Friday, 29 April 2016

भारतीय संस्कृती ही जगातील सर्वश्रेष्ठ संस्कृती असून या संस्कृतीत सर्व विज्ञानांचा व विचारांचा उच्चत्तम विकास झाला होता आणि जगातील इतर संस्कृतींनी आपल्या संस्कृतीकडूनच उसनवारी केलेली आहे, असे मानणारा गट हा आज सर्वांत प्रभावशाली गट आहे.
जगातील सर्वच संस्कृतींचा कमी-अधिक विकास घडतच असतो. त्यामुळे आमच्याच संस्कृतीत सर्व वैज्ञानिक शोध पूर्वीच लागलेले आहेत, असे म्हणणे ही स्वत:ची फसवणूक व जाणकारांची करमणूकच म्हटली पाहिजे. आधुनिक विज्ञानाने प्रत्यक्षात एखादा शोध लावला की , तो आमच्याकडे यापूर्वीच लागलेला होता, असे म्हणणे व त्याविषयक प्राचीन ग्रंथांतील एखादे उद्धरण किंवा एखादी भाकडकथा प्रस्तुत करणे  हे आपल्या पश्च्यातबुद्धीचे उदाहरण आहे. आधुनिक विज्ञानाकडून  असा शोध लागण्याआधी  तो आपल्याकडे लागला असल्याचे कोणी निदर्शनास आणून देत नाही. असा शोध लागल्यानंतरच वरील युक्तीवाद केल्या जातो. नासदीय सुकतात सृष्टीविषयक मूलगामी चिंतन आढळते. तसे महाभारतादी अनेक धर्मग्रंथांतून सृष्टीविषयी भिन्न भिन्न स्वरूपाचे व बऱ्याचवेळा परस्परविरोधी असे चिंतन आढळते. परंतु या सर्व चिंतनांमधून आम्हाला नासदीय सुक्तात उक्त चिंतनच प्रमाण आहे, असे कधी एखादा धर्मग्रंथ किंवा संस्कृतीवाचक म्हटल्याचे आढळत नाही. परंतु जेंव्हा आधुनिक विज्ञानही नासदीय सुक्तासारखेच चिंतन-विचार मांडते, हे कळले तेंव्हा नासदीय सूक्ताचा उद्घोष करण्यात आला. आणि आमच्याकडे सृष्टीविषयक सिद्धांतांची प्रगती आजच्या विज्ञानाइतकीच झाली होती, असा दावा करण्यात आला. मग इतर ग्रंथांतून सृष्टीविषयक जे उथळ चिंतन आलेले आहे त्यांचे काय करायचे हा प्रश्न या संस्कृतीप्रवाचकांना पडत नाही.
 गुरुत्वाकर्षणाची नुसती जाणीव म्हणजे विज्ञान नव्हे. गणिताने गुरुत्वाकर्षणाचे मोजमाप करणे हे विज्ञानाच्या प्रगतीला आवश्यक आहे. केवळ परमाणुची कल्पना करणे पुरेसे नाही. त्याचे स्वरूप, त्याची रचना, त्याची गती इत्यादी बाबी शोधून काढणे याला विज्ञान म्हटले जाते.

याचा अर्थ भारतीय संस्कृतीत उल्लेखनीय असे काहीच नाही काय? खरे तर अशा बऱ्याच अभिमानयोग्य गोष्टी आपल्याकडे आहेतच. भौतिक सुखाचा उत्कटतेने स्वाद घेण्याची प्रेरणा देणारे, प्राचीन ऋषींच्या प्रतिभालावण्याने नटलेले जगातील सर्वांत प्राचीन साहित्य म्हणजे वेद, ही आपली अभिमानवस्तु आहे. समकालीन सर्व वैद्यकशाखांमध्ये सर्वांत प्रगत असणारा आयुर्वेद ही अभिमान बाळगण्याजोगी बाब आहे. मानवीतत्त्वज्ञानाचा उच्चत्तम अविष्कार ज्यांत प्रकट झालेला आहे ती उपनिषदे आपली प्रतिमा उंचावणारीच आहेत. शून्याचा शोध लावणारे भारतीय गणितज्ज्ञ, प्राचीन शिल्पकला, धातुविद्या, रामायण-महाभारतासारखी महाकाव्ये, या गोष्टी आपल्या अभिमानाच्या विषय असायला हरकत नाही. पुराणांतील वानगी पुराणातच ठेवावीत. पुराणातील या वानगींमुळे आपल्या सद्यस्थितीमध्ये काहीही फरक पडणार नाही, हे समजून घ्यायची कधी नव्हे तेवढी  आज गरज निर्माण झालेली आहे.