Tuesday 23 February 2016

देशद्रोह कशाला म्हणायचे?

देशविरोधी घोषणा देणे हा देशद्रोह होतो किंवा नाही, यावर देशभर चर्चा सुरु आहे. कायदेशीरदृष्ट्या अशा प्रकाराला देशद्रोह म्हणता येत नसले तरी सामान्यांच्या दृष्टीने हा प्रकार गंभीरच आहे आणि तो तसाच घेणे आवश्यक आहे. ज्या कृतींना देशद्रोह म्हटल्या जाते त्यांची सुरुवात अशाच घटनांनी सुरु होऊ शकते. परंतु असे वादंग  लोकांचे लक्ष्य मूळ प्रश्नांवरून इतरत्र वळविण्याचे  काम करतात. अशा घोषणा खरोखरच केल्या गेल्या आहेत काय आणि त्या कोणी केल्या आहेत हे शोधून काढण्याचे काम पोलिसांचे आहे. अशा घोषणा  खरोखरच केल्या असतील तर अशा प्रवृत्तींना पायबंद घातलाच पाहिजे. कारण या बाबी देशाला अहितकारकच आहेत.  मग त्या  देशद्रोह ठरोत की न ठरोत. 

आता देशविरोधी म्हणजे कोणाविरुद्ध याचे उत्तर शोधण्यापूर्वी देश म्हणजे काय, हे पाहिले पाहिजे. एका विशिष्ट भूप्रदेशात राहणारे व ज्यांच्यात एकत्वाची भावना आहे आणि ज्यांच्यावर त्या भूमीतील कायद्याचेच अधिराज्य चालते असा मानवीसमूह म्हणजे देश होय. थोडक्यात त्या त्या देशातील लोक म्हणजे देश होय. याचा अर्थ देशविरोधी म्हणजे त्या त्या देशातील लोकांच्या हिताच्या विरुद्ध असलेली कोणतीही कृती.

देशद्रोही कृत्यांची चर्चा करताना देशविरोधी व सरकारविरोधी कृत्यांमध्ये गल्लत केल्या जात आहे, असे वाटते. आजच्या लोकसत्तामधील चिदंबरम यांचा लेख वाचताना याचा प्रत्यय येतो. आपल्या देशाचे सरकार हे घटनात्मक असून ते घटनेप्रमाणे चालविले जाणे अपेक्षित आहे. सैद्धांतिकदृष्ट्या ते तसेच चालविल्या जाते असे समजणे भाग आहे. त्यामुळे सरकारविरोधी म्हणजे देशविरोधी असे समजले जात असावे. प्रत्यक्षात कोणतेही सरकार अचूकपणे लोकहिताचे अनुसरण करू शकत नाही. सरकारकडून बऱ्याचवेळा लोकहिताच्या विपरीत निर्णय किंवा कृती केल्या जातात. एवढेच नव्हे तर विधानमंडळाने केलेले कायदेही कालांतराने अहितकारक ठरतात. अशा वेळी सरकारच्या निर्णयांना किंवा कृतींना किंवा कायद्यांना विरोध करावाच लागतो. घटनात्मक सरकारला केला  म्हणून असा विरोध काही देशविरोध ठरू शकत नाही.परंतु असा विरोध सरकारच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह लावणारा नसावा.


थोडक्यात सांगायचे झाल्यास, लोकांच्या घटनात्मक वैयक्तिक अधिकारांना तसेच एकत्वाच्या भावनेने एकत्रित  आलेल्या  लोकसमूहाच्या व्यापक अधिकारांना तसेच देशातील लोकांच्या एकत्वाच्या भावनेला अहितकारक असलेल्या बाबींना देशविरोधी समजले पाहिजे. कायद्याने या बाबींना देशविरोधी म्हणता येत नसेल तर कायदे बदलले पाहिजेत. परंतु सरकारच्या धोरणांना विरोध दर्शविणाऱ्या कृतींना  देशविरोधी कृतींचे  स्वरूप देण्याची चूक करता कामा नये.

Sunday 21 February 2016

काटकसर। पाणी।GDP । प्रेरणा ।

काही तत्त्वे, साध्या गोष्टी म्हणता येतील, एवढी साधी असतात. सगळ्यांनाच ती माहित असतात. परंतु त्यांचे निर्णायक मत्त्व आपण समजत नाही. उदाहरणार्थ काटकसरीचे तत्त्व. हे तत्त्व आपल्या जीवनात अवलंबविले तर आपण आपल्या उपभोगात काटकसर करूत. त्यामुळे आपल्या उधळपट्टीला  लगाम बसेल. पर्यायाने पाणी, खनिजे, खनिज तेले यासारख्या  नैसर्गिक संसाधनात बचत होईल. थोडक्यात पर्यावरण शोषण व प्रदूषण या ज्वलंत समस्येला आळा बसण्यास मदत होईल. पण आपण काटकसरीच्या तत्त्वाला एवढे महत्त्व देतो काय? प्राथमिक शिक्षणापासून मुलांवर या तत्त्वाचा प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतो काय? दुर्दैवाने या प्रश्नांची उत्तरे “नाही” अशीच द्यावी लागरील.

असाच विचार पाण्याविषयी करता येईल. आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी सातत्याने चर्चा-अभ्यास करतो. या अभ्यासकांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे मूळ अज्ञान, कर्ज, बाजारपेठ व वितरणाचा प्रश्न, शेतमाल साठवणुकीचा प्रश्न, अल्प उत्पादकतेचा प्रश्न, शेतमालाला उत्पादनखर्च आधारित भाव न मिळणे या सारख्या प्रश्नांमध्ये दिसते. परंतु शेतकऱ्यांचा मूळ प्रश्न सिंचनाचा आहे, या वस्तुस्थितीवर आपण का भर देत नाही?  इतर अनेकविध प्रश्नांची चर्चा करून आपण मूळ प्रश्नांवरील लक्ष विचलित तर करीत नाही?  इतर प्रश्न आहेतच. परंतु सिंचनाचा मूळ प्रश्न सोडविल्याशिवाय इतर प्रश्नांना हात घालून उपयोग काय? अगदी ठिबक सिंचनाचा वापर करण्यासाठीही थेंबभर तरी पाणी पाहिजेच ना!  हजारो कोटी रुपये सिंचनावर खर्च करून आपण सिंचन क्षेत्रात किती भर टाकली हा लाज आणणारा प्रश्न आपल्याला का पडत नाही. आताही पाण्याचा अतिवापर टाळण्यासाठी आपण काय प्रयत्न करतो? वाया जाणाऱ्या पाण्याला अटकाव करण्यासाठी आपल्याकडे काय उपाययोजना आहेत? थेंबभरही पाणी वाया जाता कामा नये ही भावना लोकांच्या मनांवर बिम्बाविण्यासाठी आपण सातत्याने प्रबोधन करण्याची गरज आहे. काटकसरीचा वापर करून थेंबभर पाणीही वाया जाऊ न देणे, पावसाद्वारे  उपलब्ध होणारे थेंब थेंब पाणी साठविणे, अल्प पर्जन्यावर येणाऱ्या पिकांचे संशोधन व प्रसार या त्रिसूत्रीचा वापर मानवी भविष्याच्या संरक्षणासाठी अत्यावश्यक आहे. पाणीच नसेल तर कोणती अत्याधुनिक तंत्रे वापणार?  काय बाजारपेठेत आणणार? कशाला उत्पादनखर्चाधारित भाव देणार? याचा आपण का विचार करीत नाही?
“कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात स्वत:पासून केली पाहिजे”, हे एक अति लोकप्रियता लाभलेले विधान! पण अशी सुरुवात कोणीच का करीत नाही, याचा विचार मात्र आपण  करीत नाही. अशी सुरुवात करण्यासाठी लोकांना एक प्रेरणा लागत असते. अशी प्रेरणा आर्थिक सुधारणाप्रेरित बाजारपेठेत विकत मिळत नाही, हे आपण समजून घेतले पाहिजे. त्यासाठी अशा प्रेरणा आपल्याला जित्याजागत्या समाजातून मिळाल्या पाहिजेत. कुठे आहेत या प्रेरणा? कोणी शोधून देता का या प्रेरणा?

आज आपण GDP च्या वृद्धीदराला अत्याधिक महत्त्व देत असतो. परंतु या GDP वृद्धीचे प्रतिबिंब आपणास ६५ % ग्रामीण जीवनांमधून दिसून येते काय? जर या तथाकथित GDP चा सबंध या ६५ % ग्रामीण जीवनांशी दाखविता येत नसेल तर आपल्या आर्थिक धोरणांचा पुनर्विचार करायला नको काय? शेवटी देश म्हणजे देशातील बहुसंख्य माणसेच ना! देशाचे उत्पन्न म्हणजे या देशातील या माणसांचेच उत्पन्न नव्हे काय? आणि हे उत्पन त्यांच्या जीवनमानातूनच प्रतिबिंबित होईल.

Monday 15 February 2016

मुस्लमान आणि आम्ही। विचार तर कराल।

दि. ०५-०२-२०१६ च्या वृत्तपत्रांमधील बराक ओबामा यांनी व्यक्त केलेले विचार जागतिक नेतृत्वाला मार्गदर्शक आणि दिशा देणारे ठरू शकतात. ‘अमेरिका इस्लामला दडपण्याचा प्रयत्न करीत नाही हे दर्शवून देणे हा दहशतवादाविरोधात लढण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे’, हे ओबामांचे उद्गार अतिशय महत्त्वाचे आहेत. इस्लामला विश्वासात घेतल्याशिवाय या लढ्यात आपल्याला त्यांचे भरीव सहकार्य घेता येणे शक्य नाही. मुसलमानांच्या मनांमध्ये  सुरक्षितता निर्माण करण्याची जबाबदारी आपणच पार पाडली पाहिजे. मुसलमानांना ते वेगळे आहेत हे जाणवून देणाऱ्या आपल्या कृती आणि उक्ती देशाला  हितावह नाहीत, हे आपण समजून घेतले पाहिजे. मुसलमानांकडे पूर्वग्रहदूषित दृष्टीने बघणे आपण आता सोडले पाहिजे. या पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनामुळे सर्वसामान्यांकडून काही चुकीच्या गोष्टी घडतात. आणि त्यातून मुसलमान युवकांमध्ये वैफल्याची भावना निर्माण होऊ शकते. या वैफल्यग्रस्त युवकांना भरकटत नेण्यासाठी काही दुष्ट शक्ती टपलेल्याच आहेत. आपल्या हातून त्यांना मदत होणार नाही, याची आपण काळजी घेणे आवश्यक आहे.
आज मुसलमान मोकळेपणाने व्यक्त होतात असे दिसत नाही. देशात घडणाऱ्या विविध घटनांबद्दल त्यांना काय वाटते हे समजून घेण्याची आपल्यालाही गरज वाटत नाही. किंवा त्यांना या घटनांबद्दल काय वाटते हे आपण आपल्या मनानेच निश्चित करीत असतो. एखाद्याने आपली अस्वस्थता थोडी जरी व्यक्त करण्याचा प्रयत्न केला तरी सर्व समाजमाध्यमे त्याच्यावर तुटून पडतात.त्यामुळे त्यांच्यामधील अस्वस्थतेमध्ये अधिकच भर पडते. कोणत्याही घटना, विचार याविषयी मुस्लिमांचाही काही विशिष्ट दृष्टीकोन असू शकतो, हे आपण का लक्षात घेत नाही? हा दृष्टीकोन आपण समजून घेण्याची आता  गरज निर्माण झालेली आहे. मुसलमानांमधील एखाद्या विघातक प्रवृत्तीवरून अखिल मुसलमान समुदायाला धारेवर धरायला आपल्याला आवडते. त्यमुळे या समुदायात किती अस्वस्थता निर्माण होत असेल याचा विचारही आपण करीत नाही. जणू काही हा समुदाय म्हणजे शत्रू ग्रहावरील निराळी वस्ती आहे.
सर्वसामान्य मुस्लिमांची आर्थिक अवस्था आपल्या कोणापासूनही झाकलेली नाही. त्याबद्दल आपल्याला कधी सहानुभूती वाटल्याचे दिसत नाही. सच्चर आयोगाचे कोणी नावही काढत नाही. असे का होते, याचा गंभीरपणे विचार करण्यची गरज आहे. मुस्लिमांमधील काही अपप्रवृत्ती  या त्यांच्यातील आर्थिक दारिद्र्याचीही उपज नसेल काय?

मुसलमान हे आपल्या देशाचे अपरिहार्य घटक आहेत, हे आपण मनातून स्वीकारण्याची आवश्यकता आहे. कारण त्यांना वगळून आपल्याला आपल्या देशाची कल्पना करता येणार नाही. धर्मावर आधारित द्विराष्ट्रवादाच्या भावनेला आपण थारा देता कामा नये. देश सुदृढ व्हायचा असेल तर देशाचा प्रत्येक घटक स्वस्थ असणे आवश्यक आहे. मुसलमानांना सोडून आपल्याला देशाची उभारणी करता येणार नाही. मुसलमानांनीही या देश उभारणीच्या कामात मनातून सहकार्य करण्याची वेळ आलेली आहे. त्यासाठी मुसलमानांनीही त्यांच्यातील विघातक प्रवृत्तींचा सक्रीय निषेध करून अशा प्रवृत्तींना  हतोत्साहित करण्याची गरज आहे. हिंदू-मुसलमान या दोन्हीही समुदायांनी एकमेकांकडे सकारात्मक दृष्टीने बघितले पाहिजे आणि देशाच्या उभारणीत एकमेकांना हात दिला पाहिजे.

Thursday 11 February 2016

शिक्षण व्यवस्थेची दुरावस्था।

दोन वर्षांचा डी. एड. चा थातूरमातूर अभ्यासक्रम पूर्ण करून येणाऱ्या अपरिपक्व पोरांच्या हातात आपण देशाचे भावी भविष्य सोपवीत असतो. हे किती भयंकर आहे हे आपल्या लक्षात का येत नसावे? या तथाकथित शिक्षकांची Maturity काय, त्यांचा अनुभव काय, त्यांचे ज्ञान ते काय, त्यांचा  बालमानसशास्त्राचा अभ्यास तो काय यांचा आपण मुळीसुद्धा विचार करीत नाही, याचे खरोखरच आश्चर्य वाटते. ही लहान मुले शाळेत शिकताना त्यांच्या जडणघडणीच्या अवस्थेत असतात. त्यांच्या सभोवती घडणाऱ्या बऱ्या-वाईट घटनांचा त्यांच्यावर तात्काळ परिणाम होत असतो. त्या परिणामांच्या स्वरूपावर व प्रमाणावर मुलांच्या मनाचे वळण अवलंबून असते. सध्याच्या शिक्षकांना या मुलांशी मानसशास्त्रीयदृष्ट्या आंतरक्रिया साधता येणे शक्य होइल काय?  याचा गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता आहे. त्यसाठी या शिक्षकांना बालमानासशास्त्राचे मुलभूत ज्ञानही  आवश्यक नाही काय?

आपल्याला  भारताची भावी पिढी घडवायची असेल तर आपण किती गंभीर असले पाहिजे! या विद्यार्थ्यांना  इतर अनेक  सुविधा देण्याबरोबरच त्यांना सुजाण, अनुभवी,ज्ञानी व बालमानसशास्त्रात प्रभावी अशा शिक्षकांकडे सोपविले पाहिजे. असे शिक्षक तयार करण्यासाठी  शिक्षकांच्या अभ्यासक्रमात अमुलाग्र बदल करण्याची गरज आहे. या अभ्यासक्रमात प्रामुख्याने बालमानसशास्त्राचा समावेश केला पाहिजे. खरे तर बालमानसशास्त्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्यांना येथे प्राधान्य दिले पाहिजे. मुलांना जसे आपल्या जीवनात डॉक्टर, इंजिनिअर, अधिकारी व्हावेसे  वाटते तसेच त्यांना शिक्षक व्हावेशे  वाटावे. त्यासाठी शिक्षकांचे करिअर उज्ज्वल वाटेल असे काही तरी करावे लागेल. त्यासाठी कितीही बदल आणि कितीही खर्च करावा लागला तरी तो कमीच समजाला  पाहिजे. देशाच्या उज्ज्वल भाविष्यापुढे खर्चाची मातब्बरी ती काय? तो खर्च नव्हे, गुंतवणूकच आहे.

Wednesday 10 February 2016

चुकांचे हास्यास्पद समर्थन।

आपल्या हातून किंवा आपल्या आदर्शांच्या हातून एखादी तथाकथित  चुकीची कृती-उक्ती झाल्यास तिचे निर्भीडपणे समर्थन करणे किंवा ती मान्य करणे हे आपण समजू शकतो. परंतु असे करण्याऐवजी आपण इतर लोकांनी यापूर्वी अशा चुका कशा केलेल्या होत्या, याची जंत्रीच देतो. असे केल्याने आपल्या चुकीचे समर्थन होऊच शकत नाही, हे आपल्या लक्षात कसे बरे येत नसावे? लक्षात येत असेल तर याप्रकारे आपण वाचकांची दिशाभूल करीत असतो असेच म्हणावे लागेल. भाऊ तोरसेकरांसारख्यांच्या ब्लॉग वरून हे सतत जाणवते.  वाचकही बऱ्याचवेळा मूळ प्रश्न विसरून अशा वाचकांच्या मागे वाहवत जातात. वाचकांनी अशांना जाब विचारला पाहिजे. अरे बाबा रे! त्यांनी चुका केल्या. त्यांचे आम्ही बघून घेऊ. पण तुमच्या चुकांचे काय? त्यावर आधी बोला ना! आपण असे केले तर यांना खिंडीत पकडल्यासारखे होईल. हे लोक निरुत्तर होतील. लोकशाहीमध्ये हेच अपेक्षित नाही काय?

Sunday 7 February 2016

समाजसेवेचे ढोंग.

राजकारणात विशिष्ट स्थान असणाऱ्या व्यक्ती आणि नोकरशाहीतील प्रस्थापित अधिकारीवर्ग बऱ्याचवेळा समाजसेवेत भाग घेत असल्याचे दिसते. वृत्तपत्रातून या तथाकथित समाजसेवेच्या चर्चाही होतात. ही मंडळी आवर्जून सार्वजनिक कार्यक्रमांतून स्वत:ला प्रकट करण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. यांच्या एकंदर अविर्भावातून हे खरोखर समाजसेवा करतात की तसे केल्याचे नाटक करतात याबाबत सर्वसामान्यांचा गोंधळ उडतो. बहुतेक ही मंडळी नाटकच करीत असणार. त्याचे कारण हे लोक त्यांच्या भूमिका पार पाडताना जो गोंधळ घालतात यात सापडते. आपल्या भूमिका पार पाडताना केले जाणारे लफडे, भ्रष्टाचार, कामचुकारपणा, नकारात्मक दृष्टीकोन, ढोंगीपणा, अपारदर्शकता यातून यांचे खरे स्वरूप उघड होते. यांना त्याची जाणीवही असते. हीच जाणीव त्यांना टोचत राहते. या जाणिवेची बोच कमी करण्याच्या दृष्टीने यांना मग यांना  समाजसेवेचे नाटक करावे लागते. सुट्टीच्या दिवशी आदिवासी पाड्यात जाऊन जुने कपडे, भांडी वाटणे, एखाद्या आपत्कालीन जागी जाऊन सेल्फी काढणे व तो whats app किंवा face book वरून मिरविणे, सार्वजनिक कार्यक्रमातून नितीमत्ता  शिकविणारी भाषणे ठोकणे, अशा भाषणांना  प्रसिद्धी मिळवून देणे, भानाप्रधान व आकर्षक असे विचार समाजमाध्यमातून share करणे, त्यासाठी एकमेकांना आवर्जून दाद देणे, त्याचीही प्रसिद्धी करायला न चुकणे अशी अनेक नाटके ही लोक करतात. असे करताना यांना मुळीच संकोच वाटत नाही. खरे तर मला लाजा वाटत नाहीत, असे म्हणायचे आहे. ही समाजसेवेची नाटके झाली की मग ही मंडळी आपल्या नियतकालिक ओल्या पार्ट्या साजऱ्या करायला मोकळी होतात.
समाजसेवेची ही  सगळी नाटके  करण्याऐवजी यांनी आपल्या वाट्याला आलेल्या भूमिका जर प्रामाणिकपणे पार पाडल्या तर समाजावर यांचे उपकारच होतील. हीच खरी समाजसेवा नव्हे काय? पण हे लोक असे करणार नाहीत. कारण असे करण्यात यांची पैशाची व प्रसिद्धीची हाव शमणार नाही. समाजाचे हे दुर्दैव आहे. आपला मीडियाही अजूनही बालिश तसेच भ्रष्टही आहे. अन्यथा मिडीयाने यांचे अंतरंग उघड केले असते आणि खरे चारित्र्यवान लोक प्रसिद्धीला आणले असते. पण असे होणार नाही. कारण खऱ्या चारित्र्यवान लोकांना प्रसिद्धीचे तंत्र माहित नसते आणि खरे तर त्यांना या प्रसिद्धीची गरजही वाटत नसते. त्याचप्रमाणे या चारित्र्यवान लोकांकडे प्रसिद्धी विकत घेण्यासाठी पैसे कुठे असतात?

आता तरी लोकांनीच जागृत व्हावे. पेपरवाल्यांच्या भूलथापांना बळी पडू नये. आणि  या ढोंगी आणि दांभिक लोकांचे बुरखे टराटर फाडून टाकून यांचे सत्यस्वरूप उघड केले पाहिजे.  बस झाली नाटके. 

Wednesday 3 February 2016

खरोखर सहिष्णुता आहे काय?

देशात सहिष्णुता आहे किंवा नाही यावर फार मोठे वादंग आपण अनुभवीत आहोत. परंतु देशातील सर्वसामान्य अल्पसंख्य आणि शोषित यांना याविषयी  काय वाटते, याचा विचार फारसा केल्या जात नाही. अल्पसंख्य आणि शोषित यांच्या संरक्षणाचे व हिताचे विचार मांडणाऱ्यांना काय अनुभव येतात, याचीही दखल घेतल्या जात नाही. धर्मनिरपेक्षता, व्यक्तिस्वातंत्र्य, वैज्ञानिक दृष्टीकोन, समता, विज्ञानसमर्थित इतिहासवाद यांचे समर्थक आणि पुरस्कर्ते आपले विचार बिनधास्तपणे मांडू शकतात काय? त्यांच्या मतांचा प्रस्थापित लोक आदर करतात काय? याही प्रश्नांची उत्तरे आपणास शोधावी लागतील.
एखादे वादग्रस्त मत अल्प्संख्याकाने केले किंवा बहुसंख्याकाने केले यावर आपल्या प्रतिक्रियांचे प्रमाण व स्वरूप अवलंबून असते. आज एकंदर परिस्थितीविषयी अल्पसंख्यांकांना काय वाटत असते, हे आपण जाणून घेऊ इच्छित नाहीत. आपल्याला त्याची गरजही वाटत नाही. पुरोगाम्यंना उत्तरे देण्याऐवजी त्यांना शिव्या देऊन पुरोगामी हीच शिवी बनविण्याचा आपला उद्योग काय सांगतो?  परंपरासमर्थकांच्या अवैज्ञानिक दाव्यांना वैज्ञानिक उत्तरे देण्याचीही लोकांना का भीती वाटते?

देशात सहिष्णुता आहे किंवा नाही याचे उत्तर शोधण्यासाठी ज्यांना या असहिष्णुतेला तोंड द्यावे लागते त्यांनाच विचारावे लागेल. या वादात भाग घेणाऱ्यांना आपले म्हणणे सिद्ध करण्यासाठी  या घटकाचेच  अनुमोदन घ्यावे लागेल. अन्यथा या चर्चेला काही अर्थ नाही. आणि या घटकाला असे का वाटते याचाही आपण विचार करणे आवश्यक आहे.

Tuesday 2 February 2016

स्त्रियांचा मंदिरप्रवेश.

सध्या स्त्रियांच्या मंदिरप्रवेशासंबंधी सर्व वृत्तपत्रांमधून चर्चा सुरु झालेली आहे.  मला या चर्चेच्या निमित्ताने ‘ऋतुमतीचा विटाळ’ या कल्पनेला केल्या गेलेला एक  ऐतिहासिक विरोध आपल्या नजरेस आणून द्यावयाचा आहे.
भारतातील धार्मिक परंपरेने स्त्रियांच्या तथाकथित अपावित्र्याचा  मन:पूर्वक पुरस्कार केल्याचे आढळते. या कल्पनेला इतिहासात फारसा विरोध झाल्याचे दिसत नाही. याला एक सुस्पष्ट अपवाद आहे, चक्रधर स्वामींच्या नि:संदिध विरोधाचा. त्यांच्या जीवनातील या संदर्भात घडलेला एक प्रसंग अतिशय बोलका आहे. तो पुढीलप्रमाणे-
चक्रधरस्वामींच्या अंगठ्याला ऋतुमती असलेल्या उमाइसाचा स्पर्श होतो. उमाइसा स्वाभाविकपणे संकोचते. स्वामी तिची थट्टा करतात. ते म्हणतात- “या अंगठ्याला विटाळ झाला. आता त्याला(पवित्र करण्यासाठी) माल्लीनाथाला-केदारनाथाला न्यावे लागेल. या थट्टेनंतर चक्रधरस्वामी आपल्या अनुयायांना जे काही समजून सांगतात ते बौद्धिक-वैज्ञानिक युक्तिवादाचा उत्तम नमुना आहे. ते म्हणतात- “ अशी नव द्वारे आहेत. मल, मुत्र, शेंबूड, डोळ्यांचा मळ, तसाच हा एक धातू स्रवतो व ठरावीक कालावधीनंतर निवर्ततो. त्याचा विटाळ धरू नये.” उमाइसाला हे मान्य होते. ती म्हणते- “ आजपासून असा विटाळ धरणार नाही.”
वरील प्रसंगातून श्रीचक्रधरांचा पुरोगामी दृष्टीकोन प्रत्ययाला येतो. त्याचप्रमाणे भारतीय इतिहासात इसवीसनाच्या तेराव्या शतकातच विटाळाच्या बुरसटलेल्या कल्पनेला बौद्धिक विरोध केल्या गेल्याचेही स्पष्ट होते. सुशिक्षित म्हटल्या जाणाऱ्या बऱ्याचशा स्त्रिया आजही विटाळ या कल्पनेला आपल्या मनातून काढू शकत नाहीत, हे पाहिल्यावर चक्रधरस्वामींच्या वरील विचारांचे कौतुक वाटल्याशिवाय राहणार नाही.