Monday 28 March 2016

"निष्पापतेलाही  सापाची वक्रता माहित असायला हवी" . इति फ्रान्सिस बेकन. 

थोडक्यात , तुम्ही कितीही चांगले असलात तरी जग नेहमीच तसे असेल हे सांगता येत नाही. जगाशी व्यवहार करताना जगाचा वाकडेपणा  नेहमीच लक्षात ठेवला  पहिजे. 

Tuesday 22 March 2016

मनात आले ते-


अ) एखाद्या महापुरुषांचा अनुयायी किंवा भक्त म्हणवून घ्यायचे असेल तर माझी भूमिका आणि वर्तन कसे असले पाहिजे? मला त्या महापुरुषांचे एकंदर विचार मान्य असावे लागतील. त्या महापुरुषांचे जीवनध्येय हे माझे जीवनध्येय बनले पाहिजे. त्या महापुरुषांचे आदर्श हे माझे आदर्श असले पाहिजेत. त्या महापुरुषाला जे विचार-आचार मानवतेसाठी घातक वाटत आले आहेत ते   मलाही घातक वाटले पाहिजेत. आणि त्याविरुद्ध मला मन लावून झगडले पाहिजे.
केवळ त्या महापुरुषाचा एखादा विचार अधोरेखित करून व त्या  महापुरुषाच्या नावाचा जयजयकार करून त्यांचा भक्त बनता येईल काय? त्यांची केवळ  स्मारके उभी करून त्यांच्या अनुयायीपणावर हक्क सांगता येईल काय?
पण आजकाल अशाच अनुयायांची चलती असल्याचे दिसून येते. खरे अनुयायीसुद्धा यामागचे सत्य समजून न घेता हुरळून जात आहेत. असे दांभिक अनुयायी या  मार्गाने त्या महापुरुषांचा पराभव करायला निघाले आहेत, हे खऱ्या अनुयायांनी लवकरात लवकर समजून घेतलेले बरे.

ब) कोणत्याही गोष्टीबाबत कसा विचार करावा हे लोकांना समजावून सांगण्याची गरज आहे. खरे तर याची सुरुवात प्राथमिक शिक्षणापासूनच केली पाहिजे. एखाद्याची चूक दाखविली तर ती व्यक्ती आपल्या चुकीबाबत न बोलता चूक दाखविणाऱ्याने यापूर्वी अशा चुका केलेल्या आहेत, हे दाखविते. आपण पण त्यावर प्रभावित होतो. आपण असा का विचार करीत नाही की, त्याच्या चुकीचे काय? त्या चुकीचा जबाब तर त्याने दिलाच नाही. आपण या चालू नेत्यांना पकडले पाहिजे.

क)चाकोरीबाहेरचा विचार आपल्याला पेलवत नाही. आपली विशिष्ट विचारसरणी, आपले पूर्वग्रह, तसेच आपल्या तथाकथित अस्मिता याला कारणीभूत असाव्यात. डेन्मार्क, स्वीडन आदी देशांतील सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक अवस्थेविषयी कौतुक केले की त्यात काय एवढे? त्यांचा आकारच केवढा? आपली तुलना त्यांच्याशी कशी होईल, असे अनेक मुद्दे  पुढे केले जातात. मग आपणही आपल्या देशाचे छोटे छोटे घटक करूयात. म्हणजे कामाची अंमलबजावणी आणि नियंत्रण परिणामकारक होईल. पण नाही. छोट्या घटकाचे नाव काढले तरी आपल्या फुकटच्या अस्मिता उफाळून येतात. आणि आपण असा विचार करणाऱ्यांचा जीव घ्यायला उठतो. दुर्दैव, दुसरे काय?


असाच एक भयानक विचार. काश्मीरप्रश्नामुळे आपला देश सातत्याने अस्थिर राहिला आहे. आपली अमाप साधनसंपत्ती काश्मीरच्या प्रश्नावर खर्च होत आहे. आपले कित्येक सैनिक काश्मीरमध्ये मृत्युमुखी पडत आहेत. अशा परिस्थितीत तेथील लोकांना काय वाटते यावर काश्मीरचा निर्णय घेतला तर! खरे तर पूर्वी तसेच ठरले होते. पण आपण आज असा विचारही करू शकत नाहीत. असे करून आपण काय साध्य करीत आहोत कोण जाणे !

Tuesday 15 March 2016

Wakeup: कन्हैया- किती हीचर्चा! समर्थक आणि विरोधक यांच्याती...

Wakeup: कन्हैया- किती हीचर्चा! समर्थक आणि विरोधक यांच्याती...: कन्हैया- किती ही चर्चा! समर्थक आणि विरोधक यांच्यातील युद्धच जणू. तो जे बोलला ते प्रभावी होते, हे विरोधकही मान्य करतील. पण त्यात नवीन काय ह...

कन्हैया।

कन्हैया- किती ही चर्चा! समर्थक आणि विरोधक यांच्यातील युद्धच जणू. तो जे बोलला ते प्रभावी होते, हे विरोधकही मान्य करतील. पण त्यात नवीन काय होते? विशिष्ट विचारधारेच्या(कम्युनिस्ट) चौकटीतीलच विचार होते ते. अनेक वर्षांपासून आपण हे विचार ऐकतो. तरीही या विचारांच्या निमित्ताने कान्हैयाचे अमाप  कौतुक चालले आहे!
विरोधकही किती त्वेषाने टीका करीत आहेत! आता देशासमोर फक्त एकच संकट उभे आहे. ते म्हणजे कन्हैया. मग त्याला देशद्रोही ठरविण्याची न्यायालयीन भूमिका पार पाडायची, त्याच्या भाषणातील तपशिलाच्या चुका शोधायच्या, त्याच्या गरिबीपासून आजादीच्या घोषणेवर ‘गरिबी कोणी आणली’ असे असंबद्ध प्रश्न उपस्थित करायचे, त्याच्या भांडवलशाहीविरोधाला फैलावर घ्यायचे, असे नित्य उपक्रम चालू आहेत. तो मार्क्सवादाची भलामण करतो म्हणून त्याच्यावर टीका करायची, मार्क्सवादाने कोणाचे भले केले, असे म्हणायचे, हिटलरपेक्षा कम्युनिस्ट राजवट अधिक हिंसक हे सुचवायचे, असे हास्यास्पद प्रकारही जोमाने चालू आहेत. अशा टीकेमुळे कान्हैयालाच अधिकाधिक प्रसिद्धी मिळत आहे. त्यामुळे विरोधकांच्या विरोधामागच्या हेतुचाच पराभव होतो.

देशप्रेमाचे भडक नाटक दाखविणे, देशप्रेमाचे कर्मकांड करणे यातच तथाकथित देशभक्तांची देशभक्ती सामावलेली असल्याचे दिसून येत आहे. अरे! देश म्हणजे देशातील माणसेच ना! त्यांच्या अवनत स्थितीकडे बघा. त्यांचे हित साधण्यात स्पर्धा करा. खरा देश व देशप्रेम तिथेच आहे. बाकी सगळा तमाशा!

Wednesday 2 March 2016

अर्थसंकल्प आणि ग्रामीण भारत।

बहुत्येक देश ग्रामीण भागात वसतो, हे अर्थसंकल्पाने मान्य केल्याचे दिसून येते. सकल राष्ट्रीय उत्पादनात कृषी क्षेत्राचे योगदान अगदी तुटपुंजे असले तरी त्यावर ६५% लोकांची उपजीविका चालते हे अतिशय मत्त्वाचे आहे. त्यामुळे कृषीक्षेत्राचे  महत्त्व हे सकल राष्ट्रीय उत्पादनातील त्याच्या वाट्यावर  अवलंबून नसून ते क्षेत्र किती लोकांना जगवते यावर अवलंबून आहे.
अर्थसंकल्पाद्वारे ग्रामीण भारतासाठी भरीव तरतूद केली असली तरी ही तरतूद कशाप्रकारे खर्च केल्या जाते यावर या तरतुदीचे मत्त्व अवलंबून असेल. विविध योजनांच्या  अंमलबजावणीचे यश हे सरकारच्या इच्छाशक्तीवर अवलंबून आहे. सरकारचा हा संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी सरकारला प्रशासकीय यंत्रणेवर अवलंबून राहणे भाग आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणा सक्षम व परिपूर्ण असणे आवश्यक आहे. रिक्त जागा ठेवून किंवा भरतीवर बंदी घालून यंत्रणेत सक्षमता आणता येणार नाही, हे पक्के लक्षात ठेवले पाहिजे. कर गोळा करणे असो की सरकारी योजनांची अंमलबजावणी असो, माणसे लागणारच. त्याशिवाय कागदावरील योजनांना किंवा तरतुदींना काडीचाही अर्थ राहणार नाही. म्हणूनच  केवळ आकर्षक अर्थसंकल्पाने इच्छित साध्य प्राप्त करता येणार नाही हे आपल्या आतापर्यंतच्या अनुभवाने सिध्द होण्यासारखे आहे. अर्थसंकल्पावरील चर्चांचा आढावा घेतला असता अर्थसंकल्पाच्या अंमलबजावणीच्या पैलूला कोणी का स्पर्श करीत नाही, हे कळत नाही.
प्रशासन यंत्रणा सक्षम करण्याच्या दृष्टीने केवळ आवश्यक तेवढे  मनुष्यबळ पुरविणे एवढेच पुरेसे नाही तर या यंत्रणेत क्षमता, पारदर्शकता, लोकाभिमुखता, प्रामाणिकता येणे आवश्यक आहे. त्यासाठी सरकारने आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या पाहिजेत. सरकारचे यशापयश हे मुख्यत: या प्रशासकीय यंत्रणेच्या कामावरच अवलंबून असते. सरकारचा लोकांसामोरील चेहरा या प्रशासकीय यंत्रणेच्या रूपानेच व्यक्त होत असतो. आजच्या प्रशासकीय यंत्रणेतील अक्षमता, ढिसाळपणा, कमालीचा भ्रष्टाचार, टोकाची लोकाविन्मुखता सरकारची ध्येये प्राप्त करण्यात अडथळे ठरत आहेत.
कार्यक्षम अंमलबजावणीसाठी व्यवस्थेमध्येच Feedback ची यंत्रणा अंतर्भूत असणे आवश्यक आहे. त्यामुळे अंमलबजावणीची स्थिती, गती, दिशा, आणि त्यामध्ये येणारे अडथळे यांची वेळीच माहिती होऊ शकते. जेणेकरून योजनाची गती व दिशा आवश्यकतेप्रमाणे  बदलता येते व असलेले अडथळे दूर करता येणे शक्य होते.

सारांश, अर्थसंकल्पाचे यश हे अर्थसंकल्पाच्या स्वरूपापेक्षा त्याच्या अंमलबजावणीवर अवलंबून आहे, हे मान्य केले पाहिजे.