Thursday, 15 October 2015

ब्राह्मणी दृष्टिकोन म्हणजे दृष्टीचा कोणता कोण?

अनेकांच्या बोलण्यात आणि लिहिण्यात ‘ब्राह्मणी विचार’, ‘ब्राह्मणी दृष्टिकोन’ असे शब्द सहजपणे येतात. परंतु या शब्दांचा नेमका अर्थ काय, याचा फारसा विचार कोणी करताना दिसत नाही. मी अनेक ब्राह्मणेतरांशी या विषयावर बोललो. त्यांना या शब्दांचा काय अर्थ अभिप्रेत आहे, यावर चर्चा केली. अशा चर्चांमधून ब्राह्मणेतरांच्या दृष्टीकोनातून वरील शब्दांचा मला समजलेला अर्थ पुढीलप्रमाणे मांडीत आहे. चुकल्यास क्षमस्व. 
१)      ब्राह्मण बव्हंशी ‘परम्पराभिमानी’ असतात. या देशातील मुख्य समजल्या जाणाऱ्या प्रवाहातील विचार, इतिहास त्यांना प्रिय असतात. समांतर परंपरा, जसे चार्वाक, बुद्ध, बसवेश्वर, चक्रधर, कबीर इत्यादिसारख्यांविषयी ते फारसे प्रेम व्यक्त करीत नाहीत.
२)      ते जातिभेदाचा निषेध करतात, पण हळूच चातुर्वर्ण्याविषयी soft corner व्यक्त करतात किंवा चातुर्वर्ण्याचा नि:संदिग्धरित्या निषेध करीत नाहीत. चातुर्वर्ण्य हे मुळात आदर्श व शास्त्रीय आहे, असे सांगण्याचा मोह त्यांना बऱ्याच वेळा आवरत नाही.
३)      ते बहुत्येक करून हिंदुत्ववादी असतात. यात त्यांना ‘परंपरागत हिंदू माणूस’ अभिप्रेत असतो. यांचा हिंदुत्वाचा पाया बऱ्याच प्रमाणात ‘मुस्लिमद्वेष’ हा असतो.
४)      मनुस्मृतीचा कितीही निषेध करीत असले तरी दुरान्वयाने  तरी मनुस्मृतीचे  गुणगान केल्याशिवाय राहत नाहीत.
५)      लोकप्रिय महापुरुषांना परंपरागत हिंदू म्हणून पाहण्यात त्यांना आनंद वाटतो. उदाहरणार्थ, शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, सरदार पटेल.
६)      जन्माने ब्राह्मण असलेल्या महापुरुषांना ब्राह्मणेतर महापुरुषांच्या तुलनेत, कळत किंवा नकळत, अधिक महत्त्व देऊन जातात.  ज्ञानेश्वरांच्या तुलनेत नामदेवांचे मूल्यमापन करताना कमी पाने खर्च होतात. तसेच रामदासांच्या तुलनेत तुकारामांचे मूल्यमापन करण्यासाठी कमी शब्द पुरतात.
७)      स्वातंत्र्य, समता, बंधुता धर्मनिरपेक्षता इत्यादी मुल्यांचा स्रोतही त्यांना भारतीय इतिहासातच सापडतो. परंतु या मुल्यांचा फारसा आग्रह धरताना मात्र ते दिसत नाहीत.
८)      यातील काहीजण ब्राह्मणांनाही शिव्या देतात. असे वाटते की हे खरोखरच ब्राह्मणी प्रभावापासून मुक्त झालेले आहेत. पण ते शेवटी किंतु-परंतुने आपल्या लिखाणाचा शेवट करतात आणि जे सांगायचे ते सांगतातच.
९)      हे जात्याच हुशार असतात. कोणतेही लिखाण करताना अवाजवी किंवा आक्षेपार्ह शब्द, विधाने टाळूनही वाचकांना जे द्यायचे ते देतातच. असे लिखाण वाचून जो एकंदर प्रभाव निर्माण होतो तो ब्राह्मणेतर किंवा पुरोगामी यांना आवडत नाही. परंतु या प्रभावाला विरोध करण्यासाठी या ब्राह्मणेतरांना अशा लिखाणात नि:संदिग्ध पुरावे मात्र सापडत नाहीत.

पुरंदरे यांच्या शिवचरित्राने जनमानसांत शिवाजी महाराजांची जी हिंदुत्वप्रधान प्रतिमा निर्माण झालेली आहे ती पुरोगाम्यांना व ब्राह्मणेतरांना आवडत नाही. परंतु पुरंदरेंच्या विरोधात बोलताना त्यांना स्पष्ट संदर्भ मात्र सापडत नाहीत. मग ही ब्राह्मणेतर मंडळी आवश्यक असे संदर्भ कुठेतरी शोधण्याचा प्रयत्न करतात. असे करताना काहीतरी चुका करतात. आणि अशा चुका शोधण्यात संजय सोनवणी सारखे आपली विद्वत्ता व बुद्धिमत्ता खर्च करतात.
१०)  दलित-पिडीत-शोषित यांच्याविषयी सहानुभूती व्यक्त करतीलच, पण सामाजिक असंतोषातून निर्माण होणाऱ्या विद्रोहाबाबत मात्र असमाधान व्यक्त करतील. दलितांसाठी देवाचे दार बंद असेल तर ते उघडण्यासाठी बंड न करता वेगळेच मंदिर बांधतील.
११)  हे गांधी-नेहरूवर टीका करायची एकही संधी सोडणार नाहीत, पण त्या त्या वेळी बाबासाहेब आंबेडकरांची आवर्जून स्तुती करतील. परंतु असे करताना बाबासाहेबांचा विद्रोह, प्रभंजन या बाबींना मुळीच  high light  करणार नाहीत.
जाता जाता-
पुरंदरे प्रकरणात पुरंदरेंच्या समर्थनासाठी बहुसंख्य ब्राह्मण मैदानात उतरले असले तरी त्यामध्ये लक्षणीय प्रमाणात ब्राह्मणेतरांचाही समावेश होता. तथापि पुरंदरेंना विरोध करणाऱ्यांमध्ये मात्र एकही ब्राह्मण नव्हता. असे का व्हावे?