Thursday, 16 May 2013

भर्तृहरी हा प्रथितयश कवी व विद्वान होता. त्याच्या कालावधीबाबत अनेक  मतभेद आहेत. तरी तो एक हजार वर्षापूर्वी होऊन गेला, या बाबतीत विद्वानांमध्ये एकमत दिसते. उज्जैन नगरीचा हा राजा त्याच्या शतकत्रयासाठी   प्रसिद्ध आहे. एक नीतिशतक,दुसरे शृंगारशतक तर तिसरे वैराग्यशतक होय.  त्यातही त्याचे सुलभ व लालित्यपूर्ण  भाषेतील नीतिशतक विशेष  प्रसिद्ध आहे. ते संस्कृत भाषेत असून सुंदर विचारांनी परिप्लुत आहे.

भर्तृहरीने  आपल्या शतकत्रयामधून  जीवनविषयक तत्त्वज्ञान अगदी सोप्या भाषेत मांडले आहे. भर्तृहरीच्या नितीशतकातील असाच एक मनोरंजनात्मक परंतु जीवनविषयक अनुभव मांडणारा एक श्लोक मी खाली देत आहे.
"यां चिन्तयामि सततं, मयि सा विरक्ता |
सापि अन्यं इच्छति जनं, स जनो अन्य असक्त:|
अस्मत्कृत्ये च परितुष्यति काचिदन्या |
धिक् तां च तं च मदनं च इमां च मां च |

अर्थ : जिचा मी नेहमी विचार करतो, ती माझ्याबद्दल उदासीन आहे. ती दुसऱ्याच मनुष्यावर प्रेम करते. आणि तो दुसरा मनुष्य मात्र आणखी कोण्यातरी दुसरीचाच विचार करतो. माझ्यावर कोणीतरी तिसरीच प्रेम करते.
या वर भर्तृहरी म्हणतो- तिचा , त्याचा , प्रेम भावनेचा , हिचा आणि माझाही धिक्कार असो.

हा अनुभव किमान एक हजार वर्षापूर्वीचा आहे बरं .