Tuesday 22 March 2016

मनात आले ते-


अ) एखाद्या महापुरुषांचा अनुयायी किंवा भक्त म्हणवून घ्यायचे असेल तर माझी भूमिका आणि वर्तन कसे असले पाहिजे? मला त्या महापुरुषांचे एकंदर विचार मान्य असावे लागतील. त्या महापुरुषांचे जीवनध्येय हे माझे जीवनध्येय बनले पाहिजे. त्या महापुरुषांचे आदर्श हे माझे आदर्श असले पाहिजेत. त्या महापुरुषाला जे विचार-आचार मानवतेसाठी घातक वाटत आले आहेत ते   मलाही घातक वाटले पाहिजेत. आणि त्याविरुद्ध मला मन लावून झगडले पाहिजे.
केवळ त्या महापुरुषाचा एखादा विचार अधोरेखित करून व त्या  महापुरुषाच्या नावाचा जयजयकार करून त्यांचा भक्त बनता येईल काय? त्यांची केवळ  स्मारके उभी करून त्यांच्या अनुयायीपणावर हक्क सांगता येईल काय?
पण आजकाल अशाच अनुयायांची चलती असल्याचे दिसून येते. खरे अनुयायीसुद्धा यामागचे सत्य समजून न घेता हुरळून जात आहेत. असे दांभिक अनुयायी या  मार्गाने त्या महापुरुषांचा पराभव करायला निघाले आहेत, हे खऱ्या अनुयायांनी लवकरात लवकर समजून घेतलेले बरे.

ब) कोणत्याही गोष्टीबाबत कसा विचार करावा हे लोकांना समजावून सांगण्याची गरज आहे. खरे तर याची सुरुवात प्राथमिक शिक्षणापासूनच केली पाहिजे. एखाद्याची चूक दाखविली तर ती व्यक्ती आपल्या चुकीबाबत न बोलता चूक दाखविणाऱ्याने यापूर्वी अशा चुका केलेल्या आहेत, हे दाखविते. आपण पण त्यावर प्रभावित होतो. आपण असा का विचार करीत नाही की, त्याच्या चुकीचे काय? त्या चुकीचा जबाब तर त्याने दिलाच नाही. आपण या चालू नेत्यांना पकडले पाहिजे.

क)चाकोरीबाहेरचा विचार आपल्याला पेलवत नाही. आपली विशिष्ट विचारसरणी, आपले पूर्वग्रह, तसेच आपल्या तथाकथित अस्मिता याला कारणीभूत असाव्यात. डेन्मार्क, स्वीडन आदी देशांतील सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक अवस्थेविषयी कौतुक केले की त्यात काय एवढे? त्यांचा आकारच केवढा? आपली तुलना त्यांच्याशी कशी होईल, असे अनेक मुद्दे  पुढे केले जातात. मग आपणही आपल्या देशाचे छोटे छोटे घटक करूयात. म्हणजे कामाची अंमलबजावणी आणि नियंत्रण परिणामकारक होईल. पण नाही. छोट्या घटकाचे नाव काढले तरी आपल्या फुकटच्या अस्मिता उफाळून येतात. आणि आपण असा विचार करणाऱ्यांचा जीव घ्यायला उठतो. दुर्दैव, दुसरे काय?


असाच एक भयानक विचार. काश्मीरप्रश्नामुळे आपला देश सातत्याने अस्थिर राहिला आहे. आपली अमाप साधनसंपत्ती काश्मीरच्या प्रश्नावर खर्च होत आहे. आपले कित्येक सैनिक काश्मीरमध्ये मृत्युमुखी पडत आहेत. अशा परिस्थितीत तेथील लोकांना काय वाटते यावर काश्मीरचा निर्णय घेतला तर! खरे तर पूर्वी तसेच ठरले होते. पण आपण आज असा विचारही करू शकत नाहीत. असे करून आपण काय साध्य करीत आहोत कोण जाणे !

No comments:

Post a Comment