Thursday, 16 July 2015

भ्रष्टाचार हा अत्यंत महत्वाचा मुद्दा राजकीय व्यक्ती गंभीरतेने घेत नाहीत, हे स्वाभाविकच आहे. त्यात आश्चर्य मानण्याचे कारण नाही. आश्चर्य याचे वाटते की विचारवंतही हा मुद्दा पाहिजे तेवढ्या गंभीरतेने घेत नाहीत. पोलीस, कारकून यांच्या चीरीमिरीलाच भ्रष्टाचार मानणारे जनमानस भ्रष्टाचाराचे विक्राळ आणि बीभत्स रूप अधून मधून अनुभवते आणि चार दिवस सुन्न होते. परंतु भ्रष्टाचाराविषयी हवा तेवढा तिरस्कार आणि चीड मात्र जनमानसात निर्माण होत नाही. या भ्रष्टाचाराचे काय गंभीर परिणाम होत आहेत, याचा सखोल विचार करून ते सातत्याने समाजासमोर ठेवण्याची गरज आहे. हजारो कोटी रुपये खर्च करून राबविल्या जाणाऱ्या योजना अयशस्वी होण्याच्या अनेक कारणांपैकी भ्रष्टाचार हे एक महत्वाचे कारण आहे, हे पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज आहे.
भ्रष्टाचाराविरुद्ध भाषणबाजी करणारे वरिष्ठ अधिकारी E- Tender मध्येही पैसे खातात, हे कळल्यावर धक्काच बसतो. दोषपूर्ण बियाणे म्हणून व्यापाऱ्यांना अल्प किंमतीत विकणारे आणि पुन्हा तेच बियाणे व्यापाऱ्यांकडून मोठ्या किंमतीत विकत घेणाऱ्या बीजकंपन्या पाहिल्यावर आपण हादरून जातो. जन-धन योजनेत आपल्या खात्यात जमा झालेल्या पैशांपैकी काही वाटा गरीब माणूस जेंव्हा तलाठ्याला किंवा तत्सम कर्मचाऱ्याला नेऊन देतो तेंव्हा वैफल्याशिवाय दुसरे काय वाटणार? भ्रष्टाचारामुळे धरणाच्या भिंती सरकतात, पुलाला तडे जातात, बोगस औषधे व  भेसळयुक्त दुधामुळे लोकांचे जीव जातात. कोणताही गुन्हा केला तरी पैशाच्या जोरावर आपण सुटू शकतो ही भावनाच गुन्हेगारांमध्ये आत्मविश्वास निर्माण करते. यात बलात्कारासारखे गुन्हेसुद्धा आहेत. भ्रष्टाचारी अप्रत्यक्षपणे अशा गुन्ह्यांना जबाबदार असतात. भ्रष्टाचार करणाऱ्यांचे वारसही कधीकाळी टेबलाच्या दुसऱ्या बाजूस राहू शकतात आणि याच भ्रष्टाचाराचे बळी ठरू शकतात असे भ्रष्टांना वाटत नसेल का, हा प्रश्न पडतो.
भांडवलशाहीच्या पार्श्वभूमीवर पैशाला निरपेक्ष प्रतिष्ठा प्राप्त झाल्यामुळे तो कोठून मिळाला हे सामान्य माणूस पाहत नाही. त्यामुळे जनमानसांत भ्रष्टाचाऱ्याविरुद्ध असंतोष निर्माण होत नाही. उलट हे जनमानस अशा धनवान भ्रष्टाचारी मंडळीकडे कौतुकाच्या नजरेने बघते.

या भ्रष्टाचारी लोकांची दांभिकताही मनालीच पाहिजे. या मंडळींनाही त्यांच्या पापाची थोडी फार बोचणी जाणवत असणारच. मग हे लोक या पैशानेच तीर्थयात्रा करणार. देव-देवतांना व बुवा-बाबांना आपल्या भ्रष्ट संपत्तीचा काही अंश दान करून आपल्या पापाचे परिमार्जन करून घेणार. वर बोनस म्हणून बुवा-बाबांचे आशीर्वादही प्राप्त करणार. हे बुवा-बाबाही यांच्या भक्तांना भ्रष्टाचार करू नका हे सांगणार नाहीत. बहुत्येक त्यांचे अध्यात्म या क्षुद्र-लौकिक गोष्टींना महत्त्व देत नसणार. या बुवा-बाबांकडे बहुतकरून पैसेवाल्यांचीच गर्दी असते. सामान्य गरीब माणूस त्यांच्याकडे का फिरकत नाही याची फिकीर ते करीत नाहीत. कुठे ते चक्रधर- नामदेवादी महापुरुष आणि कुठे ही दांभिक, स्वार्थी मंडळी. कोणी याचा विचार करणार की नाही. कितीही चांगल्या घोषणा केल्या, कितीही चांगल्या  योजना आणल्या तरी हा विराट आणि विक्राळ भ्रष्टाचाररुपी राक्षस त्यांना गिळंकृत करणारच. भ्रष्टाचाराचे तन साफ करा मगच विकासाची  रोपे लावा.