Monday 4 April 2016

काही झाले तरी भारतमाता म्हणणार नाही”, असे जाहीरपणे उद्घोषित करणाऱ्या ओविसिंनी व त्याला विरोध करणाऱ्यांनी मोठाच वाद निर्माण केलेला आहे. परंतु ओवेसी किंवा काही मुसलमानांची वरील भूमिका कशामुळे आहे, याचा विचार  कोणीही करताना दिसत नाही.
देशाची देवीच्या रुपात कल्पना करणे हे इस्लामशी सांस्कृतिकदृष्ट्या विसंगत आहे. हिंदूंच्या संस्कृतीशी ते सुसंगत असल्याने हिंदूंना ते स्वाभाविक वाटते. उलट ते मुसलमानांना तसे का वाटत नाही याचे त्यांना आश्चर्य वाटते आणि रागही येतो.
इस्लामला एका अल्लाशिवाय इतर देवी-देवतांचे अस्तित्व मुळातच मान्य नाही. किंबहुना असे मानणे पाप आहे. अशा वैचारिक भूमिकेच्या पार्श्वभूमीवर भारत देशाला का होईना देवीच्या रुपात पाहणे मुसलमानांना पचू शकत नाही. या भूमिकेतून ही मंडळी ‘भारतमाता की जय’  म्हणण्याला उत्सुक नाहीत. या त्यांच्या नकाराचा देशनिष्ठेशी संबंध जोडणे हे आपल्या अपरिपक्वतेचे लक्षण आहे, यात शंका नाही. खरे तर हा संस्कृती भेदाचा परिणाम आहे.
‘भारतमाता की जय’ म्हणण्यास नकार देणे योग्य की अयोग्य यावर चर्चा करण्याचा माझा उद्देश नाही. परंतु मुसलमानांकडून अशी भूमिका का घेतली जाते, हे समजून घेण्याचा नम्र प्रयत्न आहे.
आपल्या नेत्यांबरोबरच समाजमाध्यमावरील तथाकथित सुजाण नागरिकही या विषयावर मोठ्या त्वेषाने आपले विचार मांडतात. असे विचार मांडताना मागचा पुढचा विचार करण्याची गरज यांना वाटत नाही. व्यक्त होता येते म्हणूनच केवळ वाट्टेल तसे व्यक्त होण्याची स्पर्धाच जणू समाजमाध्यमावर चालू आहे.

या निमित्ताने कोणत्याही गोष्टीवर मुळातूनच कसा विचार केला पाहिजे, दुसऱ्यांच्या भूमिकेत शिरून त्यांची भूमिका कशी समजावून घेतली पाहिजे, हे सांगणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे, हेच खरे. 

No comments:

Post a Comment