Wednesday, 2 March 2016

अर्थसंकल्प आणि ग्रामीण भारत।

बहुत्येक देश ग्रामीण भागात वसतो, हे अर्थसंकल्पाने मान्य केल्याचे दिसून येते. सकल राष्ट्रीय उत्पादनात कृषी क्षेत्राचे योगदान अगदी तुटपुंजे असले तरी त्यावर ६५% लोकांची उपजीविका चालते हे अतिशय मत्त्वाचे आहे. त्यामुळे कृषीक्षेत्राचे  महत्त्व हे सकल राष्ट्रीय उत्पादनातील त्याच्या वाट्यावर  अवलंबून नसून ते क्षेत्र किती लोकांना जगवते यावर अवलंबून आहे.
अर्थसंकल्पाद्वारे ग्रामीण भारतासाठी भरीव तरतूद केली असली तरी ही तरतूद कशाप्रकारे खर्च केल्या जाते यावर या तरतुदीचे मत्त्व अवलंबून असेल. विविध योजनांच्या  अंमलबजावणीचे यश हे सरकारच्या इच्छाशक्तीवर अवलंबून आहे. सरकारचा हा संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी सरकारला प्रशासकीय यंत्रणेवर अवलंबून राहणे भाग आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणा सक्षम व परिपूर्ण असणे आवश्यक आहे. रिक्त जागा ठेवून किंवा भरतीवर बंदी घालून यंत्रणेत सक्षमता आणता येणार नाही, हे पक्के लक्षात ठेवले पाहिजे. कर गोळा करणे असो की सरकारी योजनांची अंमलबजावणी असो, माणसे लागणारच. त्याशिवाय कागदावरील योजनांना किंवा तरतुदींना काडीचाही अर्थ राहणार नाही. म्हणूनच  केवळ आकर्षक अर्थसंकल्पाने इच्छित साध्य प्राप्त करता येणार नाही हे आपल्या आतापर्यंतच्या अनुभवाने सिध्द होण्यासारखे आहे. अर्थसंकल्पावरील चर्चांचा आढावा घेतला असता अर्थसंकल्पाच्या अंमलबजावणीच्या पैलूला कोणी का स्पर्श करीत नाही, हे कळत नाही.
प्रशासन यंत्रणा सक्षम करण्याच्या दृष्टीने केवळ आवश्यक तेवढे  मनुष्यबळ पुरविणे एवढेच पुरेसे नाही तर या यंत्रणेत क्षमता, पारदर्शकता, लोकाभिमुखता, प्रामाणिकता येणे आवश्यक आहे. त्यासाठी सरकारने आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या पाहिजेत. सरकारचे यशापयश हे मुख्यत: या प्रशासकीय यंत्रणेच्या कामावरच अवलंबून असते. सरकारचा लोकांसामोरील चेहरा या प्रशासकीय यंत्रणेच्या रूपानेच व्यक्त होत असतो. आजच्या प्रशासकीय यंत्रणेतील अक्षमता, ढिसाळपणा, कमालीचा भ्रष्टाचार, टोकाची लोकाविन्मुखता सरकारची ध्येये प्राप्त करण्यात अडथळे ठरत आहेत.
कार्यक्षम अंमलबजावणीसाठी व्यवस्थेमध्येच Feedback ची यंत्रणा अंतर्भूत असणे आवश्यक आहे. त्यामुळे अंमलबजावणीची स्थिती, गती, दिशा, आणि त्यामध्ये येणारे अडथळे यांची वेळीच माहिती होऊ शकते. जेणेकरून योजनाची गती व दिशा आवश्यकतेप्रमाणे  बदलता येते व असलेले अडथळे दूर करता येणे शक्य होते.

सारांश, अर्थसंकल्पाचे यश हे अर्थसंकल्पाच्या स्वरूपापेक्षा त्याच्या अंमलबजावणीवर अवलंबून आहे, हे मान्य केले पाहिजे.