Friday 1 November 2019

"सातपाटील कुलवृत्तांत"- एक अनन्यसाधारण वाचनानुभव.

"सातपाटील कुलवृत्तांत"- एक अनन्यसाधारण वाचनानुभव. 

श्री रंगनाथ पठारे यांची ”सातपाटील कुलवृत्तांत” ही नवीकोरी कादंबरी नुकतीच वाचून संपविली. जागतिक साहित्याचा दर्जा असलेली ही कादंबरी अनन्यसाधारण असा वाचनानुभव देऊन गेली. बऱ्याच काळानंतर इतकी प्रभावी कादंबरी वाचण्यात आली, यात शंका नाही.
‘स्वत:च्या कुळाचा शोध घेऊन त्याचा वृत्तांत सांगणारी कादंबरी’ असे स्थूल मानाने तिचे वर्णन करता येईल. तथापि ही कादंबरी त्याहून कितीतरी अधिक आहे आणि त्यातच तिचे अनन्यसाधारणतव आहे. या कादंबरीत लेखकाने स्वत:च्या कुलाचा शोध घेण्याबरोबरच मानवी मनाचा, विविध मानवी प्रवृत्तीचा अन संस्कृतीचाही शोध घेतलेला आहे. यादव काळापासून आतापर्यंतच्या विशिष्ट कालखंडांतील आपल्या कुळातील प्रातिनिधिक पुरुषांची कथा, त्या कालखंडाच्या राजकीय-सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीवर चितारलेली आहे. असे कालखंड आणि त्यामधील कुळपुरुषांची नावे पुढील प्रमाणे सांगता येतील.
१.       यादवकाळ म्हणजेच इसाविसनाचे तेरावे चौदावे शतक- श्रीपती
२.       सोळाव्या शतकाचा उत्तरार्ध – साहेबराव
३.       पानिपतच्या युद्धाचा काल- दासरत
४.       दुसऱ्या बाजीरावाचा उत्तरकाल- जानराव
५.       १९ व्या शतकाचा मध्यकाल- रखमाजी आणि पिराजी
६.       २० व्या शतकाचा पूर्वार्ध- शम्भूराव
७.       १९५० च्या पुढील काल – देवनाथ अर्थात कादंबरीतील लेखक
या प्रातिनिधिक कुलपुरुषांची कथा लिहिताना लेखकाने त्या काळाचीही कथा वर्णिली आहे. सातपाटील या कुळातील या पुरुषांची  आणि त्यांच्या सबंधित लोकांची कथा वाचताना त्या त्या काळातील सामाजिक-राजकीय-आर्थिक स्थितीचीही कथा सहजपणे उलगडत जाते. केवळ कथाच नव्हे तर, या कथेतील सर्व पात्रांची मनोभावना, त्यांच्या विविध प्रवृत्ती, विचार आणि त्यांचे चिंतनही या कादंबरीत अत्यंत प्रभावीपणे व्यक्त होत जाते. या निमित्ताने लेखक केवळ सातपाटील या कुलाचाच नव्हे तर, समग्र मानवी जीवनविषयक चिंतन आपल्या पुढे मांडतो. हे तत्त्वचिंतन कथेशी एकरूप झाल्याने ते प्रत्ययकारी ठरलेले आहे. या कादंबरीद्वारे वाचकांस सातपाटलांच्या इतिहासासोबातच महाराष्ट्रजीवनाच्या इतिहासाचीही अनुभूती मिळते.
या कादंबरीची भाषा हे एक तिचे मत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. ही भाषा अनौपचारिक स्वरुपाची असून ती आपल्या व्यवहारातील आहे.त्यमुळे ती आपली वाटते. निवेदनातील  सहजता आणि संवादात्माकता  आपल्याला कथेशी बांधून टाकते. कादंबरीचा कोणताही भाग वाचला तरी वाचक भारीत होऊन जातो. हे भारावलेपण पुस्तक बाजूला ठेवले तरी बराच काल टिकून राहते. पहिल्या भागाच्या पहिल्याच प्रकरणातील सुरुवातीचा भागच बघा-
“शिरपती चार-चौघांसारखाच होता. म्हटलं तर थोडासा वेगळा. दोनतीनशे वस्तीच्या लहान गावात राहणारी मानसं एकमेकांपेक्षा कितीशी वेगळी असणार? .............तसं चार-चौघासारखं त्याचं लग्न सुद्धा झालेलं होतं आणि त्याला तीन-चार वर्ष वयाचा मुलगा सुद्धा होता. ते असतंच. त्यात वेगळ ते काय?”
या ग्रंथात आपल्याला अनेक आणि वेगवेगळ्या स्तरांतील माणसे भेटतात. तीही त्यांच्या चांगल्या-वाईट स्वभाववैशिष्ट्यांसह. ही माणसे तत्कालीन समाज जीवनाचे दर्शन घडवून देतात. या माणसांच्या मधून आपल्याला माणसाच्या तीव्र जीवनेच्छा प्रत्ययाला येतात. त्यापोटी माणूस करीत असलेली धडपड, साहसे, एकमेकांवरील कुरघोडी, परस्परांच्या जीवांवर उठणे, जगण्यासाठीच जीवावर उदारही  होणे, खोटेपणा, सच्चाई, कपट-कारस्थाने, मत्सर, द्वेष, प्रेम, हळुवारपणा या सर्वांचे विराट दर्शन या महाकादम्बरीमधून होत राहते.
कादंबरीतील पात्रांच्या भाषेबाबत बोलायचे झाल्यास ही भाषा सगळ्याच कालखंडात एकसारखीच दिसून येते. खरे तर कालानुरूप भाषेत सातत्याने बदल होत असतात. यादावकालातील भाषा अविकृत स्वरुपात लीलाचारीत्राच्या रूपाने आपल्यासमोर आहे. तशा सर्वच काळातील भाषेचे नमुने आपल्याला सापडू शकतात. पण असा प्रयत्न कोणी करताना दिसत नाही. दुसरे म्हणजे प्रत्येक काळातील सामाजिक पार्श्वभूमीबाबत. लेखकाने तशी पार्श्वभूमी चितारण्याचा आवर्जून प्रयत्न केलेला आहे. परंतु यादवकालाची पार्श्वभूमी जितक्या उठावदारपणे चित्रित केलेली आहे तितक्या प्रमाणात उर्वरित्त काळखंडाची केलेली क्वचितच दिसून येते.
शेवटचे म्हणजे कादंबरी वाचताना मला बऱ्याच वेळी लीळाचरित्राच्या भाषेची आठवण झालेली आहे.
कादंबरी वाचताना हिंदूची आठवण येते; पण या कादंबरीची उत्कट, उत्कंठावर्धक आणि रोमांचकारी कथा ही एक हिंदुहून वेगळी विशेषता आहे.