Thursday, 16 July 2015

श्री संजीव खांडेकरांचे लेखन नेहमीच नवीन दृष्टिकोनाची अभिव्यक्ती ठरते. दि, ०७-०६-२०१५ च्या लोकसत्तामधील ‘अप्रासंगिक’ या सदरातील ‘चोहीकडे? आनंद गडे’ हा लेखही याची प्रचीती देतो. आजकालचे बरेच विद्वान पठडीबद्ध व प्रवाहपतित होत असल्याचे दिसून येते. जी गोष्ट बहुसंख्य मानतात त्याच गोष्टीचा शैलीबद्ध उच्चार असे त्यांच्या लिखाणाचे स्वरूप असते. जणू काही वेगळा विचार केला तर लोक आपल्याला मान्यता देणार नाहीत किंवा आपल्याला निराशावादी तरी ठरवितील अशी सुप्त भीती त्यांच्या मनात असते. बऱ्याचवेळा मिडीयासुद्धा अशा लेखनाला प्रसिद्धी देण्यास टाळाटाळ करतो.
लेखक म्हणतात त्या प्रमाणे खरोखरच आपल्याभोवती तथाकथित आनंदाची अमाप पखरण केल्या जात आहे. जणू काही आपल्याभोवती आनंदाचा बाजारच भरल्यासारखे वाटते. वैफल्याच्या पार्श्वभूमीवर आनंदाच्या आशेने त्याला ग्राहकही मुबलक प्रमाणात भेटतात. समाजव्यवस्थेत शिरलेल्या अनेकविध विकृतीमुळे आणि चंगळवादी आदर्शामुळे समाजात स्पर्धा, संघर्ष आणि त्यातून तणाव,वैफाल्याग्रस्तता व मनोविकृती निर्माण होत आहेत. या  घातक परिणामांचे उच्चाटन करण्यासाठी मुळात व्यवस्थेतील विकृती आणि चंगळवादी आदर्शांना दूर करणे आवश्यक आहे. परंतु असे न करता विकृतीजन्य तणावाच्या नियमनासाठी प्रयत्न होत आहेत. कारण व्यवस्थेत बदल करणे भांडवलशाहीच्या म्होरक्यांच्या हितसंबंधांना घातक ठरू शकते. त्यामुळे या प्रस्थापितांच्या   समर्थनाने तथाकथित सकारात्मक विचारांच्या आधारे तणाव दूर करून घाऊक स्वरुपात  आनंदी-आनंद निर्माण करणाऱ्या कार्यशाळांचे पिक आलेले आहे. Art Of Living, विपश्यना, योग वर्ग हे अशाच कार्यशाळांची उदाहरणे म्हणून देता येतील. असे तनावनियमन आणि घाऊक स्वरूपातील आनंदनिर्मिती प्रस्थापितांच्या पथ्यावरच पडणारी असते. कारण मग शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर मुलभूत उपाययोजना करण्याऐवजी त्यांचे समुपदेशन करण्याने काम भागण्याची शक्यता निर्माण होते. तसेच मध्यमवर्गीय मंडळी या आनंदाच्या भरात “आनंदी आनद गडे इकडे तिकडे चोहीकडे” असे आनंदी गीत गात  भांडवलदारांच्या बाजारपेठा बिनबोभाटपणे चालविण्यास मदत करतात. म्हणूनच अशा तथाकथित सकारात्मक विचारांचे प्रायोजकत्व  हे बहुतकरून प्रस्थापित वर्गाकडे असल्याचे दिसून येते.

अशा प्रकारच्या तणावनियमनामुळे व्यवस्थेविरुद्धच्या भावी बंडाला तात्पुरते का होईना थांबविता येईल असे प्रस्थापितांना वाटत असावे. खरे तर अशा तणावनियमनाऐवजी सामान्यातल्या असंतोषाला वाट करून देण्याची गरज आहे. अशा दबावाशिवाय व्यवस्थेतील विकृती दूर होण्याचे मार्ग दृष्टीपथात येण्याची शक्यता वाटत नाही. परंतु अशा “असंतोषाचे जनक” होण्यात कोणत्याही विचारवंताला किंवा नेत्याला रस नाही. सध्याच्या मध्यमवर्गाबद्दल तर बोलायलाच नको. ज्या देशातील मध्यमवर्गाने संपूर्ण स्वातंत्र्यचळवळीचे नेतृत्व केले त्याच देशातील मध्यमवर्ग देशातील गरिबांच्या आर्थिक पारतंत्र्याकडे डोळेझाक करून सकारात्मक विचाराच्या सागरात विहार करीत आहे. whats app सारख्या सोशल मीडियाद्वारे भंकस विनोद, तथाकथित सकारात्मक व उच्च विचार व तोंडी लावण्यापुरते केलेल्या समाजसेवेची उदाहरणे शेअर करण्यात हा वर्ग मश्गुल आहे. अशा प्रकारे अखिल समाजाला एक प्रकारच्या गुंगीत ठेवण्याचा प्रयत्न होत असताना दिसून येतो. या गुंगीच्या प्रभावामुळे समाजाला त्याचे मूळ प्रश्न सोडविण्याची गरज भासत नाही. आणि त्यामुळे हितसंबंधीयांच्या हितांचे आपोआपच संरक्षण होते. गरीब-शोषित समाजावर अशा गुंगीच्या  औषधांचा वापर करून दारिद्र्याच्या व दुःखाच्या महासागरात समृद्धीची बेटे तयार करता येत नाहीत. अन्यथा लेखक म्हणतात त्या प्रमाणे या वैफल्यग्रस्त समाजाच्या वेदनेचे रुपांतर सार्वजनिक असंतोषात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.