Thursday, 9 May 2013

विज्ञानाचा नितीमत्तेशी काहीही संबंध नसतो. याचा अर्थ विज्ञानातून नीतीला समर्थन मिळत नाही. तसेच विज्ञानाचा नीतीला विरोधही नसतो. थोडक्यात, विज्ञान हे नितिनिरपेक्ष असते. 
त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोनही नीती-अनीती निरपेक्ष कार्यरत राहतो. 

उदार अर्थव्यवस्था ही आर्थिक विकास करण्यासाठी प्रत्येकाला स्वातंत्र्य तसेच संधीची उपलब्धताही करून देते. आर्थिक विकासाला ती प्रतिष्ठा निर्माण करून देते. तसेच व्यक्तीमध्ये आर्थिक विकासाची प्रेरणाही निर्माण करते.

उदार आर्थिक व्यवस्था ही आर्थिक विकासाबरोबरच चंगळवादी प्रवृत्ती निर्माण करते. आणि त्यातूनच शोषणही वाढत जाते. कोणत्याही परिस्थितीत आर्थिक विकास हेच माणसाचे ध्येय बनून जाते. साहजिकच या प्रक्रियेत नितीमत्तेला फारसे महत्त्व राहत नाही.

सध्याचे युग हे वैज्ञानिक दृष्टिकोनाचे तसेच उदार अर्थव्यवस्थेचे आहे. त्यामुळे या युगात नीतीला फारसे स्थान नाही. नीतीचे समर्थन करणारे कोणतेही तत्त्वज्ञान/ विचारधारा समाजाला मार्गदर्शन करण्यास समर्थ ठरत नही.

प्रगतीचे भौतिक व सांस्कृतिक असे दोन अंग असतात. या दोन्हीही अंगांचा समतोल विकास होण्यातूनच प्रगती पूर्णत्वाला जाते. सध्या भौतिक प्रगतीला सीमा नाही. तथापि सांस्कृतिक प्रगतीचे काय ? आणि त्यातून निर्माण होणाऱ्या शोषण, द्वेष, संघर्ष यांचे काय ?