Thursday 30 June 2016

समाज आणि स्वातंत्र्य

समाज म्हणजे सामाजिक संबंधांचे जाळे अशी समाज या संकल्पनेची व्याख्या केली जाते. समाजच काय अखिल विश्वच संबंधांचे विराट जाळे  आहे. या जगातील प्रत्येक गोष्ट, मग ती  सजीव असो की निर्जिव, परस्परांशी असलेल्या संबंधांनी जखडलेल्या असतात. त्यामुळे कोणा एकातही झालेला बदल दुसऱ्या अनेक गोष्टींतील बदलांना कारणीभूत होतो. थोडक्यात, कोणतेही कार्य स्वेच्छेनुसार करण्यास जरी आपण स्वतंत्र वाटत असलो तरी हे स्वातंत्र्य मर्यादित स्वरूपाचे आहे. या मर्यादा आपल्यात असणाऱ्या विविध प्रकारच्या संबंधांमुळे  आलेल्या असतात. या संबंधांच्या निमित्ताने हक्क, कर्तव्ये,कायदा, नियम,रूढी, नीती इत्यादी विनियमने तयार होतात. ही सर्व नियमने आपल्याला सातत्याने  नियंत्रित करीत असतात. त्यामुळे आपण स्वतंत्र आहोत हे नि:संदिग्धरीत्या म्हणता येत नाही. जे काही स्वातंत्र्य  आपण अनुभवतो ते सैल असणाऱ्या बंधनरुपी दोरांसारखे आहे..
प्रत्येकजन वरील  विनियमांचा विचार न करता या स्वातंत्र्याचा अनियंत्रित वापर करू लगला तर अखिल विश्वाची व्यवस्था नष्ट  होण्यास वेळ लागणार नाही. आजकाल आपण निसर्गाशी जुळवून घेण्यापेक्षा त्यावर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्याचे मानवी जीवनावर झालेले गंभीर परिणामही आज  आपण भोगत आहोत. माझ्या प्रत्येक कृतीचा बारा-वाईट  परिणाम इतरांवर होत आहे आणि इतरांकडून होणाऱ्या प्रत्येक कृतीचा तसाच परिणाम माझ्यावरही  होत असतो, ही गोष्ट आपण क्षणभरही विसरता कामा नये.

स्वातंत्र्यासंबंधी  दुसरा एक विचार! प्रत्येक कार्याला कारण असते हा एक प्रसिद्ध नियम आहे. याचा अर्थ आपल्या प्रत्येक कृतीचे काहीतरी कारण असले पाहिजे. याच नियमानुसार त्या कारणालाही कोणते तरी कारण असायला हवे. अशी कार्य-कारणाची अनंत शृंखला असल्याची कल्पना आपल्याला  करता येते. थोडक्यात आपल्या प्रत्येक कृतीचे मूळ कारण हे आपल्या पलीकडचे असू शकते. हे कारण आपल्या प्रभावक्षेत्राबाहेरचे असल्याने त्याचे कर्तृत्व तसेच जबाबदारी आपल्यावर येऊ शकत नाही. उलट आपण जी कृती करतो ती आपण स्वत:हून न करता ती कोणत्यातरी बाह्य कारणामुळे आपल्याकडून होत असते असे म्हणावे लागते.. याचा अर्थ आपण कोणतीही कृती करण्यास स्वतंत्र नाहीत असाच होत नाही काय?


विचार करायला काय हरकत आहे?

Tuesday 28 June 2016

अण्वस्त्रप्रसारबंदी करारावर स्वाक्षरी केल्याशिवाय NSG मध्ये प्रवेश मिळत नाही, हे जर खरे असेल तर NSG मध्ये  प्रवेश मिळण्यासाठी मिळविल्या जाणाऱ्या आणि अनेक देशांकडून मिळत असलेल्या  पाठीम्ब्याचा काय अर्थ असेल! की हा सर्व प्रकार म्हणजे एका राजकीय नाट्याचा अविष्कार होता? भारताचा NSG मध्ये प्रवेश व्हावा असे खरोखरच या देशांना वाटत असेल तर अण्वस्त्रप्रसारबंदी करारावर स्वाक्षरी करण्याच्या अटीबद्दल या देशांचे काही मत होते असे काही वाचनात आले नाही. की पाठींबा द्यायचे नाटक आपण करायचे, प्रवेश होऊ न देण्याचे काम परस्पर चीन सारखे देश करतीलच यावर या पाठींबा देणाऱ्या देशांचा विश्वास होता?

Friday 24 June 2016

दिनांक २२-०६-२०१६ च्या लोकसत्तामधील “जातिव्यवस्था आली कोठून?” हा शेषराव मोरे यांचा लेख वाचला. बेटीबंदी हे जातीव्यवस्थेचे व्यवच्छेदक लक्षण असले तरी तिच्यामधील श्रेष्ठ-कनिष्ठत्व, स्पर्शास्पर्शत्व ही वैशिष्ट्ये अधिक अमानवी आणि घातक आहेत. जातिव्यवस्थेचा उगम जर आदिम समाजाच्या टोळीव्यवस्थेत शोधायचा झाल्यास तिच्यातील अमानवी श्रेष्ठ-कनिष्ठत्व, स्पर्शास्पर्शत्व यांचा उगम कोठे शोधायचा, हाही प्रश्न सोडविण्याची गरज आहे. जातीव्यवस्था ही ब्राह्मणांनी निर्मिली नाही हा निष्कर्ष काढण्यासाठी मोरे यांनी तिचा उगम टोळीव्यवस्थेत शोधलेला आहे की काय, असे वाटते. जातीव्यवस्थेने भारतीय समाजाची जी हानी केलेली आहे ती तिच्यातील कप्पेबंद श्रेष्ठ-कनिष्ठत्व व  स्पर्शास्पर्शत्व यांच्यामुळे. जातीव्यवस्थेत ही वैशिष्ट्ये कशी आली हे टोळीसिद्धांताने मुळीच सिद्ध होऊ शकत नाही.

जातीव्यवस्था कोणत्याही कारणांमुळे निर्माण झालेली असली तरी तिला धर्मव्यवस्थेने पाठींबा दिला हे स्पष्ट आहे. यासाठी जरी भाकडकथांचा आधार घेतला असला तरी ते धार्मिक समर्थन होते हे लक्षात घेतले पाहिजे. जातीव्यवस्थेमध्ये श्रेष्ठ-कनिष्ठत्व कसे निर्माण झाले हे नि:संदिग्धपणे स्पष्ट करता आले नाही तरी मनुस्मृतीसारख्या स्मृतिग्रंथांनी या बाबींना मजबूत समर्थन दिलेले आहे, हे स्पष्ट आहे. त्यावेळी समाजमनावर या स्मृतिग्रंथांचा जबरदस्त पगडा होता यात शंका नाही. स्मृतिग्रंथांतील निर्देश जशास तसे अंमलात येत नसले तरी वेळोवेळी त्यांचा आधार घेतला जात असे. तेराव्या शतकात चक्रधरस्वामींच्या एका दलित भक्ताला धर्माधिकार नाही हे निश्चित करून त्याला मृत्युदंडाची शिक्षा दिली ती शास्त्राचा आधार घेऊनच. लीळाचरित्रात या घटनेचा स्पष्ट उल्लेख आहे.

Tuesday 21 June 2016

परकीय गुंतवणुकीला अनेक क्षेत्रे अधिकाधिक खुली केल्यामुळे काही अनिष्ट परिणाम होऊ शकतील काय, यावर विचार करण्याची गरज वाटते. भांडवल आणि तंत्रज्ञान यांच्या प्रचंड गुंतवणुकीच्या आधारावर परकीय उद्योजक येथील अर्थव्यवस्थेवर नियंत्रण प्रस्थापित करू शकतील काय, या प्रश्नाचे उत्तर सामान्यांना मिळाले पाहिजे. अवाढव्य गुंतवणूक आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानापुढे येथील उद्योजक टिकाव धरू शकतील काय, यावरही शंका निर्माण होऊ शकते. मग येथील लोकांनी या परकीय उद्योगांमध्ये फक्त नोकऱ्याच करायच्या काय? त्याही या उद्योगांच्या मर्जीवर.
मर्यादित परकीय गुंतवणुकीसोबतच देशांतर्गत भांडवल वाढीसाठी प्रयत्न करणे अतिशय महत्त्वाचे वाटते. त्या दृष्टीने आपण काय करीत आहोत, यावर अर्थतज्ज्ञांनी प्रकाश पडावा, असे वाटते. 
कर्मकांड करणे हे माणसाचे वैशिष्ट्यच असते. त्यातही भारतीयांचे तर हे विशेष वैशिष्ट्य आहे. म्हणूनच आपल्याकडे प्रत्यक्ष कामापेक्षा त्याचे साजरीकरणच अधिक जोरात सुरु असते. त्याचाच परिणाम म्हणजे केलेल्या किंवा न केलेल्या कामांची पैशांची उधळपट्टी करून केलेली अमाप जाहिरात. अशा जाहिराती आपण व्यक्तिगत व सार्वजनिक पातळ्यांवर सातत्याने करीत असतो. काम सुरु करण्याआधीच शपथविधीचा कार्यक्रम जोरदारपणे साजरा करणे, उठसुठ वेगवेगळे दिन (योगदिन, स्वच्छता दिन इत्यादी), जाहीर करून साजरे करणे, योजनांची अंमलबजावणी करण्यापेक्षा त्यांचे नामकरणविधी गाजविणे यासारखे प्रकार करण्यात आपला हात कोणी धरू शकत नाही.
कामाची जाहिरात प्रत्यक्ष कामेच करतात. खरोखर कामे केली तर त्यांची वेगळी जाहिरात करण्याची आवश्यकताच निर्माण होणार नाही. उलट या जाहिरातीवर उडविला जाणारा पैसा अधिक कामे करण्यात खर्च होऊ शकेल.

विकासदराच्या अतिरेकी प्रदर्शनाबाबतीतही असेच म्हणता येईल. विकासदर हा येथील सामान्य लोकांच्या जीवनमानातून दिसून आला पाहिजे. लोकांची आर्थिक स्थिती, रोजगार, आरोग्य इत्यादी बाबी विकासदर निश्चित करीत असतात. त्यासाठी त्याची वेगळी जाहिरात करण्याची काहीच आवश्यकता नाही. हा विकासदर लोकांच्या जीवनमानात दिसला नाही तर उलट अशा जाहिराती लोकांची क्रूर थट्टा ठरू शकतात.