Monday 18 April 2016

दिनांक ३१-०३-२०१६ च्या लोकसत्तामधीलभारतीय सांस्कृतिक ऐक्याचे पहिले सूत्रहा लेख वाचला. वेदकाळापासून निरनिराळ्या समूहांच्या देवतांचे  वैदिक देवतांशी ऐक्य दाखवून  किंवा वेदांमध्ये बहुजनांचे देव स्थास्पित करून त्यांना वेदांत स्थान देण्याची प्रक्रिया अव्याहतपणे सुरु आहे. बहुजनांच्या या देवतांचे आर्यीकरण झाल्याने सर्वच गटांमध्ये एकप्रकारचे सांस्कृतिक ऐक्य निर्माण झाले. याच प्रक्रियेचा भाग म्हणून अगदी शक शक-कुषाणांच्या सुर्यालाही पंचायतनात स्थान दिले गेलेले आहे. त्यामुळे येथील पत्येक समूहाला आपण एका विशाल सांस्कृतिक समूहाचे एक घटक असल्याची भावना निर्माण झाली. त्यामुळे स्वत:च्या वैशिष्ट्यांची जपवणूक करूनही एकात्मकतेची भावना अनुभवता येऊ लागली.त्यामुळेच  भारतात कोणताही विशिष्ट धर्म निर्माण होताही येथे सांस्कृतिक ऐक्य निर्माण झाल्याचे श्री मोरे यांना वाटते.
बारकाईने बघितल्यास वेदोपनिषदांवर आधारित मूठभरांचा वैदिक धर्म आणि बहुजनांचा लोकधर्म हे वेगवेगळेच असल्याचे दिसून येतेविठोबा, खंडोबा, ज्योतिबा, मातृरुपातील विविध देवता या आहेत बहुजनाच्या देवता. वेदांमधून या देवतांचा आढळ होण्याचा प्रश्नच उद्भवत  नाही. परंतु  पुरोहितशाहीच्या वर्चस्वाच्या काळात पुराणांच्या माध्यमातून लोकदैवतांचे वैदिक देवतांशी ऐक्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न झाला यासाठी अनेक भाकडकथा निर्माण करण्यात आल्या. लोकदेवतांच्या प्रत्येक स्थानाचे स्थानमाहात्म्य रचण्यात आले आणि  अशा स्थानमहात्म्याचा संबंध कोणत्यातरी पुराणांशी जोडण्यात आला. मग ते स्थानमहात्म्य त्या पुराणात असो वा नसो. या स्थानमहात्म्याच्या निमित्ताने अनेक व्रतवैकल्ये निर्माण करण्यात आले. थोडक्यात पुरोहितांनी बहुजनांच्या  लोकप्रिय देवतांचा आधार घेवून बहुजनसमाजावर आपली पकड मजबूत केली. बहुजनसमाज आपसूक या जाळ्यात अडकत गेला. त्यालाही आपण या परंपरेचे अनादिकालापासून भाग आहोत असे वाटू लागले. यालाच मोरे भारताचे सांस्कृतिक ऐक्य मानतात. या सांस्कृतिक ऐक्यामुळे बाकी काय झाले माहित नाही, पण पुरोहितांचे भवितव्य मात्र  निश्चित झाले. एवढेच नव्हे तर  पुरोहितशाहीची  भरभराट झाली. कदाचित या सांस्कृतिक ऐक्याचा उद्देशच तसा असावा.
हे सांस्कृतिक ऐक्य निर्माण करणाऱ्यांना येथील जातीव्यवस्था मात्र दिसली नाही. ज्या समाजात या जातिव्यवस्थेमुळे अनेकांना पशूपेक्षाही हीन जीवन वाट्याला आले होते त्या समाजातील सांस्कृतिक ऐक्य काय कामाचे? अनेक राज्यांमध्ये विभागलेल्या या देशातील प्रजा आपल्या राजाशीही नाते प्रस्थापित करू शकली नव्हती. (याला अपवाद फक्त शिवाजी महाराजांचा.) त्यामुळेच परकीय आक्रमणांच्या वेळी या सांस्कृतिकदृष्ट्या एक असलेल्या प्रजेने कोणतेही राज्य वाचविण्याचा प्रयत्न केलेला नाही. अशा सांस्कृतिक ऐक्याचे गोडवे कशासाठी गायचे? असंख्य देव, रूढी, अंधश्रद्धा, जातीव्यवस्था या सांस्कृतिक बाबी समान असणारा हा समाज तथाकथित एकत्वाची बढाई मारत असला तरी या बाबींनी या समाजाला चैतन्यहीन करून टाकले आहे.
धार्मिकदृष्ट्या तरी हा समाज एक होता काय! शैव आणि वैष्णव यांच्यातील पराकोटीचा संघर्ष, बौद्धांचा जैनांचा झालेला जीवघेणा छळ या बाबी शेषराव मोरे यांचे सांस्कृतिक ऐक्य ते  दाखवितात तेवढे मोहक नाही, हेच सिद्ध करतात.

मोऱ्यांच्या सांस्कृतिक ऐक्याला एक भारत प्रस्थापित करण्यासाठी ब्रिटीशांची वाट का बघावी लागली, या प्रश्नांचे उत्तरही द्यावे लागेल. सर्वांना समान असणाऱ्या मागास रूढी, अंधश्रद्धा, जातीव्यवस्था, धर्मव्यवहारपद्धती या सारख्या बाबींनी भारतीयांमध्ये समानता निर्माण केलेली आहे. थोडक्यात या सांस्कृतिक ऐक्याचा आधार अशा बाबी ठरलेल्या आहेत. परंतु हे ऐक्य मनांचे नाही. बाहेरून बघणाऱ्यांना भारतीय समाजात एक प्रकारची समानता दिसत असली तरी भारतीयांमध्ये मात्र असंख्य भेदांची बजबजपुरी माजलेली आहे, हे स्पष्ट आहे. शेषराव मोरे यांच्या सांस्कृतिक ऐक्याने त्याच्यावर कोणताही परिणाम केलेला नाही.

भारतीयांमधील अंधश्रद्धा, जुनाट रूढी, धार्मिक कर्मकांड, जातीअधिष्ठित समाजरचना  इत्यादी सांस्कृतिक बाबींचे ऐक्य म्हणजे मोरे यांचे सांस्कृतिक ऐक्य होय.

No comments:

Post a Comment