झालेला आहे. या स्पर्धा-संघर्षामुळे समाजात  परस्पर विश्वास, प्रेम, सौहार्द यांचा अभाव निर्माण होत आहे. मिळालेल्या अतिरिक्त पैशाचा परिणाम चंगळवादी प्रवृत्तीमध्ये वाढ होण्यात होत आहे. त्यामुळे निसर्गाचे शोषण आणि प्रदूषण वाढत आहे. गरीब आणि श्रीमंत यांच्यामधील वाढती दरी ही गरीब-शोषित-वंचित यांच्या शोषणाची निदर्शक आहे. याचा अर्थ समाजवादी अर्थव्यवस्था संपत्तीचे समान वितरण घडवून आणण्यात यशस्वी ठरत नाही आणि भांडवलशाही ही समान वितरणाच्या तत्त्वाला सुरुंग लावते. निरोगी आणि स्वस्थ समाजव्यवस्था निर्माण करायची असेल तर संपत्तीचे न्याय्य वाटप होणे आवश्यक आहे. आणि हे साध्य करण्यासाठी समाजवादी तत्त्वाची कास धरण्यावाचून  पर्याय दिसत नाही. आर्थिक सुधारणेच्या या युगात आर्थिक स्वातंत्र्याचा त्याग करणेही शक्य नाही. मग यातून कसा मार्ग काढायचा हा जगातील विचारवंतांसमोरील महत्त्वाचा प्रश्न असायला हवा.
बदलत्या आर्थिक-सामाजिक पार्श्वभूमीवर व्यक्तीचे  आर्थिक स्वातंत्र्य शाबूत ठेवून तिच्यामध्ये  समाजवादी वृत्ती बिम्बविण्याचा प्रयत्न करणे हेच आपले उद्दिष्ट असले पाहिजे. लोकशाही राज्यव्यवस्थेद्वारे व्यक्तीच्या  स्वातंत्र्याची जपवणूक करून आणि त्याच राज्यव्यवस्थेद्वारे लोकसंमतीने विशिष्ट आर्थिक धोरणांची अंमलबजावणी करून समाजाच्या  तळातील लोकांच्या हिताला प्राधान्य देता येईल. आधुनिक काळाच्या संदर्भात  लोकशाही समाजवादाचा हाच अर्थ अभिप्रेत असायला हवा. तथापि समाजवादी व्यवस्था निर्माण करण्याचे हे उद्दिष्ट समाजवास्तवावर आधारित असल्याचे दिसत नाही. स्वार्थ ही माणसाची सहज प्रेरणा आहे. या स्वार्थाला मोठ्या प्रमाणात तिलांजली दिल्याशिवाय ‘लोकशाही समाजवाद’ अस्तित्वात येऊ शकत नाही. जेंव्हा व्यक्तिहिताला बाधा निर्माण होते तेंव्हाच फक्त  ही बाधा दूर करण्याच्या दृष्टीने  माणूस समष्टीच्या हिताची बाजू घेत असल्याचे दाखवितो. व्यष्टी-समष्टीमधील परस्परसंबंध गुंतागुंतीचे असून  अंतिमत: प्राधान्य व्यष्टीलाच दिले जाते. हा प्राधान्यक्रम बदलल्याशिवाय ‘लोकशाही समाजवाद’ अस्तित्वात येऊ शकत नाही. माणसात व्यक्तीहिताबरोबरच समाजहिताचा दृष्टीकोन  आणण्यासाठी काय करावे लागेल हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. समाजहित हे व्यक्तीहिताशी सुसंगत असेलच  याची खात्री देता येत नाही. बऱ्याच वेळा समाजहित हे व्यक्तीहिताच्या विरुद्धही असते. आणि माणूस स्वार्थी असल्यामुळे त्याचा ओढा स्वभावत: व्यक्तीहिताकडे असतो. ‘नाही रे’ वर्गातील व्यक्ती समाजवादाची भूमिका घेत असली तरी ती जेंव्हा आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत येते तेंव्हा व्यक्तिहितालाच प्राधान्य देते, हे आपल्या प्रत्यही अनुभवाला येते.
व्यक्तिहितामध्ये आपल्या भावी पिढीच्या व्यक्तिहिताचा समावेश केला तर आपण थोडा वेगळा विचार करू शकतो. काही बाबतीत तत्कालिकदृष्ट्या व्यक्तीहित महत्त्वाचे वाटले तरी भविष्याचा विचार केला तर ते अहितकारकच असते. निसर्गाचे व समाजाचे शोषण/प्रदूषण करून समृद्धी उपभोगणाऱ्या व्यक्तीला व्यक्तिवाद आकर्षक वाटणारच. परंतु निसर्गाचे हे अतिरिक्त शोषण/प्रदूषण हे आपल्याच  भावी पिढीच्या दृष्टीने विनाशकारी ठरू शकते, असा विचार केल्यास माणूस या प्रकारच्या व्यक्तिवादाकडे वेगळ्या नजरेने बघू शकेल, असे वाटते. भ्रष्टाचाराच्या आधारे समृद्ध जीवन जगणाऱ्यांना वाटले पाहिजे की आपले वारसही याच  भ्रष्टाचाराचा बळी ठरू शकतात. आज आपण टेबलाच्या या बाजूस आहोत. उद्या  तुमचा मुलगा टेबलाच्या दुसऱ्या बाजूस असेल आणि तिसराच कोणीतरी टेबलाच्या या बाजूस बसून त्याचे शोषण करीत असेल. आपल्याच समाजाचे शोषण करून समृद्धीची बेटे तयार करणाऱ्यांनी हेही लक्षात घेतले पाहिजे की शोषणामुळे अधिकाधिक दरिद्री झालेला हा समाजसागर तुमची ही बेटे गिळंकृत करू शकतो.
वरील विवेचनावरून असे वाटू शकते की अंतिम हित लक्षात घेतल्यास समष्टीवादच व्यक्तिवादाच्या तुलनेत महत्त्वाचा आहे. परंतु लोकशाही समाजवाद अस्तित्वात येण्यासाठी एवढे पुरेसे नाही. लोकशाही समाजवादाचा मूळ आधार ‘बंधुता’ हे तत्त्व आहे. फ्रेंच राज्यक्रांतीने समता, स्वातंत्र्य या तत्त्वांबरोबरच बंधुता या तत्त्वाचा जरी उद्घोष केला असला तरी या तत्त्वाचा समाजविचारात पुढे पाहिजे तेवढा अवलंब  करण्यात आला नाही. समता व स्वातंत्र्य या तत्त्वांचा  व्यक्तिवाद्यांनी आपल्याला हवा तोच अर्थ काढला. कायद्यासमोर सगळे समान, व्यक्तिविकासासाठी समान स्थिती असणे आणि त्यासाठी व्यक्ती स्वतंत्र असणे, हाच या तत्त्वांचा अर्थ लावल्या गेला. बंधुता हे तत्त्व  व्यक्तिवादाला फारसे अनियंत्रित होऊ देत नाही. सहानुभाव, प्रेम, संवेदनशीलता हे बंधुता या तत्त्वाचे आधार आहेत. माणसामध्ये बंधुत्वाच्या भावनेचाही स्वभावत:च आढळ होतो. परतू स्वार्थापुढे या तत्त्वाची मातब्बरी नाही.
पूर्वी म्हटल्याप्रमाणे शोषणाची अवस्था ही लोकशाही समाजवादी विचाराला पुढे आणते, हे खरे असले तरी ही अवस्था संपली की माणसाला व्यक्तिहितच आठवते. जगाचा इतिहास याला साक्षी आहे. याचा अर्थ ‘लोकशाही समाजवाद’ ही तात्कालिक अवस्था आहे काय ? आर्थिकदृष्ट्या सुस्थितीतील समाज  अस्तित्वात आणण्याचे केवळ साधन  आहे काय ? आर्थिकदृष्ट्या सुस्थितीतील समाजाला लोकशाही समाजवादाची आवश्यकता नाही काय ? संपत्तीचे बऱ्यापैकी(पूर्णपणे नव्हे) समान वितरण हेच लोकशाही समाजवादाचे उद्दिष्ट आहे काय ?
लोकशाही समाजवादाचा असा नकारात्मक विचार करणे योग्य ठरणार नाही, असे वाटते. व्यक्ती, समाज आणि त्यांचे भवितव्य यासाठी लोकशाही समाजवाद सर्व काळी व सर्वदेशी उपयुक्त आहे, असे वाटते. व्यक्तीवादाला नियंत्रित करून समाजहिताला प्राधान्य  देण्यामध्ये लोकशाही समाजवाद महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, हे लक्षात घेतले पाहिजे. केवळ व्यक्तीहित हे समाजात अस्वस्थता निर्माण करून समाजाचे पर्यायाने व्यक्तीचे आरोग्य बिघडवू शकते. व्यष्टी व समष्टीचे संबंध हे परस्परपूरक आहेत, हे आपण क्षणभरही विसरता कामा नये. या परस्परसंबंधांची काळजी घेण्यास लोकशाही समाजवाद समर्थ आहे, असे वाटते. व्यष्टी-समष्टीच्या हितांचा ताळमेळ साधणे एकंदर मानवीहितासाठी अत्यावश्यक आहे. लोकशाही समाजवाद हे तत्त्व या ताळमेळाला आधार पुरविते. यासाठी समाजात लोकशाही समाजवादाचे तत्त्व रुजविणे आवश्यक आहे. लोकशाही समाजवाद हा केवळ राजकीय विचार नसून ती एक जीवननिष्ठा आहे. सामाजिक स्वास्थ्य हे व्यक्तिहिताला आधार पुरविते. आणि सामाजिक स्वास्थ्य निर्माण करायचे असेल तर लोकशाही समाजवादाला पर्याय नाही, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

लोकशाही समाजवाद हे जीवनमूल्य समाजात रुजविण्यासाठी दोन पातळींवर  प्रयत्न व्हायला हवेत. एक म्हणजे सामाजिक पातळीवर आणि  दुसरे म्हणजे शासनाच्या पातळीवर. वर म्हटल्याप्रमाणे  बंधुता हे तत्त्व लोकशाही समाजवादाचा आधार आहे. त्यासाठी बंधुतेला सुसंगत अशा संस्थांची उभारणी करणे आवश्यक आहे. तसेच या विचाराला सुसंगत असे तत्त्वज्ञान व चळवळी उभारणे आपले कर्तव्य आहे. हे प्रयत्न सामाजिक पातळीवर होऊ शकतात. यात लोकशाही शासन लोकसहभाग प्राप्त करून पुढाकार घेऊ शकते. शासनपातळीवर शासनाने आपली धोरणे ठरविताना समाजाच्या तळातील लोकांची उन्नती करण्याच्या दृष्टीने त्यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. संपत्तीचे वितरण समान व न्याय्य होण्याच्या दृष्टीने शासनाचे प्रयत्न राहिले पाहिजेत. व्यक्तिविकासाला पुरेसा वाव देऊनही हे साध्य करता येऊ शकते. मुठभर श्रीमंतांना त्यांचे  स्वास्थ्य व सुरक्षा हवी असेल तर त्यांनाही या लोकशाही समाजवादाच्या प्रस्थापनेसाठी सहकार्य करावे लागेल. लोकशाही समाजवादाचा हाच आधुनिक अर्थ आहे.