Thursday, 7 July 2016

धर्मनिरपेक्षता की धर्मसमभाव?

धर्मनिरपेक्षता व  सर्वधर्मसमभाव हे दोन्ही शब्द सामान्यपणे समान अर्थाने वापरले जातात. काटेकोरपणे बघितल्यास  हे अचूक नाही. धर्माचे अस्तित्व किंवा धर्माचे निर्देश लक्षात न घेता केलेले व्यवहार म्हणजे धर्मनिरपेक्ष व्यवहार अशी धर्मनिरपेक्षतेची व्याख्या केली जाते. यामध्ये धर्माचे मुळी अस्तित्वच लक्षात घेतलेले नसते. त्यामुळे सर्व धर्म समान मानण्याचा किंवा न मानण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सर्वधर्मसमभाव या संकल्पनेत सर्व धर्मांना समान लेखून व्यवहार केले जाणे अपेक्षित आहे. सर्व धर्मांना समान लेखने म्हणजे काय? कोणतेही राज्य एखादे धोरण ठरविते किंवा एखादा कार्यक्रम आखते तेंव्हा ते सर्व धर्मांना समान लेखते असा त्याचा अर्थ करावा लागेल. परंतु राज्य एखादी कृती करण्याचे ठरविते किंवा कृती करते तेंव्हा ती कृती सर्व धर्मांना सारखी ठरू शकत नाही. समान नागरी कायद्यासारखा निर्णय हा हिंदूंपेक्षा मुसलमानांना अधिक नाराज करणारा ठरतो. राज्याची ही कृती मुसलमानांना सर्वधर्मसमभाव या संकल्पनेच्या विरोधी वाटेल. थोडक्यात, सर्व धर्मांना समान ठरेल अशी कृती राज्याकडून होणे एकंदर कठीणच ठरते. राज्याला सर्व धर्मांना सारखेच जवळ करता येणे शक्य नाही; पण सर्व धर्मांना सारखेच दूर मात्र ठेवता येईल. सर्वधर्मसमभाव या संकल्पनेला धर्मनिरपेक्षतेच्या जवळ याच अर्थाने आणता येईल. पण त्यामुळे सर्वधर्मसमभाव या संकल्पनेचा भोंगळ असला तरी आकर्षक असा अर्थ आपल्याला करता येणार नाही.

Secular या शब्दाचा मूळ अर्थ मात्र वरीलप्रमाणे नाही. या साल्पनेचा उगम युरोपात झालेला आहे. तेथे केवळ ख्रिश्चन धर्मच अस्तित्वात होता. हा धर्म(तसे सगळेच धर्म) म्हणजे स्वर्गप्राप्तीचे साधन समजले जातो. थोडक्यात, धर्म म्हणजे जीवनविषयक विशिष्ट अशी पारलौकिक विचारसरणी होय. धर्मनिरपेक्ष दृष्टीकोन म्हणजे या पारलौकिक दृष्टीकोनाच्या निरपेक्ष, खरे तर विरूद्धच असा ऐहिक दृष्टीकोन होय. या अर्थाने धर्मनिरपेक्ष राज्य हे इहवादी असते. अशा राज्याच्या दृष्टीने परलोक अशी काही गोष्ट नसतेच. 

धर्मनिरपेक्षता व  सर्वधर्मसमभाव या संकल्पनांचा वरीलप्रमाणे सैद्धांतिक अर्थ होत असला तरी आपल्या देशात कोणती संकल्पना उपयुक्त ठरेल यावर सुद्धा विचार करणे आवश्यक आहे. भारतीय समाज, मग तो हिंदू असो किंवा  मुस्लीम किंवा इतर कोणताही धर्माचा असो,  हा विशेषत्वाने धर्माने प्रभावित आहे. त्याच्या वैयक्तिक किंवा सामाजिक जीवनात धर्म महत्त्वाची भूमिका बजावत असतो. या  समाजाला विशिष्ट दिशेने प्रवृत्त करायचे असेल तर किंवा त्याला आपलेसे करायचे असेल तर राज्य किंवा राजकीय पक्ष त्याच्या  धार्मिक भावनेला चुचकारण्याचे काम करताना दिसतात. विशिष्ट धार्मिक दृष्टीकोन असणाऱ्या पक्षाला येथे यश मिळण्याची शक्यता निर्माण होते. आणि नास्तिक विचारसरणी असणारे समाजवादी पक्षासारखे लोक लोकांना प्रभावी करण्यात मागे पडतात. आपल्या भारतीय समाजाला धार्मिक दृष्टीकोन असणारे नेते आपले वाटतात. ते आपल्या धार्मिक भावनेची सुरक्षा करतील यावर समाजाचा विश्वास वाटतो. उलट विवेकवादी नेते रुक्ष आणि परके वाटायला लागतात. यासाठी म्हणूनच सर्वधर्मसमभाव या संकल्पनेचा आधार घेतल्या जातो. तथापि या प्रयत्नात विशिष्ट धर्माचे लांगूलचालन किंवा ढोंगीपणा केंव्हा सुरु होतो याचे भान राहत नाही. सर्वच धार्मिक समूहांना हा ढोंगीपणा चांगलाच कळतो. त्यमुळे हे समूह या ढोंगी लोकांपासून दूर जातात.कोन्ग्रेससारख्या पक्षाच्या ऱ्हासाचे कारण यातही शोधता येईल काय? 

वरील पार्श्वभूमीवर इथल्या नेत्यांना सामाजिक समरसतेशी अजिबात तडजोड न करता, नि:पक्षपातीपणे धार्मिक समूहांशी   समरस होऊन, त्यंना विश्वासात घेऊन त्यांच्या धार्मिक भावनांना व विश्वासांना योग्य वळण देण्याचे काम करता येणे शक्य आहे. या अर्थाने भारतीय समाजात सर्वधर्मसमभाव या संकल्पनेचा चांगला उपयोग करता येईल.

Tuesday, 5 July 2016

काळ स्वतंत्रपणे अस्तित्वात आहे काय?

हे विश्व म्हणजे संबंधांचे विशाल जाळे आहे. हे विश्वरुपी जाळे  म्हणजे केवळ वर्तमानकालीन अस्तित्व नव्हे. भूत आणि भविष्यासहित वर्तमान अस्तित्व म्हणजे हे विश्व! थोडक्यात, आपले संबंध हे वर्तमानातील सर्व घटकांशी तर आहेतच, पण ते भूतकालीन व भविष्यकालीन अस्तित्वाच्या प्रत्येक घटकांशी आहेत. असे असेल तर, आपण आपल्या सभोवताली असलेल्या कोणत्याही घटकांपासून तर स्वतंत्र नाहीतच , पण भूतकालीन व भविष्यकालात  असणाऱ्या   घटकांपासूनही  स्वतंत्र नाहीत, असे म्हणावे लागेल.

कधी कधी वाटते, भूत, वर्तमान आणि भविष्य असे काळाचे प्रकार नसावेतच. काळ हा अनंत विस्तार असलेले व्यापक अस्तित्व असून भूत, वर्तमान व भविष्य हे आपल्या सापेक्षतेने जाणवणारे काळाचे भाग असावेत. आपल्या सीमित क्षमतेला एका वेळी यातील एकच  भाग अनुभवाला येत असावा. जणू काही आपण अनंत विस्तारित काळामध्ये प्रवास करित  आहोत. प्रवासात मागे पडलेले स्थळ हे पुढील स्थळी गेल्यानंतर दिसेनासे होते..तसेच भूतकाळाचे होत असेल काय?  प्रवास करताना मागे पडलेले आणि पुढे येणारे अशी दोन्हीही स्थळे अस्तित्वात असतात. फक्त ती आपल्या वर्तमानकालीन अनुभवात नसतात. तसेच भूतकाळ व भविष्यकाळाचे असेल काय? थोडक्यात, घडून गेलेल्या, घडत असलेल्या व घडल्या जाणाऱ्या घटना एकाच वेळी अस्तित्वात असून आपल्या अनुभवाला मात्र  क्रमाक्रमाने येत असाव्यात काय? 

दुसराही एक विचार! काळ हा मुळी अस्तित्वातच नसावा. घडणाऱ्या घटनांमुळे आपण काळाची कल्पना करतो. काळातून सर्व घटना काढून घेतल्या तर शेवटी काय उरेल? तरीही निरुपाधिक असा काळ राहील काय? मग अशा अस्तित्वाला काय अर्थ राहील ? काहीही असो , आपण अशा काळाची कल्पना मात्र करू शकतो. मात्र असा काळ सर्वव्यापक आणि विभू असला पाहिजे. विभू म्हणजे सर्वव्यापक व अनंत विस्तारित असा. आपण काळाला गतिमान या स्वरुपात कल्पितो. परंतु विभू असणारा काळ गतिमान असू शकत नाही. कारण काळाने सर्व अवकाशच व्यापलेला असतो. आपणच  अशा विभू काळात प्रवास करीत आहोत काय? 

अनंत विस्तारित अशा काळाची आपण कशी कल्पना करायची? कदाचित काळ आणि अवकाश हे अस्तित्वाचेच अभिन्न घटक आहेत की काय?  घटना, पदार्थ अस्तित्वात आले की, त्यासोबतच अवकाश व काळ येत असेल. आणि पदार्थ व घटना काढून घेतल्या की काळ व अवकाश संपुष्टात येत असेल काय?  मग काळ व अवकाश यांचे स्वतंत्र अस्तित्व मानण्याचे काय करण उरेल? फक्त त्यांची कल्पना करता येते म्हणून?

  

Thursday, 30 June 2016

समाज आणि स्वातंत्र्य

समाज म्हणजे सामाजिक संबंधांचे जाळे अशी समाज या संकल्पनेची व्याख्या केली जाते. समाजच काय अखिल विश्वच संबंधांचे विराट जाळे  आहे. या जगातील प्रत्येक गोष्ट, मग ती  सजीव असो की निर्जिव, परस्परांशी असलेल्या संबंधांनी जखडलेल्या असतात. त्यामुळे कोणा एकातही झालेला बदल दुसऱ्या अनेक गोष्टींतील बदलांना कारणीभूत होतो. थोडक्यात, कोणतेही कार्य स्वेच्छेनुसार करण्यास जरी आपण स्वतंत्र वाटत असलो तरी हे स्वातंत्र्य मर्यादित स्वरूपाचे आहे. या मर्यादा आपल्यात असणाऱ्या विविध प्रकारच्या संबंधांमुळे  आलेल्या असतात. या संबंधांच्या निमित्ताने हक्क, कर्तव्ये,कायदा, नियम,रूढी, नीती इत्यादी विनियमने तयार होतात. ही सर्व नियमने आपल्याला सातत्याने  नियंत्रित करीत असतात. त्यामुळे आपण स्वतंत्र आहोत हे नि:संदिग्धरीत्या म्हणता येत नाही. जे काही स्वातंत्र्य  आपण अनुभवतो ते सैल असणाऱ्या बंधनरुपी दोरांसारखे आहे..
प्रत्येकजन वरील  विनियमांचा विचार न करता या स्वातंत्र्याचा अनियंत्रित वापर करू लगला तर अखिल विश्वाची व्यवस्था नष्ट  होण्यास वेळ लागणार नाही. आजकाल आपण निसर्गाशी जुळवून घेण्यापेक्षा त्यावर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्याचे मानवी जीवनावर झालेले गंभीर परिणामही आज  आपण भोगत आहोत. माझ्या प्रत्येक कृतीचा बारा-वाईट  परिणाम इतरांवर होत आहे आणि इतरांकडून होणाऱ्या प्रत्येक कृतीचा तसाच परिणाम माझ्यावरही  होत असतो, ही गोष्ट आपण क्षणभरही विसरता कामा नये.

स्वातंत्र्यासंबंधी  दुसरा एक विचार! प्रत्येक कार्याला कारण असते हा एक प्रसिद्ध नियम आहे. याचा अर्थ आपल्या प्रत्येक कृतीचे काहीतरी कारण असले पाहिजे. याच नियमानुसार त्या कारणालाही कोणते तरी कारण असायला हवे. अशी कार्य-कारणाची अनंत शृंखला असल्याची कल्पना आपल्याला  करता येते. थोडक्यात आपल्या प्रत्येक कृतीचे मूळ कारण हे आपल्या पलीकडचे असू शकते. हे कारण आपल्या प्रभावक्षेत्राबाहेरचे असल्याने त्याचे कर्तृत्व तसेच जबाबदारी आपल्यावर येऊ शकत नाही. उलट आपण जी कृती करतो ती आपण स्वत:हून न करता ती कोणत्यातरी बाह्य कारणामुळे आपल्याकडून होत असते असे म्हणावे लागते.. याचा अर्थ आपण कोणतीही कृती करण्यास स्वतंत्र नाहीत असाच होत नाही काय?


विचार करायला काय हरकत आहे?

Tuesday, 28 June 2016

अण्वस्त्रप्रसारबंदी करारावर स्वाक्षरी केल्याशिवाय NSG मध्ये प्रवेश मिळत नाही, हे जर खरे असेल तर NSG मध्ये  प्रवेश मिळण्यासाठी मिळविल्या जाणाऱ्या आणि अनेक देशांकडून मिळत असलेल्या  पाठीम्ब्याचा काय अर्थ असेल! की हा सर्व प्रकार म्हणजे एका राजकीय नाट्याचा अविष्कार होता? भारताचा NSG मध्ये प्रवेश व्हावा असे खरोखरच या देशांना वाटत असेल तर अण्वस्त्रप्रसारबंदी करारावर स्वाक्षरी करण्याच्या अटीबद्दल या देशांचे काही मत होते असे काही वाचनात आले नाही. की पाठींबा द्यायचे नाटक आपण करायचे, प्रवेश होऊ न देण्याचे काम परस्पर चीन सारखे देश करतीलच यावर या पाठींबा देणाऱ्या देशांचा विश्वास होता?

Friday, 24 June 2016

दिनांक २२-०६-२०१६ च्या लोकसत्तामधील “जातिव्यवस्था आली कोठून?” हा शेषराव मोरे यांचा लेख वाचला. बेटीबंदी हे जातीव्यवस्थेचे व्यवच्छेदक लक्षण असले तरी तिच्यामधील श्रेष्ठ-कनिष्ठत्व, स्पर्शास्पर्शत्व ही वैशिष्ट्ये अधिक अमानवी आणि घातक आहेत. जातिव्यवस्थेचा उगम जर आदिम समाजाच्या टोळीव्यवस्थेत शोधायचा झाल्यास तिच्यातील अमानवी श्रेष्ठ-कनिष्ठत्व, स्पर्शास्पर्शत्व यांचा उगम कोठे शोधायचा, हाही प्रश्न सोडविण्याची गरज आहे. जातीव्यवस्था ही ब्राह्मणांनी निर्मिली नाही हा निष्कर्ष काढण्यासाठी मोरे यांनी तिचा उगम टोळीव्यवस्थेत शोधलेला आहे की काय, असे वाटते. जातीव्यवस्थेने भारतीय समाजाची जी हानी केलेली आहे ती तिच्यातील कप्पेबंद श्रेष्ठ-कनिष्ठत्व व  स्पर्शास्पर्शत्व यांच्यामुळे. जातीव्यवस्थेत ही वैशिष्ट्ये कशी आली हे टोळीसिद्धांताने मुळीच सिद्ध होऊ शकत नाही.

जातीव्यवस्था कोणत्याही कारणांमुळे निर्माण झालेली असली तरी तिला धर्मव्यवस्थेने पाठींबा दिला हे स्पष्ट आहे. यासाठी जरी भाकडकथांचा आधार घेतला असला तरी ते धार्मिक समर्थन होते हे लक्षात घेतले पाहिजे. जातीव्यवस्थेमध्ये श्रेष्ठ-कनिष्ठत्व कसे निर्माण झाले हे नि:संदिग्धपणे स्पष्ट करता आले नाही तरी मनुस्मृतीसारख्या स्मृतिग्रंथांनी या बाबींना मजबूत समर्थन दिलेले आहे, हे स्पष्ट आहे. त्यावेळी समाजमनावर या स्मृतिग्रंथांचा जबरदस्त पगडा होता यात शंका नाही. स्मृतिग्रंथांतील निर्देश जशास तसे अंमलात येत नसले तरी वेळोवेळी त्यांचा आधार घेतला जात असे. तेराव्या शतकात चक्रधरस्वामींच्या एका दलित भक्ताला धर्माधिकार नाही हे निश्चित करून त्याला मृत्युदंडाची शिक्षा दिली ती शास्त्राचा आधार घेऊनच. लीळाचरित्रात या घटनेचा स्पष्ट उल्लेख आहे.

Tuesday, 21 June 2016

परकीय गुंतवणुकीला अनेक क्षेत्रे अधिकाधिक खुली केल्यामुळे काही अनिष्ट परिणाम होऊ शकतील काय, यावर विचार करण्याची गरज वाटते. भांडवल आणि तंत्रज्ञान यांच्या प्रचंड गुंतवणुकीच्या आधारावर परकीय उद्योजक येथील अर्थव्यवस्थेवर नियंत्रण प्रस्थापित करू शकतील काय, या प्रश्नाचे उत्तर सामान्यांना मिळाले पाहिजे. अवाढव्य गुंतवणूक आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानापुढे येथील उद्योजक टिकाव धरू शकतील काय, यावरही शंका निर्माण होऊ शकते. मग येथील लोकांनी या परकीय उद्योगांमध्ये फक्त नोकऱ्याच करायच्या काय? त्याही या उद्योगांच्या मर्जीवर.
मर्यादित परकीय गुंतवणुकीसोबतच देशांतर्गत भांडवल वाढीसाठी प्रयत्न करणे अतिशय महत्त्वाचे वाटते. त्या दृष्टीने आपण काय करीत आहोत, यावर अर्थतज्ज्ञांनी प्रकाश पडावा, असे वाटते. 
कर्मकांड करणे हे माणसाचे वैशिष्ट्यच असते. त्यातही भारतीयांचे तर हे विशेष वैशिष्ट्य आहे. म्हणूनच आपल्याकडे प्रत्यक्ष कामापेक्षा त्याचे साजरीकरणच अधिक जोरात सुरु असते. त्याचाच परिणाम म्हणजे केलेल्या किंवा न केलेल्या कामांची पैशांची उधळपट्टी करून केलेली अमाप जाहिरात. अशा जाहिराती आपण व्यक्तिगत व सार्वजनिक पातळ्यांवर सातत्याने करीत असतो. काम सुरु करण्याआधीच शपथविधीचा कार्यक्रम जोरदारपणे साजरा करणे, उठसुठ वेगवेगळे दिन (योगदिन, स्वच्छता दिन इत्यादी), जाहीर करून साजरे करणे, योजनांची अंमलबजावणी करण्यापेक्षा त्यांचे नामकरणविधी गाजविणे यासारखे प्रकार करण्यात आपला हात कोणी धरू शकत नाही.
कामाची जाहिरात प्रत्यक्ष कामेच करतात. खरोखर कामे केली तर त्यांची वेगळी जाहिरात करण्याची आवश्यकताच निर्माण होणार नाही. उलट या जाहिरातीवर उडविला जाणारा पैसा अधिक कामे करण्यात खर्च होऊ शकेल.

विकासदराच्या अतिरेकी प्रदर्शनाबाबतीतही असेच म्हणता येईल. विकासदर हा येथील सामान्य लोकांच्या जीवनमानातून दिसून आला पाहिजे. लोकांची आर्थिक स्थिती, रोजगार, आरोग्य इत्यादी बाबी विकासदर निश्चित करीत असतात. त्यासाठी त्याची वेगळी जाहिरात करण्याची काहीच आवश्यकता नाही. हा विकासदर लोकांच्या जीवनमानात दिसला नाही तर उलट अशा जाहिराती लोकांची क्रूर थट्टा ठरू शकतात.