Sunday 30 October 2016

दिवाळी आणि बळी राजाचे स्मरण.

प्राचीन काळापासून भारतात संस्कृतीचे दोन मुख्य प्रवाह अविरतपणे वाहत आहेत, हे आपल्या वेळोवेळी प्रत्ययाला  येते. या दोन धारा परस्परांशी संघर्ष करीत तसेच समन्वय साधित किंवा एक दुसऱ्यावर जबरदस्ती करीत आपले मार्गक्रमण करीत असल्याचेही  दिसून येते. बळी राजाची प्रसिद्ध कथा ही वस्तुस्थिती अधिक प्रकर्षाने समोर आणते.

वेदोत्तर काळात विष्णू ही देवता इतर देवतांच्या तुलनेत अधिक प्रमाणात मान्यता पावलेली होती. त्यामुळेच विष्णूचे दशावतार सर्वप्रसिध्द आहेत. या दशावताराच्या कथेवर बहुतांश हिंदूंचा विश्वास व श्रद्धा असते. दुष्ट निर्दालनासाठी आणि धर्मसंस्थापनार्थ विष्णू अवतार घेत असतो, अशी हिंदूंची श्रद्धा असते. वामनावतार हा विष्णूचा पाचवा अवतार असल्याची पौराणिक कथा प्रसिद्ध आहे. तत्कालीन प्रसिद्ध व सामर्थ्यवान असलेल्या बळी राजाला पाताळात दडपणे हे या अवताराचे प्रयोजन. त्यासाठी बळीविरोधी परंपरेला वामनाचे स्वतंत्र पुराणही बनवावे लागले. तथापि या परंपरेला बहुजनांच्या हृदयसिंहासनावर आरूढ झालेल्या बळीराजाला  तसूभरही हलविता आलेले नाही. वामन हा ब्राह्मणी परंपरेचा प्रतिनिधी तर बळी राजा हा बहुजनांचा आदर्श राजा. आपली परंपरा सामर्थ्यशाली आणि दृढ करण्यासाठी विरोधी परंपरेतील श्रेष्ठ आदर्श स्वपरंपरेच्या अवगुंठनात आपलेसे करणे किंवा अशा आदर्शांना नेस्तनाबूत करणे अशी कृत्ये परंपरा करीत असतात. बहुजनांचा प्रभावशाली बळी राजा हा ब्राह्मणी परंपरेच्या विकासातील फार मोठा अडथळा बनला होता. या अडथळ्याला पाताळात दडपण्याची ब्राह्मणी परंपरेची गरज बनली होती. त्यातूनच वामनावतार व त्याची कथा यांची निर्मिती झाली असावी. परतू ही कथा तिच्या निर्मितीचे प्रयोजन साध्य करू शकली नाही. वामनाच्या आराधनेऐवजी लोक बळीचीच आठवण मोठ्या प्रमाणात साजरी करतात. दिवाळी अर्थात बलिप्रतिपदा हे त्याचे साक्षात उदाहरण.

“इडापिडा टळो अन बळीचे राज्य येवो”, ही इथल्या अडाणी माणसाची सदिच्छा, बळीचे भारतीय  संस्कृतीतील अढळ स्थान निश्चित करते, असे वाटते.

दिवाळीच्या निमित्ताने बळी राजाचे स्मरण करताना किंवा बळी राजाच्या स्मरणनिमित्ताने दिवाळी साजरी करताना आनंद होत आहे.

Saturday 29 October 2016

Tuesday 25 October 2016

चरित्र आणि आकलन-

कोणत्याही महापुरुषाचे चरित्र लिहिताना चरित्रकाराने तटस्थता तर बाळगलीच पाहिजे. त्यासोबतच तो चरित्रविषय असलेल्या महापुरुषाशी समरसही व्हायला पाहिजे. तटस्थता बाळगल्यामुळे तो त्या महापुरुषाचे विचार, कृती, उक्ती यांचे योग्य असे  मूल्यमापन करण्यात यशस्वी ठरू शकतो. आणि समरसतेमुळे त्या महापुरुषाने व्यक्त केलेले विचार केलेल्या कृती कोणत्या विशिष्ट सामाजिक-राजकीय-आर्थिक  अवस्थेत आणि कोणत्या मानसिक अवस्थेत केलेल्या आहेत याचे आकलन चरित्रकाराला होऊ शकते. कोणत्याही महापुरुषाच्या उक्ती-कृतीला त्या त्या देश-काळ-स्थितीच्या मर्यादा असतातच. चांगला चरित्रकार महापुरुषाच्या उक्ती-कृतीची मांडणी-वर्णन-मूल्यमापन करताना त्या त्या वेळची सामाजिक-राजकीय-आर्थिक अवस्था त्या महापुरुषाची मानसिक अवस्था पार्श्वभूमीवर ठेवतो. त्यामुळे वाचकाला त्या महापुरुषाचे आकलन योग्यप्रकारे होते. शाहू महाराजांचे चरित्र लिहिताना त्या काळाची राजकीय स्थिती लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण महाराजांना विशिष्ट राजकीय स्थितीच्या मर्यादेत आपले काम करावे लागलेले आहे. सावरकरांचे चरित्र लिहिताना सावरकरांची जन्माठेपेमुळे जी मानसिक अवस्था झालेली होती, ती लक्षात घेतलीच पाहिजे. म्हणजे त्यांच्या माफिनाम्याचाही अर्थ लागू शकतो तसेच त्यांचा माणूसघाणेपणाही समजून घेता येतो. फुल्यांचे चरित्र लिहिताना त्यांच्या शिक्षण ज्ञानाच्या मर्यादा आपण लक्षात घेतल्याच पाहिजेत. ते ज्या वातावरणात वाढले होते त्या वातावरणात तेवढी ज्ञान-साधणे त्यांना प्राप्त होणे शक्य नव्हते. किंवा अशी ज्ञान-साधणे मिळाली असती तरी त्यांना प्राप्त परिस्थितीत त्यांचा वापर करता आला असता काय? हे जर आपण समजून घेतले तर इंग्रजी सत्तेची वास्तविकता त्यांना समजली नाही ही बाब आपल्याला समजावून घेता येते. समाजातील सर्वात तळाशी असलेल्यांच्या उद्धाराची त्यांची तळमळ आपण समजून घेतली तर असा उद्धार करण्यासाठी इंग्रजी सत्ता अधिक अनुकूल होती, हे आपणास मान्य करावे लागेल. आणि मग इंग्रजी सत्तेविषयीची त्यांची आपुलकीही आपणास समजू शकते. मध्ययुगीन संतांची चरित्र लिहिताना संतांना असलेल्या त्या काळाच्या मर्यादा आपण लक्षात घेतल्याच पाहिजेत. आताच्या सामाजिक सुधारणांची त्यांच्याकडून अपेक्षा करणे चुकीचेच ठरेल. संतांकडून त्या काळात बुद्धिवाद, इहवाद यांची अपेक्षा करणेही  अवाजवीच म्हणावे लागेल. उगीचच आधुनिक मुल्ये त्यांना चिकटवणे अनैतिहासिकच म्हणावे लागेल. अशी मुल्ये त्यांच्या चरित्रात दाखविता आले नाहीत म्हणून  संत छोटेही ठरत नाहीत. 
या दृष्टीने विचार करता धनंजय कीर हे चरित्रकार सर्वात उजवे ठरतात, असे मला वाटते. महात्मा फुले, शाहूमहाराज, बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर यांना खऱ्या अर्थाने समजावून घ्यायचे असेल तर कीरांच्या चरित्रांना पर्याय नाही, असे मला वाटते. त्यांची चरित्रे वाचताना चरित्रनायक गुण-दोषांसहीत आपल्यासमोर स्पष्ट होतात. ही चरित्रे वाचताना आपणामध्ये  या चरित्रनायकांचे दोषही समजावून घेण्याची क्षमता निर्माण होते.
जाता जाता-

वरील पार्श्वभूमीवर आपण चरित्रनायकांना देवत्व बहाल करून या देवतांना एकेका जातीमध्ये बंद करून त्यांच्या आकलनाचे  मार्गच बंद करीत नाहीत काय?

Thursday 13 October 2016

मानवी मूल्यांचे रोपण?

मानवजातीच्या अस्तित्वासाठी आणि संवर्धनासाठी मानवी मुल्यांवर आधारित समाजरचना प्रस्थापित होण्याची आवश्यकता आहे यात कोणाला शंका असण्याचे कारण नाही. पण ही मुल्ये कोणती आणि ती कशी रुजवायची यावर अगणित मतभेद आहेत. 

मला वाटते कोणतीही मुल्ये व्यक्तीत रुजवायची असतील तर ती तिच्या बालपणातच रुजविणे यशस्वी होऊ शकते. प्रौढ वयातील व्यक्तींसाठी कितीही संस्कार शिबिरे घ्या, त्यांचा या व्यक्तींवर काहीही परिणाम होत नाही. त्यांना फक्त त्यांचा जवळचा फायदा दिसतो. अशा फायद्याच्या गोष्टींचा मात्र त्यांच्यावर चांगलाच परिणाम दिसतो. 

बालकांची मने संस्कारित करायची असतील तर त्यासाठी प्राथमिक-माध्यमिक शिक्षण यासारखा दुसरा उपाय नाही. अर्थात सध्याच्या शिक्षणव्यवस्थेचा यासाठी काहीही उपयोग नाही. त्यासाठी प्राथमिक-माध्यमिक शिक्षणव्यवस्था  मुळापासूनच सुधारण्याचे काम सर्वात प्राधान्याने हाती घ्यायची आवश्यकता आहे.

पण या बाबीकडे कोणतेही सरकार तितक्याशा  गांभीर्याने का बघत नाही , याचे मला सातत्याने आश्चर्य वाटत आलेले आहे.

Thursday 6 October 2016

तथाकथित देशभक्ती.

हे एक बरे आहे. एकदा पाकिस्तान विरोध व्यक्त केला किंवा पाकिस्तानला चार शिव्या दिल्या की आपल्या  देशभक्तीची परमावधी  सिध्द होते. मग आपण आपले काळे धंदे, भ्रष्टाचार, सामान्यांची लूट करायला मोकळे होतो. अशी काळी कृत्ये करण्याच्या आड अशी  देशभक्ती मुळीच येत नाही.

मला आपले उगीचच वाटत होते की देश म्हणजे देशातील माणसे. आणि त्यांचे दीर्घकालीन सामुहिक हित सातत्याने डोळ्यासमोर ठेऊन त्यासाठी प्रामाणिकपणे, भ्रष्टाचार न करता  झटणे हीच देशभक्तीची कसोटी आहे.