Wednesday, 7 September 2016

सर्वगामी भ्रष्टाचार- सर्वात मोठी समस्या.

भ्रष्टाचार हा अत्यंत महत्वाचा मुद्दा राजकीय व्यक्ती गंभीरतेने घेत नाहीत, हे स्वाभाविकच आहे. त्यात आश्चर्य मानण्याचे कारण नाही. आश्चर्य याचे वाटते की विचारवंतही हा मुद्दा पाहिजे तेवढ्या गंभीरतेने घेत नाहीत. पोलीस, कारकून यांच्या चीरीमिरीलाच भ्रष्टाचार मानणारे जनमानस भ्रष्टाचाराचे विक्राळ आणि बीभत्स रूप अधून मधून अनुभवते आणि चार दिवस सुन्न होते. परंतु भ्रष्टाचाराविषयी हवा तेवढा तिरस्कार आणि चीड मात्र जनमानसात निर्माण होत नाही. या भ्रष्टाचाराचे काय गंभीर परिणाम होत आहेत, याचा सखोल विचार करून ते सातत्याने समाजासमोर ठेवण्याची गरज आहे. हजारो कोटी रुपये खर्च करून राबविल्या जाणाऱ्या योजना अयशस्वी होण्याच्या अनेक कारणांपैकी भ्रष्टाचार हे एक महत्वाचे कारण आहे, हे पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज आहे.

भ्रष्टाचाराविरुद्ध भाषणबाजी करणारे वरिष्ठ अधिकारी E- Tender मध्येही पैसे खातात, हे कळल्यावर धक्काच बसतो. दोषपूर्ण बियाणे म्हणून व्यापाऱ्यांना अल्प किंमतीत विकणारे आणि पुन्हा तेच बियाणे व्यापाऱ्यांकडून मोठ्या किंमतीत विकत घेणाऱ्या बीजकंपन्या पाहिल्यावर आपण हादरून जातो. जन-धन योजनेत आपल्या खात्यात जमा झालेल्या पैशांपैकी काही वाटा गरीब माणूस जेंव्हा तलाठ्याला किंवा तत्सम कर्मचाऱ्याला नेऊन देतो तेंव्हा वैफल्याशिवाय दुसरे काय वाटणार? दिलेल्या कर्जाच्या २ ते ३ टक्के एवढ्या रकमेची लाच घेणारे बँक अधिकारी पाहिल्यावर मल्याचे आश्चर्य कशाला वाटेल! 

भ्रष्टाचारामुळे धरणाच्या भिंती सरकतात, पुलाला तडे जातात, बोगस औषधे व  भेसळयुक्त दुधामुळे लोकांचे जीव जातात. कोणताही गुन्हा केला तरी पैशाच्या जोरावर आपण सुटू शकतो ही भावनाच गुन्हेगारांमध्ये आत्मविश्वास निर्माण करते. यात बलात्कारासारखे गुन्हेसुद्धा आहेत. भ्रष्टाचारी अप्रत्यक्षपणे अशा गुन्ह्यांना जबाबदार असतात. भ्रष्टाचार करणाऱ्यांचे वारसही कधीकाळी टेबलाच्या दुसऱ्या बाजूस राहू शकतात आणि याच भ्रष्टाचाराचे बळी ठरू शकतात असे भ्रष्टांना वाटत नसेल का, हा प्रश्न पडतो.


भांडवलशाहीच्या पार्श्वभूमीवर पैशाला निरपेक्ष प्रतिष्ठा प्राप्त झाल्यामुळे तो कोठून मिळाला हे सामान्य माणूस पाहत नाही. त्यामुळे जनमानसांत भ्रष्टाचाऱ्याविरुद्ध असंतोष निर्माण होत नाही. उलट हे जनमानस अशा धनवान भ्रष्टाचारी मंडळीकडे कौतुकाच्या नजरेने बघते.

या भ्रष्टाचारी लोकांची दांभिकताही मनालीच पाहिजे. या मंडळींनाही त्यांच्या पापाची थोडी फार बोचणी जाणवत असणारच. मग हे लोक या पैशानेच तीर्थयात्रा करणार. देव-देवतांना व बुवा-बाबांना आपल्या भ्रष्ट संपत्तीचा काही अंश दान करून आपल्या पापाचे परिमार्जन करून घेणार. वर बोनस म्हणून बुवा-बाबांचे आशीर्वादही प्राप्त करणार. हे बुवा-बाबाही यांच्या भक्तांना भ्रष्टाचार करू नका हे सांगणार नाहीत. बहुत्येक त्यांचे अध्यात्म या क्षुद्र-लौकिक गोष्टींना महत्त्व देत नसणार. या बुवा-बाबांकडे बहुतकरून पैसेवाल्यांचीच गर्दी असते. सामान्य गरीब माणूस त्यांच्याकडे का फिरकत नाही याची फिकीर ते करीत नाहीत. कुठे ते चक्रधर- नामदेवादी महापुरुष आणि कुठे ही दांभिक, स्वार्थी मंडळी. कोणी याचा विचार करणार की नाही. कितीही चांगल्या घोषणा केल्या, कितीही चांगल्या  योजना आणल्या तरी हा विराट आणि विक्राळ भ्रष्टाचाररुपी राक्षस त्यांना गिळंकृत करणारच. भ्रष्टाचाराचे तन साफ करा मगच विकासाची  रोपे लावा. 

Tuesday, 6 September 2016

महात्मा गांधींचे ढोंगी भक्त-

मी गांधींचा शिष्य आहे म्हटल्याने तसा ठरेल काय? मी गांधींबद्दल नुसता आदर दाखविला तर मी गांधींचा अनुयायी ठरेल काय? मी गांधींचा जप केला म्हणजे गांधींचा वारसा चालविला काय? केवळ हा दिखावा केल्याने मी तसा ठरत नाही, असे कोणीही सुजाण व्यक्ती म्हणू शकेल. मला गांधींचे अनुयायी ठरण्यासाठी गांधीचे जीवनतत्त्वज्ञान माझा आदर्श असला पाहिजे. त्यासाठी गांधी तत्त्वज्ञानाच्या विरोधी तत्त्वज्ञानाला मला नकार द्यावा लागेल. परस्परविरोधी आदर्शाचा अवलंब मला एकाच वेळी करता येणे शक्य नाही. मी तसे करीत असेल तर मला ढोंगीच म्हणावे लागेल. परंतु माझ्या भोवतीच्या लोकांना माझा हा ढोंगीपणा लक्षात येणे आवश्यक आहे.

Friday, 2 September 2016

मराठा समाज आणि असंतोष

मराठा आरक्षणाच्या मागणीचा  जोर उत्तरोत्तर वाढत असताना दिसत आहे. राज्यघटनेतील तरतुदीनुसार मराठा आरक्षण शक्य होणार नाही, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत दिसून येते. काही मराठा पुढारीदेखील ही गोष्ट खाजगीत मान्य करतात. असे असले तरी आरक्षणाच्या मागणीचा जोर मुळीच कमी होत नाही.वर्तमान तरतुदीनुसार मराठा आरक्षण शक्यच नसेल तर ही वस्तुस्थिती या मागणीच्या संदर्भात निर्णायक का ठरत नसेल हा प्रश्न पडतो.आरक्षणासाठी कितीही सभा घेतल्या आणि कितीही मोर्चे काढले तरी त्यांचा काहीच उपयोग होणार नसेल तर  मग हा मनुष्यबळाचा, वेळेचा व संघटनाचा अपव्यय का करण्यात येत आहे?

सामान्य मराठा समाजात गेल्या काही वर्षांपासून एक प्रकारची अस्वस्थता खदखदत आहे. आरक्षणामुळे किंवा इतर कारणांमुळे मागास समाजात झालेली प्रगती आणि त्या तुलनेत मराठा समाजातील स्थितिशीलता यामुळे आर्थिक-सामाजिक-राजकीय क्षेत्रात आपले स्थान आपण गमावतो की काय, अशी भीती या सामान्य  मराठा समाजात निर्माण होत असावी, असे वाटते. या भीतीवर कशी मात करायची याचा  निश्चित असा कार्यक्रमच मराठा समाजासमोर ठेवल्या जात नाही. अशा प्रकारचे नेतृत्वच या समाजात निर्माण होत नाही. यावरून अशा नेतृत्वाची मोठी गंभीर समस्या या समाजासमोर उभारलेली आहे हे दिसून येते. मग उन्नतीचा ठोस असा पर्यायी कार्यक्रम ठेवता येत नसेल तर आरक्षणासारखे तयार मुद्दे हाती घ्यावे लागतात. मराठा समाजातील अस्वस्थतेला वळण किंवा वाट करून द्यायला ‘आरक्षण’ हा मुद्दा म्हणूनच उपयोगाला येतो. आरक्षणाचे भवितव्य कितीही अनिश्चित असले तरी त्या आधारे या समाजाला एकत्रित येऊन आपल्या असंतोषाला वाट करून देता येते. याद्वारे भविष्याला सामोरे जाण्यासाठी एक संघटनशक्तीही निर्माण करता येते. म्हणूनच  कोपर्डी काय किंवा आरक्षण काय हे मुद्दे मराठा समाजाच्या संघटनाला केवळ निमित्त ठरतात.

Monday, 15 August 2016

देशप्रेमाचे कर्मकांड.

कर्मकांडाचे एक बरे असते. आपल्या मनात जे विचार किंवा भावना असायला हव्यात त्या खऱ्या अर्थाने नसल्या तरी कर्मकांडाद्वारे त्या तशा आहेत हे सिद्ध करता येते. आज आपण स्वातंत्र्याचा दिवस साजरा करीत आहोत. दिवसभर देशप्रेमाची गाणी ऐकत आहोत. एकमेकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत आहोत. देशप्रेमाचे व देशाभिमानाचे संदेश सामाजमाध्यमावर शेअर करीत आहोत. आणि असे करून देशप्रेम साजरे केल्याचे समाधान मिळवीत आहोत. एवढे केले की आपली जबाबदारी संपते असे आपल्याला वाटत असावे. एवढे केले की आपल्याला प्रशासनातील व राजकारणातील भ्रष्टाचार जोमाने चालू ठेवण्यास हरकत वाटत नाही. व्यापाऱ्यांना नफेखोरी आणि काळाबाजार करण्यात वावगे वाटत नाही. नोकरशहांना प्रामाणिकपणे काम करून समाजाभिमुख दृष्टीकोन ठेवण्याची गरज राहत  नाही. समाजात वावरताना स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, सहानुभूती, संवेदनशीलता या बाबीचा अवलंब करण्याची फारशी आवश्यकता राहत नाही.
खरे तर देशप्रेम केवळ कर्मकांडाने सिद्ध करता येत नाही. या देशात वास करीत असताना आपल्या वाट्याला आलेल्या भूमिका प्रामाणिकपणे व कार्यक्षमतेने पार पाडणे, हेच खरे तर देशप्रेम आहे. किंबहुना देशप्रेमाची ही पूर्वावश्यक अट आहे असे म्हटले तरी चूक ठरणार नाही. ही अट पूर्ण केली तरच  आपण देशप्रेम साजरे करायला  पात्र ठरतो.

या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने असलेल्या देशप्रेमासाठी सर्वांना शुभेच्छा.

Tuesday, 19 July 2016

तणावनियमनाचे गौडबंगाल.

सध्याच्या वेगवान युगात मानसिक तणाव अपरिहार्य आहेत आणि त्यामुळे त्यांच्या नियमनाचेच काम फक्त आपण करू शकतो, अशी बहुत्येकांची धारणा झालेली आहे. या तणावांपैकी बहुत्येक तणाव मुळातूनच दूर करता येऊ शकतात, याची कोणाला कल्पनाही करायची गरज वाटत नाही.

बहुत्येक तणावांचा उगम हा आपल्या आधुनिक विचारसरणीत सापडतो. त्याचप्रमाणे तो  आपल्या सदोष व्यवस्थेचीही देन आहे. व्यवस्थेतील दोष दूर केल्यास असे तणाव मुळातूनच नाहीसे करता येऊ शकतात. परंतु व्यवस्थेतील दोष कायम राखण्यातच प्रस्थापितांचे हितसंबंध गुंतलेले असतात. त्यामुळे हे दोष दूर करण्याची कोणतीही व्यवस्था आपल्याकडे दिसत नाही. थोडक्यात, व्यवस्था सदोष ठेवण्यात प्रस्थापितांचे हितसंबंध गुंतलेले असतात. त्यामुळे व्यवस्था तशीच सदोष राहणे हे त्यांच्या  हिताचे असते. तथापि अशा सदोष व्यवस्थेतून तणाव आणि त्यातून प्रस्थापितांविरुद्ध असंतोष निर्माण होऊ शकतो. असा असंतोष प्रस्थापितांच्या दृष्टीने घातक ठरू शकतो. म्हणूनच असे घातक परिणाम टाळण्यासाठी प्रस्थापित मंडळी तणावनियमनाचे कार्यक्रम आखत असतात. हे कार्यक्रम करताना हे तणाव कसे अपरिहार्य आहेत, हेही सामान्य लोकांच्या मनांवर बिम्बविण्याचा प्रयत्न होताना दिसतो. असे करून जनतेमध्ये व्यवस्थेविरुद्ध असंतोषच निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली जाते.


एकेकाळी लोकमाण्यांसारखे नेते लोकांच्या मनांत व्यवस्थेविरुद्ध असंतोष निर्माण करण्याचे काम करीत होते; कारण त्यांना व्यवस्था बदलायची होती. आता मात्र हा असंतोष निर्माणच होऊ नये म्हणून तणावनियमनांच्या मोहिमा हाती घेतल्या जातात; कारण आताच्या नेत्यांना ही सदोष व्यवस्था टिकवायची असते.

Thursday, 7 July 2016

धर्मनिरपेक्षता की धर्मसमभाव?

धर्मनिरपेक्षता व  सर्वधर्मसमभाव हे दोन्ही शब्द सामान्यपणे समान अर्थाने वापरले जातात. काटेकोरपणे बघितल्यास  हे अचूक नाही. धर्माचे अस्तित्व किंवा धर्माचे निर्देश लक्षात न घेता केलेले व्यवहार म्हणजे धर्मनिरपेक्ष व्यवहार अशी धर्मनिरपेक्षतेची व्याख्या केली जाते. यामध्ये धर्माचे मुळी अस्तित्वच लक्षात घेतलेले नसते. त्यामुळे सर्व धर्म समान मानण्याचा किंवा न मानण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सर्वधर्मसमभाव या संकल्पनेत सर्व धर्मांना समान लेखून व्यवहार केले जाणे अपेक्षित आहे. सर्व धर्मांना समान लेखने म्हणजे काय? कोणतेही राज्य एखादे धोरण ठरविते किंवा एखादा कार्यक्रम आखते तेंव्हा ते सर्व धर्मांना समान लेखते असा त्याचा अर्थ करावा लागेल. परंतु राज्य एखादी कृती करण्याचे ठरविते किंवा कृती करते तेंव्हा ती कृती सर्व धर्मांना सारखी ठरू शकत नाही. समान नागरी कायद्यासारखा निर्णय हा हिंदूंपेक्षा मुसलमानांना अधिक नाराज करणारा ठरतो. राज्याची ही कृती मुसलमानांना सर्वधर्मसमभाव या संकल्पनेच्या विरोधी वाटेल. थोडक्यात, सर्व धर्मांना समान ठरेल अशी कृती राज्याकडून होणे एकंदर कठीणच ठरते. राज्याला सर्व धर्मांना सारखेच जवळ करता येणे शक्य नाही; पण सर्व धर्मांना सारखेच दूर मात्र ठेवता येईल. सर्वधर्मसमभाव या संकल्पनेला धर्मनिरपेक्षतेच्या जवळ याच अर्थाने आणता येईल. पण त्यामुळे सर्वधर्मसमभाव या संकल्पनेचा भोंगळ असला तरी आकर्षक असा अर्थ आपल्याला करता येणार नाही.

Secular या शब्दाचा मूळ अर्थ मात्र वरीलप्रमाणे नाही. या साल्पनेचा उगम युरोपात झालेला आहे. तेथे केवळ ख्रिश्चन धर्मच अस्तित्वात होता. हा धर्म(तसे सगळेच धर्म) म्हणजे स्वर्गप्राप्तीचे साधन समजले जातो. थोडक्यात, धर्म म्हणजे जीवनविषयक विशिष्ट अशी पारलौकिक विचारसरणी होय. धर्मनिरपेक्ष दृष्टीकोन म्हणजे या पारलौकिक दृष्टीकोनाच्या निरपेक्ष, खरे तर विरूद्धच असा ऐहिक दृष्टीकोन होय. या अर्थाने धर्मनिरपेक्ष राज्य हे इहवादी असते. अशा राज्याच्या दृष्टीने परलोक अशी काही गोष्ट नसतेच. 

धर्मनिरपेक्षता व  सर्वधर्मसमभाव या संकल्पनांचा वरीलप्रमाणे सैद्धांतिक अर्थ होत असला तरी आपल्या देशात कोणती संकल्पना उपयुक्त ठरेल यावर सुद्धा विचार करणे आवश्यक आहे. भारतीय समाज, मग तो हिंदू असो किंवा  मुस्लीम किंवा इतर कोणताही धर्माचा असो,  हा विशेषत्वाने धर्माने प्रभावित आहे. त्याच्या वैयक्तिक किंवा सामाजिक जीवनात धर्म महत्त्वाची भूमिका बजावत असतो. या  समाजाला विशिष्ट दिशेने प्रवृत्त करायचे असेल तर किंवा त्याला आपलेसे करायचे असेल तर राज्य किंवा राजकीय पक्ष त्याच्या  धार्मिक भावनेला चुचकारण्याचे काम करताना दिसतात. विशिष्ट धार्मिक दृष्टीकोन असणाऱ्या पक्षाला येथे यश मिळण्याची शक्यता निर्माण होते. आणि नास्तिक विचारसरणी असणारे समाजवादी पक्षासारखे लोक लोकांना प्रभावी करण्यात मागे पडतात. आपल्या भारतीय समाजाला धार्मिक दृष्टीकोन असणारे नेते आपले वाटतात. ते आपल्या धार्मिक भावनेची सुरक्षा करतील यावर समाजाचा विश्वास वाटतो. उलट विवेकवादी नेते रुक्ष आणि परके वाटायला लागतात. यासाठी म्हणूनच सर्वधर्मसमभाव या संकल्पनेचा आधार घेतल्या जातो. तथापि या प्रयत्नात विशिष्ट धर्माचे लांगूलचालन किंवा ढोंगीपणा केंव्हा सुरु होतो याचे भान राहत नाही. सर्वच धार्मिक समूहांना हा ढोंगीपणा चांगलाच कळतो. त्यमुळे हे समूह या ढोंगी लोकांपासून दूर जातात.कोन्ग्रेससारख्या पक्षाच्या ऱ्हासाचे कारण यातही शोधता येईल काय? 

वरील पार्श्वभूमीवर इथल्या नेत्यांना सामाजिक समरसतेशी अजिबात तडजोड न करता, नि:पक्षपातीपणे धार्मिक समूहांशी   समरस होऊन, त्यंना विश्वासात घेऊन त्यांच्या धार्मिक भावनांना व विश्वासांना योग्य वळण देण्याचे काम करता येणे शक्य आहे. या अर्थाने भारतीय समाजात सर्वधर्मसमभाव या संकल्पनेचा चांगला उपयोग करता येईल.

Tuesday, 5 July 2016

काळ स्वतंत्रपणे अस्तित्वात आहे काय?

हे विश्व म्हणजे संबंधांचे विशाल जाळे आहे. हे विश्वरुपी जाळे  म्हणजे केवळ वर्तमानकालीन अस्तित्व नव्हे. भूत आणि भविष्यासहित वर्तमान अस्तित्व म्हणजे हे विश्व! थोडक्यात, आपले संबंध हे वर्तमानातील सर्व घटकांशी तर आहेतच, पण ते भूतकालीन व भविष्यकालीन अस्तित्वाच्या प्रत्येक घटकांशी आहेत. असे असेल तर, आपण आपल्या सभोवताली असलेल्या कोणत्याही घटकांपासून तर स्वतंत्र नाहीतच , पण भूतकालीन व भविष्यकालात  असणाऱ्या   घटकांपासूनही  स्वतंत्र नाहीत, असे म्हणावे लागेल.

कधी कधी वाटते, भूत, वर्तमान आणि भविष्य असे काळाचे प्रकार नसावेतच. काळ हा अनंत विस्तार असलेले व्यापक अस्तित्व असून भूत, वर्तमान व भविष्य हे आपल्या सापेक्षतेने जाणवणारे काळाचे भाग असावेत. आपल्या सीमित क्षमतेला एका वेळी यातील एकच  भाग अनुभवाला येत असावा. जणू काही आपण अनंत विस्तारित काळामध्ये प्रवास करित  आहोत. प्रवासात मागे पडलेले स्थळ हे पुढील स्थळी गेल्यानंतर दिसेनासे होते..तसेच भूतकाळाचे होत असेल काय?  प्रवास करताना मागे पडलेले आणि पुढे येणारे अशी दोन्हीही स्थळे अस्तित्वात असतात. फक्त ती आपल्या वर्तमानकालीन अनुभवात नसतात. तसेच भूतकाळ व भविष्यकाळाचे असेल काय? थोडक्यात, घडून गेलेल्या, घडत असलेल्या व घडल्या जाणाऱ्या घटना एकाच वेळी अस्तित्वात असून आपल्या अनुभवाला मात्र  क्रमाक्रमाने येत असाव्यात काय? 

दुसराही एक विचार! काळ हा मुळी अस्तित्वातच नसावा. घडणाऱ्या घटनांमुळे आपण काळाची कल्पना करतो. काळातून सर्व घटना काढून घेतल्या तर शेवटी काय उरेल? तरीही निरुपाधिक असा काळ राहील काय? मग अशा अस्तित्वाला काय अर्थ राहील ? काहीही असो , आपण अशा काळाची कल्पना मात्र करू शकतो. मात्र असा काळ सर्वव्यापक आणि विभू असला पाहिजे. विभू म्हणजे सर्वव्यापक व अनंत विस्तारित असा. आपण काळाला गतिमान या स्वरुपात कल्पितो. परंतु विभू असणारा काळ गतिमान असू शकत नाही. कारण काळाने सर्व अवकाशच व्यापलेला असतो. आपणच  अशा विभू काळात प्रवास करीत आहोत काय? 

अनंत विस्तारित अशा काळाची आपण कशी कल्पना करायची? कदाचित काळ आणि अवकाश हे अस्तित्वाचेच अभिन्न घटक आहेत की काय?  घटना, पदार्थ अस्तित्वात आले की, त्यासोबतच अवकाश व काळ येत असेल. आणि पदार्थ व घटना काढून घेतल्या की काळ व अवकाश संपुष्टात येत असेल काय?  मग काळ व अवकाश यांचे स्वतंत्र अस्तित्व मानण्याचे काय करण उरेल? फक्त त्यांची कल्पना करता येते म्हणून?