Thursday, 16 July 2015

विवेकवादी युक्तिवादापुढे कोणतेही धर्ममत टिकू शकत नाही, हे खरेच. परंतु धर्मश्रद्ध माणसाचा धर्मावरील आत्यंतिक विश्वास हा कोणत्याही युक्तिवादावर आधारित नसतो. धर्म हा त्याच्या निव्वळ श्रद्धेचा विषय असतो. म्हणूनच युक्तिवादाने धर्माला कितीही हादरे दिले तरी त्याच्यासाठी धर्म हा स्थिर, दृढ व चिरंतनच असतो. कारण धर्म हा श्रद्धावान माणसासाठी सिद्धतेचा विषयच नसतो.

धर्म ही सामाजिक-मानसिक आवश्यकता आहे. या आवश्यकतेतूनच जगाच्या विविध भागांत तेथील पर्यावरणानुसार विविध धर्मांची निर्मिती झालेली आहे. जोपर्यंत ही आवश्यकता आहे, तोपर्यंत धर्म जिवंत राहणारच. जीवनातील अनिश्चितता, असुरक्षितता, गूढता आणि मृत्यूचे भय यापासून सुटका करून घेण्याची आशा धर्मामुळे टिकून राहते. विज्ञान किंवा विवेकवादी युक्तिवाद  या आवश्यकतेची पूर्तता करू शकत नाहीत, असे वाटते.. धर्माला काय पर्याय द्यायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. यावर चर्चा होण्याची गरज आहे. तोपर्यंत  विवेकवाद आणि धर्म एकमेकाशी संघर्ष करीत आपापली सामाजिक कार्ये करीत राहणार, असे वाटते.