Tuesday 20 May 2014

पंडित  नेहरू यांची पुण्यतिथी नुकतीच पार पडली.  भारत-चीन संघर्ष , काश्मीर प्रश्न , त्यांचे तथाकथित व्यक्तिगत चारित्र्य या सारखे विषय घेऊन त्यांच्यावर टीका करणे ही अलीकडील फ्याशन झालेली आहे. आज आपण पंडित नेहरुविषयी वेगळा विचार करूयात.
तत्कालीन भारताच्या आर्थिक- सामाजिक स्थितीचा विचार करून नेहरूंनी भारताचा आर्थिक विकास ही प्राथमिकता निश्चित केली. खाजगी क्षेत्रातील भांडवलाचा अभाव लक्षात घेऊन त्यांनी मिश्र अर्थव्यवस्थेचा अंगीकार करणे स्वाभाविकच होते. आज जरी मिश्र अर्थव्यवस्था कालबाह्य वाटत असली तरी त्या काळाची  ती आवश्यकता असल्याचे त्यांनी ओळखले होते. तत्कालीन मागासलेपणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पुरस्कार तसेच विज्ञान संशोधनाला प्राधान्य देऊन सरकारी क्षेत्रात पायाभूत उद्योग सुरु केले. आपल्या देशाची  कृषी प्रधानता लक्षात घेऊन मोठमोठी  धरणे बांधण्यास सुरुवात केली.
आर्थिक विकासाला पोषक स्थिती निर्माण करण्याच्या उद्देशाने त्यांनी अलीप्ततावादाचा पुरस्कार केला. थोडक्यात, संरक्षणविषयक प्रश्न त्यांनी अलिप्ततावादाच्या सहाय्याने सोडविण्याचा प्रयत्न केला. तत्कालीन भारताच्या आर्थिक दुरावस्थेच्या पार्श्वभूमीवर संरक्षणविषयक प्रश्न सोडविण्याचा एवढा सुलभ व स्वस्त असा दुसरा पर्याय त्यांच्यापुढे नव्हता.
आर्थिक विकास ही प्राथमिकता निश्चित करून त्या ध्येयाला वाहून घेतल्यामुळे त्यांचे इतर प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले. यात काश्मीर प्रश्न तसेच चीनचा धोका यांचाही समावेश होता. त्यामुळे नेहरू विरोधकांच्या टीकेचे धनी झाले. तथापि त्यांनी त्यावेळी निश्चित केलेली प्राथमिकता ही त्यांच्या दूरदृष्टीची द्योतक होती. त्यामुळेच नवभारताची उभारणी करण्यात नेहरूंचे योगदान अतुलनीय अशा स्वरूपाचे होते हे  मानले पाहिजे.

No comments:

Post a Comment