Monday, 25 November 2013

भारतीय कार्मावादाचा सिद्धांत माणसाची कार्यप्रेरणा  नष्ट करतो. तो त्याला निराशाग्रस्त बनवितो . अशा प्रकारची सर्वसाधारण समजूत आहे. तथापि कर्मवाद समजून घेतल्यावरही आपल्याला असेच वाटते काय, हे पाहायला हवे.
कर्मवाद थोडक्यात--
१) केलेल्या प्रत्येक मानसिक, वाचिक, शारीरिक कर्माचे चांगले- वाईट फळ मिळतेच.
२) हे फळ मागच्या किंवा या जन्मात केलेल्या कर्माचे असून ते या जन्मात किंवा पुढील जन्मात  मिळू शकते.
३) चांगल्या कर्माचे फळ चांगले आणि वाईट कर्माचे फळ वाईट मिळते.
४) याचा अर्थ चांगले फळ मिळवायचे असेल तर चांगलेच कर्म करावे लागते
५) आपण सध्या दु:खात  असूत तर आपण आपल्या पूर्वी केलेल्या वाईट कर्माचे नियत फळ भोगत आहोत, असे समजावे. त्यासाठी इतरांना  दोष देण्याचे कारण नाही .
६) दु:खाच्या  परिस्थितीतही आपण चांगलेच काम करीत राहिलो तर आपल्याला या चांगल्या कामाचे फळ पुढे निश्चितपणे मिळणारच आहे. याचा अर्थ , दु:ख भोगून संपणारच आहे आणि चांगली स्थिती येणारच आहे .
७) आपण वाईट परिस्थितीत असताना वाईट वागलो तर आपली प्राप्त परिस्थितीतून विशिष्ट वेळी सुटका होइलही . परंतु आपण या परिस्थितीत असताना केलेल्या वाईट कर्माचे फळ आपणास पुढे निश्चितच मिळणार आहे.
कर्मवादाच्या वरील स्वरूपामुळे मला जगण्याचे पुढील तत्त्वज्ञान प्राप्त होऊ शकते.--
१) वाईट परिस्थितीत किंवा दु:खातही चांगले कर्म करणे मुळीच सोडू नये.
२) आपल्यावर इतर कोणामुळे दु:खी स्थिती ओढवली असली तरी सुडाची भावना न ठेवता आपण चांगलेच वागावे. कारण वाईट वागून तात्पुरते बरे वाटले तरी  पुढे दीर्घकाळाचे दु:ख ठेवलेलेच आहे.
थोडक्यात -----------
भारतीय कर्मवाद  व्यक्तीला नेहमीच चांगले कर्म करण्याची  प्रेरणा देतो.
तो व्यक्तीला कधीच निष्क्रिय किंवा निराशावादी बनवित नाही.
आपल्याला काय वाटते ? 

Wednesday, 20 November 2013

साचलेला किंवा साचू पाहणारा मानवी जीवनाचा प्रवाह प्रवाहित करणे, मानवी जीवनाची गुणवत्ता  लक्षनिय प्रमाणात वाढविणे तसेच तळातील माणसाला तिथून काढून मुख्य प्रवाहात आणणे ही आणि अशा स्वरुपाची उद्दिष्टे साध्य  करण्यात अत्युत्कृष्ट योगदान देणारी व्यक्ती ''भारतरत्न'' या पारितोषिकास पात्र ठरावी, असे वाटते .

मानवी जीवनाचे शारीरिक, मानसिक,वैचारिक,बौद्धिक, राजकीय,आर्थिक,धार्मिक, सांस्कृतिक,सामाजिक असे अनेक पैलू आहेत. मानवी जीवनाची  प्रगती म्हणूनच अशा अनेक पैलूवर अवलंबून असणे स्वाभाविक आहे.

क्रीडा , संगीत ही मानवी संस्कृतीची एकेक अंगे आहेत. केवळ कोणत्याही एका अंगाच्या प्रगतीमुळे मानवी जीवनाची सर्वंकष प्रगती होणे शक्य नाही.  अशा एकेक क्षेत्रात अत्युत्कृष्ट योगदान देणाऱ्यास त्या त्या क्षेत्रातील सर्वाच्च पारितोषिक बहाल करणे समजू शकते. परंतु "भारत रत्न '' हे पारितोषिक मात्र  मानवी जीवनाच्या सर्वंकष प्रगतीला प्रेरक ठरणाऱ्या महनीय व्यक्तीसाठी राखून ठेवणे आवश्यक आहे . अन्यथा या पारितोषिकाचे लवकरच अवमुल्यन झाल्याशिवाय राहणार नाही.

निवडणुकीवर डोळा ठेऊन लोकमताच्या लाटेवर आरूढ होणाऱ्या  नेतृत्वाकडून होणाऱ्या  या प्रकारच्या निर्णयातून देशाला काय संदेश मिळत आहे, याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. लोकमत घडविणे हे नेतृत्वाचे काम आहे,लोकमताच्या लाटेवर  आरूढ होऊन खुर्च्या टिकविणे नव्हे.

या देशातील तरुण वर्ग हा स्वत:ची जबाबदारी ओळखू शकत नाही  किंवा आंधळेपणाने तो ती टाळत आहे.  कोणाला तरी देव मानून, त्याच्यामध्ये स्वत:चे प्रतिबिंब पाहणे आणि त्याच्या खांद्यावर आपले सगळे ओझे टाकून निवांत होणे, ही भारतीयांची प्रवृत्ती आहे. विभूतीपुजा  हा आपला स्थायीभाव आपल्या चिकित्सेला अवकाश देत नाही.

आपल्या श्रद्धा, आपली भक्ती, आपले प्रेम या बाबी  आपल्या  चिकित्सेतील फार मोठे अडथळे आहेत. या बाबी म्हणजे आपल्या दृष्टीपुढील झापडे असून त्यामुळे आपल्याला आपल्या पुढील मार्ग तसेच आपले हित आणि आपले भवितव्य दिसू शकत नाही.

आपला देश आज खरोखरच अंधारात चाचपडत आहे. आपली शोकान्तिका म्हणजे आपण अंधारात चाचपडतो आहोत, हेच आपल्याला कळत नाही आणि कळले तरी आपण ते मान्य करीत नाही . यालाच आपण आपला सकारात्मक दृष्टीकोन म्हणतो. 

Thursday, 3 October 2013


वारकरी संप्रदायाला ब्राह्मणांनी हायजॅक केले. वारकरी संप्रदायाचे आजचे बहुतांश नेते ब्राह्मण आहेत, हा या हायजॅकिंगचाच परिणाम आहे . ब्राह्मण महानुभाव संप्रदायाला  हायजॅक करु शकले नाहीत.मग त्यांनी या पंथाचा द्वेष व बदनामी करण्यास सुरुवात केली. हा द्वेष तरी किती करावा? तर या द्वेषाचा व बदनामीचा एक इतिहास बनला.
मला वाटते, चक्रधरस्वामींनी मनुस्मृतीप्रणीत ‘ब्राह्मणश्रेष्ठत्व’ या तत्त्वाचा नि:संदिग्धरित्या विरोध केला. तसेच त्यांनी वेदाची अपूर्णता घोषित करून देवताजानित कर्मकांडांची निरर्थकता स्पष्ट केल्यामुळे ब्राह्मणी अर्थव्यवस्थेवर संकट आणून ठेवले.
ब्राह्मणी परंपरा काहीही सहन करू शकेल. तुम्ही कोणतेही तत्त्वज्ञान मांडा, कोणत्याही देवतांची आराधना करा. त्याविषयी या परंपरेला कोणताही आक्षेप नसतो. तथापि हे सर्व ब्राह्मणश्रेष्ठत्व, वेदप्रामाण्य, वर्णाश्रम धर्म, देवताजनित कर्मकांड या बाबी मान्य करून, त्यांचे आचरण करून, किमान ही चौकट मान्य करून त्या चौकटीत करा, असा या परंपरेचा आग्रह असतो.
मनुस्मृतिप्रणीत धर्मशास्त्राच्या या गाभ्यालाच स्वामींनी स्पष्टपणे विरोध केला. असा विरोध करताना त्यांनी कोणत्याही तडजोडी केल्या नाहीत किंवा तथाकथित समन्वयाचीही भूमिका घेतली नाही. त्यासाठी त्यांनी तत्कालीन धर्मसत्तेच्या प्रचंड विरोधाला तोंड दिले.
संतांनीही देवताभक्ती आणि देवताजानित कर्मकांड यांचा खणखणीत विरोध केला. परंतु संत या बाबतीत फार आग्रही राहू शकले नाहीत. संतांच्या समन्वयवादी दृष्टिकोनाची ही निष्पत्ती होती.
त्यामुळेच ब्राह्मण वारकरी पंथाला सहजपणे हायजॅक करू शकले व त्यांनी या पंथाला सनातनी धर्माचा एक भाग करून टाकले.
महानुभाव संप्रदायाला  हायजॅक करता आले नाही. मग परंपरेने या पंथाची पद्धतशीरपणे बदनामी करून त्याचे यशस्वीपणे खच्चीकरण केले. तडजोड करा, नाही तर उद्ध्वस्त व्हा, हे परंपरेचे धोरण आहे.
प्रसिद्ध विचारवंत प्रभाकर वैद्य यांचा ‘संतांनीसुद्धा वाळीत टाकलेला संतश्रेष्ठ चक्रधर’ हा ग्रंथ या विषयावर चांगलाच प्रकाश टाकतो.
चक्रधर स्वामींचे  विचार –
रज काळात स्त्रियांचा विटाळ मानणे अत्यंत हास्यास्पद ठरविले आणि आपल्या अनुयायांना तसे करू दिले नाही.
गाय पवित्र आणि कुत्रे अपवित्र अशा कल्पना हास्यास्पद ठरविल्या .
मातंग आणि ब्राह्मण हे दोघेही  मनुष्य देहधारीच असल्याने त्यांच्यांमधील श्रेष्ठ कनिष्ठत्व ही कल्पना निरर्थक ठरविली. आणि हे प्रत्यक्षात आणले.
स्त्री-पुरुष यांच्यातील चैतन्य एकाच प्रकारचे असल्याने त्यांच्यात भेद मानणे निरर्थक आहे, असे मानले.
कर्मकांड , व्रतवैकल्ये यांचा विरोध केला. देवताभक्ती अनुपयोगी असल्याचे सांगितले.
शेवटी—
देव धातूचा नव्हे
देव पाषाणाचा नव्हे
देव काष्ठाचा नव्हे
देव मातीचा नव्हे
देवा पटीचा(वस्त्राचा ) नव्हे
देव चित्रीचा नव्हे
      धातूचा तो झिजेल
      पाषाणाचा तो फुटेल
      काष्ठाचा तो मोडेल
      मातीचा तो  विरेल
      पटीचा तो फाटेल
      चित्रीचा तो पुसेल
            देव तो अच्छेदू अभेदू की.

                  इति चक्रधर .

Monday, 16 September 2013

ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या प्रारंभी गणेशवंदन केलेले आहे, हे आपल्याबरोबरच बहुतेक सर्व अभ्यासकांचे आणि सर्वसामान्य वाचकांचेही मत दिसते. मी मात्र जेंव्हा जेंव्हा ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय वाचतो किंवा कोणत्याही लेखकाचे या बद्दल मत वाचतो, तेंव्हा तेंव्हा मला याविषयी प्रश्न पडतो.
आता मी या विषयावरील माझे मत आपल्यासमोर विचारार्थ ठेवतो.
भगवद्गीतेमध्ये अनन्यभक्तीचा आग्रह धरलेला आहे. ‘अनन्य भक्ती’ याचा अर्थ एका ईश्वराशिवाय किंवा श्रीकृष्णाशिवाय इतर कोणत्याही देवदेवतांची भक्ती करायची नाही. ज्ञानेश्वरांनाही याची कल्पना असणे स्वाभाविक आहे.
असे असताना ज्ञानेश्वर गणेशवंदन  कसे करतील, हा माझ्यापुढील प्रश्न आहे.
आपण प्रथम ज्ञानेश्वरीच्या पहिल्या काही ओव्या उद्धृत करूयात.-
‘ओम नमोजी आद्या, वेदप्रतिपाद्या
जय जय स्वसंवेद्या, आत्मरुपा’
या मध्ये स्पष्ट दिसते की, ज्ञानेश्वरांनी प्रथम ओंकारस्वरूप व स्वसंवेद्य असणाऱ्या आद्य पुरुषाला वंदन केलेले आहे. गणेशाला नव्हे.
तथापि पुढे त्यांनी---
‘देवा तूची गणेशु, सकलार्थमतिप्रकाशु’
असेही म्हटलेले आहे. यात गणेशाचा स्पष्ट उल्लेख आलेला आहे. असे असले तरीही ज्ञानेश्वरांनी गणेशाला प्रथमत: वंदन केलेले आहे, हे मात्र दिसत नाही. प्रथम त्यांनी त्या एकमेवाद्वितीय परमेश्वरालाच वंदन करून पुढे त्या परमेश्वरालाच म्हटले आहे की, हे देवा परमेश्वरा, तुझ्याच ठायी सर्व एकवटले आहे. लोक ज्याला गणेश म्हणतात, तोही तूच आहेस. थोडक्यात, सामान्यांच्या गणेशालाही त्यांनी  त्या एकमेव ईश्वरातच पाहिले आहे. त्यांना वेगळा गणेश मानण्याची आवश्यकता पडलेली नाही.
ज्ञानेश्वरांनी स्पष्टपणे गणेशवंदन केले नसावे याला पुरावा खुद ज्ञानेश्वरीचाच देता येईल.
ज्ञानेश्वरीचा अध्याय १३, ओवी क्र. ८१५ ते ८२३ पहा. विविध देवदेवता यांचे पूजन करणाऱ्यांना त्यांनी ‘जाण अज्ञानाचा मूर्तु अवतार तो’ (अज्ञानाचा मूर्त अवतार) असेच म्हटले आहे. या ओव्यांमध्ये त्यांनी गणेशाचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे, तो पुढील प्रमाने.
त्यांच्या अज्ञानाच्या अवताराला उद्देशून त्यांनी म्हटले आहे—“ चौथ मोटकी पाहे, आणि गणेशाचाची होये.”
असे आहे तर, ज्ञानेश्वरांनी दुरान्वयाने तरी गणेशाचा प्रथम उल्लेख का केलेला आहे, हा प्रश्न आहेच. गणेशाला वंदनच कारायाचे नाही, तर त्याचा उल्लेखच का केला?
याचेही उत्तर पुढीप्रमाणे देता येईल.—
ज्ञानेश्वरांच्याकाळी प्रथम गणेशवंदन करणे पूर्णपणे रूढ झालेले होते. त्या काळच्या बहुतेक सर्व ग्रंथकारांनी आपल्या ग्रंथारंभी गणेशवंदन केलेले आहे.
थोडक्यात, परंपरा व लोकमत तर गणेशवंदनाच्या बाजूने. ज्ञानेश्वर तर लिहितात भगवद्गीतेवरील भाष्य. भगवद्गीता तर अनन्य भक्तीचा आग्रह धरते.
ज्ञानेश्वरांनी वरील परिस्थितीतून मार्ग काढला. प्रथम वंदन केले आद्यपुरुष परमेश्वराला आणि त्या परमेश्वराच्या ठायीच गणेशाला कल्पून गणेशवंदनाचाही आभास निर्माण केला.
अशाप्रकारे ज्ञानेश्वरांनी लोकभावना व परंपरा या विषयी आदर दाखवून भगवद्गीतेच्या तत्त्वांशीही सुसंगती प्रस्थापित केली.
ज्ञानेश्वर मुळात बंडखोर नव्हतेच. ते एक समन्वयवादी संत होते. त्यांना परंपरा सांभाळत, सांभाळत समाजाचेही प्रबोधन करायचे होते. त्यांच्या ज्ञानेश्वरीत याचा सातत्याने प्रत्यय येतो.
“ज्ञानेश्वरीतील गणेशवंदन” हा देखील ज्ञानेश्वरांच्या समन्वयवादाचा पुरावाच मानता येईल. 

Saturday, 7 September 2013

आज चक्रधर जयंती. आजही महाराष्ट्राला चक्रधरस्वामीबद्दल फारशी माहिती नाही.
त्यांचा परिचय आपण त्यांच्या काही वचनांवरून व त्यांच्या काही कृतीवरून करून घेउयात.
समता --- ब्राह्मण म्हणिजे श्रेष्ठ अन मातंग म्हणिजे कनिष्ठ . परी तोही मनुष्यदेहची असे . परि वृथा कल्पना करी.
स्त्रीपुरुष समता ---- पुरुषाचा जीव अन स्त्रियाचा काई जीउलिया ? थोडक्यात, स्त्रीपुरुष एकाच चैतन्याने युक्त आहेत . त्यात लिंगभेद असू शकत नाही.
मानवता ---१) मनुष्य मात्र होवोनी असावे. थोडक्यात , जात, धर्म, वर्ण, श्रीमंत, गरीब इत्यादींचा विचार न करता प्रत्येक माणसात फक्त मनुष्यत्व पहावे.
वैज्ञानिक दृष्टीकोन--- रज कालावधीत स्त्रियांना अस्पृश्य समजण्याचे कारण नाही. कारण नाक, कान,मुख इत्यादी शरीराद्वारावाटे वाहणाऱ्या मळाप्रमाणे तोही एक मळच आहे.
२) गाय म्हणिजे पवित्र अन सुने (कुत्रे) म्हणिजे अपवित्र . परी तोही पशुदेहची अन वृथा कल्पना करी . गायीच्या पावित्र्याबद्दल प्रश्न उपस्थित करण्याचा उद्देश नसावा. परंतु कुत्रे अपवित्र का?
स्वातंत्र्य ----- स्वातंत्र्य हा मोक्ष , पारतंत्र्य हा बंध . आपण कवनाचे अधीन होऊ नये . तसेच आपल्या अधीन कोणाला करू नये.
प्रयत्नवाद ---- १) यत्ने न पाविजे ऐसे काई असे ? अर्थात - प्रयत्नाने मिळणार नही असे काही नाही.
२) पडे तव धावावे, अन मरे तव करावे .
कृती ---
१) दाकोबा नावाच्या शुद्र व्यक्तीला मठात घेतले . आपल्या शिष्याकरवी त्याचे पाय धूऊन घेतले . स्वत:च्या पंक्तीत बसवून घेऊन सोबत जेवण घेतले.
२) मातंगाने दिलेला लाडू प्रसाद म्हणून आपल्या सोबतच्या ब्राह्मणांना वाटला अन त्यांना खायला लावला.
३) अंधश्रद्धा , रूढी , धार्मिक कर्मकांड इत्यादींचा नि:संदिग्धरित्या विरोध केला.
४) सर्वसामान्य लोकांसाठी मराठीचा आग्रह धरला . आणि मराठी भाषेत एक स्वतंत्र , सुव्यवस्थित, सुसंगत , तत्त्वज्ञानाच्या बहुतेक सर्व अंगांना कवेत घेणारे , आचाराशी सुसंगत आणि मराठीतील एकमेव दर्शन शास्त्र निर्माण केले.

चक्रधरस्वामींनी आपले अंतिम ध्येय मोक्षच मानले असले तरी त्या ध्येयाप्रत जाण्याचा त्यांचा मार्ग हा सामाजिक सुधारणेच्या, वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या, सामाजिक समतेच्या व मानवतेच्या मैदानावरूनच जातो. अन्यथा साधकाला आपले ध्येयच गाठता येणार नाही.
स्वामींच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्याविषयी अपार कृतज्ञता व्यक्त करून त्यांना अनंत दंडवत करतो.
नोट -- सुलभतेसाठी स्वामींच्या वचनाच्या भाषेत अनेक ठिकाणी बदल केलेले आहेत.
Like ·  · Promote ·