Tuesday, 5 July 2016

काळ स्वतंत्रपणे अस्तित्वात आहे काय?

हे विश्व म्हणजे संबंधांचे विशाल जाळे आहे. हे विश्वरुपी जाळे  म्हणजे केवळ वर्तमानकालीन अस्तित्व नव्हे. भूत आणि भविष्यासहित वर्तमान अस्तित्व म्हणजे हे विश्व! थोडक्यात, आपले संबंध हे वर्तमानातील सर्व घटकांशी तर आहेतच, पण ते भूतकालीन व भविष्यकालीन अस्तित्वाच्या प्रत्येक घटकांशी आहेत. असे असेल तर, आपण आपल्या सभोवताली असलेल्या कोणत्याही घटकांपासून तर स्वतंत्र नाहीतच , पण भूतकालीन व भविष्यकालात  असणाऱ्या   घटकांपासूनही  स्वतंत्र नाहीत, असे म्हणावे लागेल.

कधी कधी वाटते, भूत, वर्तमान आणि भविष्य असे काळाचे प्रकार नसावेतच. काळ हा अनंत विस्तार असलेले व्यापक अस्तित्व असून भूत, वर्तमान व भविष्य हे आपल्या सापेक्षतेने जाणवणारे काळाचे भाग असावेत. आपल्या सीमित क्षमतेला एका वेळी यातील एकच  भाग अनुभवाला येत असावा. जणू काही आपण अनंत विस्तारित काळामध्ये प्रवास करित  आहोत. प्रवासात मागे पडलेले स्थळ हे पुढील स्थळी गेल्यानंतर दिसेनासे होते..तसेच भूतकाळाचे होत असेल काय?  प्रवास करताना मागे पडलेले आणि पुढे येणारे अशी दोन्हीही स्थळे अस्तित्वात असतात. फक्त ती आपल्या वर्तमानकालीन अनुभवात नसतात. तसेच भूतकाळ व भविष्यकाळाचे असेल काय? थोडक्यात, घडून गेलेल्या, घडत असलेल्या व घडल्या जाणाऱ्या घटना एकाच वेळी अस्तित्वात असून आपल्या अनुभवाला मात्र  क्रमाक्रमाने येत असाव्यात काय? 

दुसराही एक विचार! काळ हा मुळी अस्तित्वातच नसावा. घडणाऱ्या घटनांमुळे आपण काळाची कल्पना करतो. काळातून सर्व घटना काढून घेतल्या तर शेवटी काय उरेल? तरीही निरुपाधिक असा काळ राहील काय? मग अशा अस्तित्वाला काय अर्थ राहील ? काहीही असो , आपण अशा काळाची कल्पना मात्र करू शकतो. मात्र असा काळ सर्वव्यापक आणि विभू असला पाहिजे. विभू म्हणजे सर्वव्यापक व अनंत विस्तारित असा. आपण काळाला गतिमान या स्वरुपात कल्पितो. परंतु विभू असणारा काळ गतिमान असू शकत नाही. कारण काळाने सर्व अवकाशच व्यापलेला असतो. आपणच  अशा विभू काळात प्रवास करीत आहोत काय? 

अनंत विस्तारित अशा काळाची आपण कशी कल्पना करायची? कदाचित काळ आणि अवकाश हे अस्तित्वाचेच अभिन्न घटक आहेत की काय?  घटना, पदार्थ अस्तित्वात आले की, त्यासोबतच अवकाश व काळ येत असेल. आणि पदार्थ व घटना काढून घेतल्या की काळ व अवकाश संपुष्टात येत असेल काय?  मग काळ व अवकाश यांचे स्वतंत्र अस्तित्व मानण्याचे काय करण उरेल? फक्त त्यांची कल्पना करता येते म्हणून?