Monday 8 April 2013

ईश्वर सत्य आहे की कल्पना आहे ,या वादात पडण्यात अर्थ नाही. कारण अशा वादाला शेवट नसतो . ईश्वर तर्काने किंवा प्रत्यक्ष सिद्ध होतो किंवा नाही , यावर आस्तिकांचा देवावरील विश्वास अवलंबून नसतो . 
 
ईश्वर म्हणजे सृष्टीमधील संतुलनाचे तत्त्व , असा एक विचार मांडता येईल. त्याला विश्वात्मक चैतन्य असेही संबोधता येईल. सृष्टीचे संतुलन राखणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आणि आवश्यकता आहे. कारण त्याच्याशी आपल्या अस्तित्वाचा प्रश्न निगडीत आहे. 
 
या संतुलनाचे दोन पैलू आहेत . एक म्हणजे भौतिक सृष्टीचे संतुलन तर दुसरे म्हणजे मानवी वर्तनाचे संतुलन .पर्यावरणीय संतुलन  हे भौतिक सृष्टीच्या संतुलनाचे उदाहरण मानता येईल . मानवा-मानावांमधील अंतर-क्रिया अर्थात मानवी वर्तन यांचे संतुलन हा सृष्टीच्या संतुलनाचा दुसरा महत्त्वाचा पैलू आहे . 
 
एकमेकाशी चांगले वागल्यामुळे मानवी वर्तनामध्ये संतुलन निर्माण होते तर वाईट वागल्यामुळे हे संतुलन बिघडते . तथापि चांगले वागणे म्हणजे काय हा एक मोठा प्रश्न आहे.  जगातील तत्त्वज्ञांमध्ये यावर गहन चर्चा चालू असते . परंतु ढोबळ मानाने -आपल्या ज्या कायिक-वाचिक-मानसिक कृत्यांमुळे आपल्यामध्ये किंवा इतरांमध्ये दुख:निर्माण न होता सुखच निर्माण होते त्या कृत्यांना चांगली कृत्ये असे म्हणता येइल. येथे तत्कालीन सुख- दु:खापेक्षा दीर्घकालीन सुख-दु:ख अर्थात हिताहित गृहीत धरले अहे. 
 
दुसरा एक ढोबळ मानदंड आपण मानत असतो . मानवी जीवनासंबंधी निरपेक्षपणे मार्गदर्शन करणारे संत , महापुरुष यांचा उपदेश हाच तो मानदंड होय . त्यांनी ज्या पद्धतीने वागण्यास सांगितले आहे किंवा ते जसे जगले आहेत , तसे किंवा त्यासारखे किंवा त्यांच्याशी सुसंगत वागणे किंवा जगणे म्हणजे चांगले वागणे , असे आपण सर्वसाधारणपणे मनात असतो. 
 
हे तर नक्की की, वरील महापुरुषांचा उपदेश हा सृष्टीचे संतुलन टिकविणारा होता असे ढोबळ मानाने मानता येते. थोडक्यात, चांगले वागणे आणि सृष्टीसंतुलन यांचा काहीतरी संबंध आहे , असे मला वाटते. माणसाचे चांगल्या वागण्याचे निदर्शक ठरणारे सद्गुण पूर्ण स्वरुपात कोणत्याही व्यक्तीमध्ये असणे संभवत नही. म्हणूनच प्रगल्भ माणसाने या सर्व सद्गुणांचा मूर्तिमंत अविष्कार म्हणजे ईश्वर, अशी कल्पना केली असली पहिजे. म्हणूनच अशा सर्व सद्गुणांची आराधना म्हणजेच असे सद्गुण आपल्यामध्ये बिम्बाविण्याची साधना म्हणजेच ईश्वरार्चना होय . 
 
पुर्णस्वरुपातील सद्गुणांचा समुच्चय असणाऱ्या ईश्वरासारखे बनणे तर शक्य दिसत नाही . तथापि तो व आपण यामधील अंतर तर कमी करणे आपल्या हातात आहे . 
 
असे केल्याने विश्वात्मक संतुलन कायम राहील आणि त्यामुळे माणसाच्या सुखाचाही मार्ग मोकळा होइल. 
 

No comments:

Post a Comment