Saturday, 1 November 2014


आजकाल लोक फार धार्मिक झाल्याचे आढळून येते. पण ते खरेच धार्मिक आहेत काय? ते खरोखरच देव मानतात काय?

देवाला मानणे  म्हणजे केवळ देवाचे अस्तित्व मानणे नव्हे. एक सर्वशक्तिमान,सर्वसाक्षी व न्यायी असे व्यापक अस्तित्व म्हणजे देव होय. अशा देवाला आपण खरोखरच मानतो काय? कारण आपण अशा देवाला मनात असतो तर आपल्या हातून वाईट गोष्टी घडल्याच नसत्या. कारण असा देव सर्वसाक्षी असतो आणि त्याला काळा बाजार, फसवणूक,भ्रष्टाचार,खोटेपणा,दांभिकता या बाबी दिसणारच.  तसेच तो सर्वशक्तिमान असल्यामुळे अशा वाईट गोष्टीसाठी तो आपल्याला शिक्षा करणारच.  देव मानणाऱ्याने हे मानलेच पाहिजे. किंबहुना, असे मानले तरच तो देव मानतो, असे मानायला हवे. असा आस्तिक माणूस वाईट कृत्ये करणे शक्यच नाही. म्हणून मला वाटते वाईट कृत्ये करण्यात लाज न बाळगणारी तथाकथित धार्मिक मनसे खऱ्या अर्थाने धार्मिक नसतातच. ते देवालाही आपल्यासारखेच करप्ट समजत असावेत. असा देव अस्तित्वात असू शकत नाही. आणि अशा देवाला देव तरी कसे मानता येईल. त्यामुळे भ्रष्टाचार, खोटेपणा,लुबाडणूक, दांभिकता करून देवाच्या मंदिरात जाऊन केलेली प्रार्थना निरर्थकच ठरणार. अशी आराधना न केलेली बरी. तुमची देवावर खरोखरच श्रद्धा असेल तर तुम्ही वाईट वागूच शकत नाही. सद्गुण अंगी बाणविण्याची प्रक्रिया म्हणजेच देवाची आराधना होय. बाकी सगळे व्यर्थ होय.

वाईट कामे करून धार्मिकतेची आस धरणारी व्यक्ती देव आणि धर्म यांची थट्टा करते, यात शंका नाही.