Saturday, 24 May 2014

एका मतदाराच्या दृष्टीकोनातून--
मी एक मतदार-
काँग्रेसचा भ्रष्टाचार,कुशासन, अव्यवस्था, कमालीची निष्क्रियता, इत्यादी बाबींना कंटाळलो,वैतगलो.
काँग्रेस हा पक्ष कोणत्याही स्वरुपात उपयोगी नाही,या निर्णयाप्रत आलो.
तथापि काँग्रेसला पर्याय काय, या गोष्टीवर अडखळलो.
मध्येच केजरीवालांच्या रूपाने एक पर्याय दिसला आणि त्यांना मी डोक्यावर घेतले.
पण प्रचंड निराशा.
आणि एवढ्यात मोदींच्या रूपाने एक पर्याय दिसला.
नाहीतरी मला एक पर्याय हवा होताच. अशा कोणत्याही पर्यायाचा मला स्वीकार करायचा होताच.
अशावेळी मोदी प्रभावीपणे समोर आले .
मोदींचे प्रभावी सादरीकरण मला भावले.
अन माझे मत मी मोदींना सहर्ष अर्पण केले.
हे करताना  ---------
मी उमेदवार कोण हे फारसे लक्षात घेतले नाही.
उमेदवाराचे चारित्र्य आणि कर्तृत्वही पाहिले नाही.
भ्रष्टाचाराकडेही थोडा कानाडोळाच केला.
एवढेच काय, दुसऱ्या पक्षाच्या चारित्र्यवान किंवा कर्तृत्ववान उमेदवाराकडेही दुर्लक्षच केले.
आश्चर्य म्हणजे मी उमेदवाराची जातही पाहिली नाही.
तसेच हे करताना ---
रुपयाचे अवमुल्यन, गंभीर स्वरूप धारण करणारी व्यापार तुट, सामाजिक समरसता, संपत्तीचे न्यायोचित वितरण या बाबत कोण काय बोलले किंवा  किंवा कोण काहीच बोलले नाही, याकडेही  दुर्लक्षच केले.
कारण ---
मला कोणत्याही परिस्थितीत काँगेसला पर्याय हवा होताच.

Tuesday, 20 May 2014

पंडित  नेहरू यांची पुण्यतिथी नुकतीच पार पडली.  भारत-चीन संघर्ष , काश्मीर प्रश्न , त्यांचे तथाकथित व्यक्तिगत चारित्र्य या सारखे विषय घेऊन त्यांच्यावर टीका करणे ही अलीकडील फ्याशन झालेली आहे. आज आपण पंडित नेहरुविषयी वेगळा विचार करूयात.
तत्कालीन भारताच्या आर्थिक- सामाजिक स्थितीचा विचार करून नेहरूंनी भारताचा आर्थिक विकास ही प्राथमिकता निश्चित केली. खाजगी क्षेत्रातील भांडवलाचा अभाव लक्षात घेऊन त्यांनी मिश्र अर्थव्यवस्थेचा अंगीकार करणे स्वाभाविकच होते. आज जरी मिश्र अर्थव्यवस्था कालबाह्य वाटत असली तरी त्या काळाची  ती आवश्यकता असल्याचे त्यांनी ओळखले होते. तत्कालीन मागासलेपणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पुरस्कार तसेच विज्ञान संशोधनाला प्राधान्य देऊन सरकारी क्षेत्रात पायाभूत उद्योग सुरु केले. आपल्या देशाची  कृषी प्रधानता लक्षात घेऊन मोठमोठी  धरणे बांधण्यास सुरुवात केली.
आर्थिक विकासाला पोषक स्थिती निर्माण करण्याच्या उद्देशाने त्यांनी अलीप्ततावादाचा पुरस्कार केला. थोडक्यात, संरक्षणविषयक प्रश्न त्यांनी अलिप्ततावादाच्या सहाय्याने सोडविण्याचा प्रयत्न केला. तत्कालीन भारताच्या आर्थिक दुरावस्थेच्या पार्श्वभूमीवर संरक्षणविषयक प्रश्न सोडविण्याचा एवढा सुलभ व स्वस्त असा दुसरा पर्याय त्यांच्यापुढे नव्हता.
आर्थिक विकास ही प्राथमिकता निश्चित करून त्या ध्येयाला वाहून घेतल्यामुळे त्यांचे इतर प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले. यात काश्मीर प्रश्न तसेच चीनचा धोका यांचाही समावेश होता. त्यामुळे नेहरू विरोधकांच्या टीकेचे धनी झाले. तथापि त्यांनी त्यावेळी निश्चित केलेली प्राथमिकता ही त्यांच्या दूरदृष्टीची द्योतक होती. त्यामुळेच नवभारताची उभारणी करण्यात नेहरूंचे योगदान अतुलनीय अशा स्वरूपाचे होते हे  मानले पाहिजे.

Wednesday, 30 April 2014

मानवी समाजातील बहुत्येक समस्या या शोषणातून निर्माण होतात. शोषणाची आवश्यकता चंगळवादाच्या आकर्षणातून निर्माण होते.
तर मग या चंगळवादाचे आव्हान  पेलायचे कसे?

Tuesday, 29 April 2014

मानवी जीवनातील अनाकलनीय बाबी,अनिश्चितता, असुरक्षितता,अज्ञान आणि शेवटी निश्चित असा मृत्यू या बाबी माणसाच्या मनात भीती निर्माण करतात. अशा परिस्थितीत माणसाचे आस्तिक (देवाचे अस्तित्व मानणे ) असणे मला स्वाभाविक वाटते.

खरे कौतुक वाटते ते चार्वाकांचे. आजच्या पेक्षाही अधिक अनिश्चित मानवी जीवनातही ते देवाच्या अस्तित्वाला नि:सन्दिग्धरित्या नाकारतात. देव मानण्यापेक्षाही  असे करणे अधिक  कठीण आहे, असे मला वाटते.

आपल्या देशात अशीही एक परंपरा असणे, हे आपल्या बहुसांस्कृतिक देशाचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे, यात शंका नाही. 

Sunday, 8 December 2013

नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीच्या परिणामाला Modi  Factor  पेक्षाही राज्यकर्त्याची भोंगळ आणि चुकलेली आर्थिक धोरणे, निष्क्रिय आणि दिशाहीन प्रशासन, अनिर्बंध प्रमाणात वाढलेली महागाई  आणि आकाशही व्यापणारा भ्रष्टाचार हीच कारणे महत्त्वाची ठरलेली असावीत.

इतरत्रही ''आप'' सारखा सक्षम पर्याय मिळाला तर Modi Factor ची कसोटी लागेल, यात शंका नाही.

अन्नसुरक्षा कायद्यासारख्या लोकप्रिय योजना आता लोकांना फसवू शकणार नाहीत, असे वाटते. जनसामान्याच्या जीवनात मूलगामी परिवर्तन घडवू आणणारी धोरणेच आता आकर्षक ठरतील किंवा ठरावित, असे वाटते.

हिंदुत्ववाद किंवा धर्मनिरपेक्षता या बाबीही आता फार प्रभाव टाकू शकतील , असे वाटत नाही.  राजकीय पक्षाच्या  हिंदुत्ववादाचा थोडा सकारात्मक आणि अधिक नकारात्मक आणि त्यांच्या धर्मनिरपेक्षतेचा थोडा सकारात्मक आणि थोडा  नकारात्मक,परिणामी शुन्य परिणाम होईल, असे वाटते. नवीन पिढीला यात फारसा रस नाही, हे राजकीय पक्षांनी शक्य तितक्या लवकर लक्षात घेण्याची गरज आहे. 

Sunday, 1 December 2013

जी बाब वैज्ञानिक पद्धतीद्वारे सिद्ध होऊ शकत नाही, तिला अस्तित्वात राहण्याचा अधिकार नाही. थोडक्यात अशी बाब अस्तित्वात असू शकत नाही. हा निष्कर्ष वैज्ञानिक दृष्टीकोनाची निष्पत्ती आहे.
याचा दुसरा अर्थ , ज्ञान मिळविण्याचा वैज्ञानिक पद्धतीशिवाय इतर मार्ग नाही, असाही निघतो. 
मानवी जीवनात आपल्याला आणि इतरांना असेही अनुभव आलेले असतात की , ज्यांचे वैज्ञानिक स्पष्टीकरण करता येत नाही. याचा अर्थ या प्रकारच्या अनुभवाचे कालांतराने वैज्ञानिक स्पष्टीकरण मिळणार आहे किंवा हे अनुभव म्हणजे केवळ आभास आहेत. 
बरेच अनुभव वैज्ञानिक नियमाशी पूर्णपणे विरोधी असतात. मग ते वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार  निश्चितपणे आभास ठरतात. 
आपल्याला काय वाटते?

Monday, 25 November 2013

भारतीय कार्मावादाचा सिद्धांत माणसाची कार्यप्रेरणा  नष्ट करतो. तो त्याला निराशाग्रस्त बनवितो . अशा प्रकारची सर्वसाधारण समजूत आहे. तथापि कर्मवाद समजून घेतल्यावरही आपल्याला असेच वाटते काय, हे पाहायला हवे.
कर्मवाद थोडक्यात--
१) केलेल्या प्रत्येक मानसिक, वाचिक, शारीरिक कर्माचे चांगले- वाईट फळ मिळतेच.
२) हे फळ मागच्या किंवा या जन्मात केलेल्या कर्माचे असून ते या जन्मात किंवा पुढील जन्मात  मिळू शकते.
३) चांगल्या कर्माचे फळ चांगले आणि वाईट कर्माचे फळ वाईट मिळते.
४) याचा अर्थ चांगले फळ मिळवायचे असेल तर चांगलेच कर्म करावे लागते
५) आपण सध्या दु:खात  असूत तर आपण आपल्या पूर्वी केलेल्या वाईट कर्माचे नियत फळ भोगत आहोत, असे समजावे. त्यासाठी इतरांना  दोष देण्याचे कारण नाही .
६) दु:खाच्या  परिस्थितीतही आपण चांगलेच काम करीत राहिलो तर आपल्याला या चांगल्या कामाचे फळ पुढे निश्चितपणे मिळणारच आहे. याचा अर्थ , दु:ख भोगून संपणारच आहे आणि चांगली स्थिती येणारच आहे .
७) आपण वाईट परिस्थितीत असताना वाईट वागलो तर आपली प्राप्त परिस्थितीतून विशिष्ट वेळी सुटका होइलही . परंतु आपण या परिस्थितीत असताना केलेल्या वाईट कर्माचे फळ आपणास पुढे निश्चितच मिळणार आहे.
कर्मवादाच्या वरील स्वरूपामुळे मला जगण्याचे पुढील तत्त्वज्ञान प्राप्त होऊ शकते.--
१) वाईट परिस्थितीत किंवा दु:खातही चांगले कर्म करणे मुळीच सोडू नये.
२) आपल्यावर इतर कोणामुळे दु:खी स्थिती ओढवली असली तरी सुडाची भावना न ठेवता आपण चांगलेच वागावे. कारण वाईट वागून तात्पुरते बरे वाटले तरी  पुढे दीर्घकाळाचे दु:ख ठेवलेलेच आहे.
थोडक्यात -----------
भारतीय कर्मवाद  व्यक्तीला नेहमीच चांगले कर्म करण्याची  प्रेरणा देतो.
तो व्यक्तीला कधीच निष्क्रिय किंवा निराशावादी बनवित नाही.
आपल्याला काय वाटते ?