Monday 2 November 2015

स्वामी विवेकानंद यांना समजून घेताना.

सामान्य भारतीयांच्या मनात स्वामी विवेकानंदांची प्रतिमा ‘हिंदू धार्मिक नेता’ अशीच असते. प्रत्यक्षात स्वामी विवेकानंद कोण होते, हे समजावून घ्यायचे असेल तर त्यांचे चरित्र आणि विचार मुळातूनच वाचले पाहिजेत. खरे विवेकानंद भारतीय समाजासमोर का येऊ शकले नाहीत, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि आपल्या देशाचे ते एक दुर्दैवच म्हणावे लागेल. स्वामी विवेकानंदांना समजून घेण्यासाठी त्यांची वक्तव्ये आपल्याला  उपयोगी ठरतील. त्या दृष्टीने मी त्यांची  काही वक्तव्ये उदधृत करणार आहे.
रामनदचे राजे ‘भास्कर सेतुपती’ यांना उद्देशून-  “ मोक्ष हेच संन्याशाचे लक्ष्य असले तरीही, भारतवर्षातील जनतेची उन्नती करण्याचा प्रयत्नदेखील मोक्षप्राप्तीचे एक साधन होय”
म्हैसूरच्या महाराजांना २३-०६-१८९४ रोजी शिकागोहून लिहिलेल्या पत्रातील काही अंश—
“भारताच्या सर्व प्रकारच्या दुर्गतीचे मूळ कारण आहे, तेथील दरिद्री सर्वसाधारण जनतेची दु:स्थिती. .....खालच्या म्हणून गणल्या जाणाऱ्या जातींच्या बाबतीत आमचे एकमेव कर्तव्य म्हणजे त्यांना शिक्षण देणे, त्यांच्या व्यक्तित्वाचा विकास करणे, हे होय. त्यांना हेच शिकवावे लागेल की, तुम्हीही माणसे आहा,.....या लोकांची ही जाणीवच मुळी हरपून गेली आहे. आपल्या देशातील कार्यकर्त्यांपुढे आणि राजांपुढे सेवेचे हे विस्तृत क्षेत्र पसरलेले आहे. आजपावेतो या दिशेने काहीच हालचाल झालेली नाही. पुरोहित-पंड्यांच्या आणि विदेशी राजशक्तींच्या पायाखाली शतकानुशतके सतत तुडविले गेल्यामुळे हे (खालचे गणले जाणारे) लोक विसरून गेले आहेत की तेही मनुष्यच होत. ......पुष्कळ दिवसांपासून माझ्या मनात याच (खालच्या म्हणून गणल्या जाणाऱ्या लोकांसंबंधी) कार्यासंबंधीच्या कल्पना सारख्या घोळत आहेत. त्यांना प्रत्यक्षात उतरविण्याचा उपाय मला भारतात आढळेना म्हणून मी या देशात(अमेरिकेत) आलो आहे. ......ही दरिद्री मुले शिक्षणकेंद्रावर येऊ शकत नसतील तर शिक्षणच त्यांच्या घरी न्यावे लागेल.”
या पत्रात स्वामीजींनी त्यांचा अमेरिकेत जाण्याचा उद्देश स्पष्ट केलेला आहे. आपल्याला उगीचच वाटते की स्वामीजी हिंदू धर्माची पताका फडकाविण्यासाठीच अमेरिकेत गेले.
आणखी काही उद्धरणे-----
१०-०७-१८९३ रोजी जपानहून त्यांच्या मद्रासी शिष्याला लिहिलेल्या पत्रात  स्वामी विवेकानंद लिहितात.
“(भारतीय सुशिक्षितांना उद्देशून-) ह्या हजारो वर्षांच्या साचलेल्या खुळचट समजुतींचा बोजा डोक्यावर घेऊन बसला आहात. शतकानुशतके खाद्य-अखाद्याचा विचार करण्यात सारी शक्ती बरबाद करीत आहात. पुरोहितगिरीरुपी महामुर्खपणाच्या भोवऱ्यात गरगरा चक्कर खात आहात. ......या, मनुष्य व्हा. आधी त्या दुष्ट पुरोहितांना दूर करून टाका. कारण हे बिनडोक्याचे लोक कधीही चांगल्या गोष्टी ऐकायला तयार व्हायचे नाहीत. त्यांचे हृदयही शून्य होऊन बसलेले आहे. त्याचा विकास-विस्तार कधीही होणे शक्य नाही. शेकडो शतकांच्या खुळचट समजुतींमध्ये आणि अत्याचारांमध्ये यांचा जन्म—आधी यांना बाजूस सारा.”
त्यांनी एका ठिकाणी लिहिले आहे-
“(आपल्या अनुयायांना उद्देशून-) लक्षावधी, कोट्यावधी दारिद्र्यपीडितांच्या हृदयातील वेदनेची स्वत:ला जाणीव होऊ द्या, निष्कपट होऊन त्यांच्यासाठी भगवंताजवळ सहाय्यार्थ प्रार्थना करा- साहाय्य लाभेलच लाभेल. वर्षांमागून वर्षे ह्याच चिंतेचा भार डोक्यावर,आणि ह्याच दु:खाचा भार हृदयामध्ये बाळगून मी सारखे भ्रमण केले आहे. तथाकथित धनी आणि मोठ्या लोकांच्या दारोदार फिरलो आहे. आणि अखेरीस हृदयाचे रक्त सांडत सांडत अर्धी अधिक पृथ्वी पायाखाली तुडवून या सुदूर विदेशी (अमेरिकेत) साहाय्यलाभाच्या आशेने येऊन उपस्थित झालो आहे. ......मी कदाचित या परदेशात थंडीने आणि उपासमारीने मारूनही जाईन, परंतु हे युवकांनो! आपल्या या दरिद्री, पतित आणि रंजल्यागंजल्या बांधवांसाठी प्राण पणास लावून प्रयत्न करण्याचा वारसा मी तुम्हा सर्वांसाठी मागे ठेवून जात आहे. तुम्ही या तीस कोटी नर-नारींच्या उद्धाराचे व्रत घ्या”

वरील उद्धरणावरून स्वामीजींचा खरा जीवनोद्देश काय होता आणि त्यांना आपल्याकडून काय अपेक्षित होते, हे स्पष्ट होते. त्यांचे अनुयायी म्हणवून घेणारे त्यांच्या अपेक्षा पूर्ण करायला तयार आहेत काय, हा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही.

No comments:

Post a Comment