Sunday 18 October 2015

ब्राह्मणेतरांमध्ये प्रामुख्याने दोन गट पडतात. एक गट स्थितीवादी आहे. ते आर्थिकदृष्ट्या बऱ्या स्थितीत असतात किंवा सामाजिक इतिहासाविषयी बऱ्यापैकी अनभिज्ञ असतात. दुसरा गट बंडखोर आहे. इतिहासाची थोडीफार तरी जानकारी यांना असते. हे क्रियाशील असतात. पण यांची क्रियाशीलता इतकी तीव्र असते की ते चटकन टोकाच्या  निष्कर्षांवर येतात.
१)      स्थितीशील ब्राह्मणेतरांना बहुत्येक वेळा इतिहासातील समांतर प्रवाहाची जाणीव नसते. ते मुख्य प्रवाहातील विचारांनीच प्रभावित झालेले असतात.
२)      दुसऱ्या टोकावरील थोड्या प्रमाणात असलेल्या बंडखोर  ब्राह्मणेतरांचा  ‘इतिहासातील सर्व पापे ब्राह्मणांनीच केलेली आहेत’ यावर पूर्ण विश्वास असतो.
३)      सर्वच ब्राह्मण कावेबाज असतात, याची त्यांना खात्रीच असते. त्यामुळे कोणी ब्राह्मण सद्हेतूनेच केवळ काही विचार मांडत असेल यावर त्यांचा विश्वास बसने शक्य होत नाही.
४)      ब्राह्मणांवर टीकाच करायची असल्याने ते त्यांचे चुकीचे संदर्भ आधारासाठी घेतात. आणि या संदर्भांचा सरळ अर्थ न लावता वाकड्यात घुसतात. त्यांच्या मते हाच त्या संदर्भांचा गर्भितार्थ आहे. खरे तर यांना ब्राह्मणांना अचूकपणे पकडताच येत नाही.
५)      परंपरांना ते आवर्जून विरोध करतात. मग त्या काही वेळा चांगल्या असल्या तरी. त्यासाठी त्या परंपरांचा ते स्व अर्थ साधक असा अर्थ लावतील. बहुजन समाजाने मोठ्या प्रमाणात स्वीकृत केलेल्या काही परंपरांचा ते ब्राह्मण विरोधी असा अर्थ लावतील.
६)      ब्राह्मणेतरांच्या मधील बहुसंख्य ब्राह्मणेतर या बंडखोर ब्राह्मणेतरांना विरोध करतात किंवा उपेक्षा तरी करतात. पुरंदरे प्रकरणात विश्वास पाटील आठवावेत.
७)      अशा बहुत्येक ब्राह्मणेतरांना परंपरेचा भाग व्हायला आवडते.
८)      अशा  ब्राह्मणेतरांना वाद नको असतात. सगळे गोडी गोडी असणे त्यांना निर्धोक वाटते. बहुत्येक करून अशी मंडळी आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असतात. किंवा प्रस्थापित व्यवस्थेत त्यांना आपापल्या जागा प्राप्त झालेल्या असतात.
९)      ब्राह्मणेतरांमधील या फुटीमुळे- जसे सर्वच ब्राह्मण पुरंदरेंना पाठींबा देतात तसे सर्व ब्राह्मणेतर पुरंदरेंना विरोध करीत नाहीत. त्यातील विश्वास पाटलांसारखे काहीजण तर पुरंदरे यांचे कट्टर समर्थकही असतात.
१०)  ब्राह्मणेतरांमधील बंडखोर ब्राह्मणेतर दलित आणि मुस्लीम यांच्याबद्दल बरे बोलत असतात. ब्राह्मणांच्या विरुद्ध लढावयाच्या लढ्यात त्यांना दलित आणि मुस्लीम यांना सोबत घ्यावयाचे आहे. इतर ब्राह्मणेतर मात्र दलित आणि मुस्लीम यांच्याबाबत खाजगीत प्रतिकूल शेरे मारीत असतातच.
११)  बंडखोर ब्राह्मणेतर हे प्राय: हिंदुत्ववादाविरोधी असतात. त्यामुळे हे  हिंदुत्ववादी विचार व विचारवंत यांच्याविरुद्ध तुटून पडतात. हिंदुत्वाची मांडणी करणारे सावरकर किंवा शिवाजी महाराजांची हिंदू राजा अशी प्रतिमा  रंगविणारे  पुरंदरे म्हणूनच त्यांच्या टोकाच्या टीकेचे लक्ष्य ठरतात. मग सावरकरांचे निरातिशय देशप्रेम व इतर गुण  त्यांना महत्त्वाचे वाटणार नाहीत. किंवा शिवचरित्र लोकप्रिय करण्याचे श्रेयही ते पुरंदरेंना देणार नाहीत.

जाता जाता – मला वाटते, ब्राह्मण व ब्राह्मणेतर यांचे एकमेकाविरुद्ध टोकांवर असणे हे क्रिया-प्रतिक्रियांचा खेळ आहे काय? एकाने टोकावर जाऊन क्रिया व्यक्त केली की दुसरा गट दुसऱ्या टोकावर जाणारच. समतोल विचार करताच येणार नाही काय?

No comments:

Post a Comment