Thursday, 16 July 2015

मला काही गोष्टी फार अस्वस्थ करतात. त्यापैकी एक आहे लोकांची दांभिकता. आजकाल ही सर्वत्र आढळते. परंतु जी मंडळी  सर्वसामान्य लोकांच्या भवितव्याशी निगडीत असतात, त्यांची दांभिकता अधिक उद्वेगजनक असते. ज्यांची दांभिकता सर्वसामान्य लोकांशी संबंधित असते ते म्हणजे राजकारणी आणि वरिष्ठ अधिकारी होत. यांच्यामध्ये ही दांभिकता प्रकर्षाने असते. लोकांच्या दृष्टीने हे लोकनेते असतात. त्यांची नावे सुवर्णाक्षरांनी लिहिली जावीत, असेही लोकांना वाटत असते. त्यांची स्मारके बनविण्यासाठी जनआंदोलनेही होतात. मिडियासुद्धा या लोकनेत्यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देतो. (लोकमताच्या लाटेवर आरूढ होणाऱ्या मिडीयाबद्दल काय सांगावे?) हे नेतेही आपल्या देहबोलीतून आणि वक्तव्यातून आपल्याविषयीचा समज दृढ करीत असतात. असे करताना त्यांना जराही संकोच वाटत नाही. उलट खोटे बोलण्यात त्यांचा उत्साह व आत्मविश्वास ओसंडून वाहतो. परंतु या तथाकथित लोक्नेत्यांचे पडद्यामागील प्रताप जेंव्हा कळतात तेंव्हा आपली मति गुंग होते. दारुवाले आणि मटकाकिंग यांच्याकडून हप्ते घेणाऱ्या या लोकनेत्यांची दांभिकता अचंबित करणारी आणि खेदजनक आहे.
बऱ्याच वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांबाबतीतही असाच अनुभव येतो. लोकमानसात लोकाभिमुख, स्वच्छ, संवेदनशील अशी प्रतिमा बनविण्यात यांचा हातखंडा असतो. काहीजण तर लोकांना प्रेरणा देणारी व्याख्यानेही देतात. आणि त्या निमित्ताने स्वत:ची प्रसिद्धी करून घेतात. सनसनाटी कामे व वक्तव्ये करण्याच्या मार्गाने हे मिडीयाला व जनतेलाही प्रभावित करीत असतात. संरचनात्मक व मुलभूत कामे केल्यामुळे फारशी प्रसिद्धी मिळत नाही. त्यासाठी कष्ट मात्र फार घ्यावे लागतात. हा आतबट्ट्याचा व्यवहार करण्याऐवजी थोडीच पण सनसनाटी निर्माण करणारी कामे त्यांना अधिक श्रेयस्कर वाटतात. मीडियाही त्यांना उत्साहाने साथ देतो. मिडीयाला बनविले जाते की तो जाणीवपूर्वक बनल्याचे नाटक करतो, कोणास ठाऊक? पण त्यामुळे ही वरवरची सोंगे प्रसिद्धीस पावतात.
मिडीयाने खरे तर हे मुखवटे वेळोवेळी ओरबाडून काढले पाहिजेत. आणि या लोकांचे सत्य स्वरूप समाजापुढे आणले पाहिजे. जे लोक खऱ्या अर्थाने आणि शांतपणे आपली कामे करतात. मुळातून स्वच्छ चारित्र्याचे असतात,  पण  त्यांना आपल्या चारित्र्याचे भांडवलही करायचे नसते, अशांना मिडीयाने शोधले पाहिजे. आणि त्यांना प्रसिद्धी देऊन समाजापुढे आदर्श ठेवण्याचे काम करणे आवश्यक आहे.