Monday 16 September 2013

ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या प्रारंभी गणेशवंदन केलेले आहे, हे आपल्याबरोबरच बहुतेक सर्व अभ्यासकांचे आणि सर्वसामान्य वाचकांचेही मत दिसते. मी मात्र जेंव्हा जेंव्हा ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय वाचतो किंवा कोणत्याही लेखकाचे या बद्दल मत वाचतो, तेंव्हा तेंव्हा मला याविषयी प्रश्न पडतो.
आता मी या विषयावरील माझे मत आपल्यासमोर विचारार्थ ठेवतो.
भगवद्गीतेमध्ये अनन्यभक्तीचा आग्रह धरलेला आहे. ‘अनन्य भक्ती’ याचा अर्थ एका ईश्वराशिवाय किंवा श्रीकृष्णाशिवाय इतर कोणत्याही देवदेवतांची भक्ती करायची नाही. ज्ञानेश्वरांनाही याची कल्पना असणे स्वाभाविक आहे.
असे असताना ज्ञानेश्वर गणेशवंदन  कसे करतील, हा माझ्यापुढील प्रश्न आहे.
आपण प्रथम ज्ञानेश्वरीच्या पहिल्या काही ओव्या उद्धृत करूयात.-
‘ओम नमोजी आद्या, वेदप्रतिपाद्या
जय जय स्वसंवेद्या, आत्मरुपा’
या मध्ये स्पष्ट दिसते की, ज्ञानेश्वरांनी प्रथम ओंकारस्वरूप व स्वसंवेद्य असणाऱ्या आद्य पुरुषाला वंदन केलेले आहे. गणेशाला नव्हे.
तथापि पुढे त्यांनी---
‘देवा तूची गणेशु, सकलार्थमतिप्रकाशु’
असेही म्हटलेले आहे. यात गणेशाचा स्पष्ट उल्लेख आलेला आहे. असे असले तरीही ज्ञानेश्वरांनी गणेशाला प्रथमत: वंदन केलेले आहे, हे मात्र दिसत नाही. प्रथम त्यांनी त्या एकमेवाद्वितीय परमेश्वरालाच वंदन करून पुढे त्या परमेश्वरालाच म्हटले आहे की, हे देवा परमेश्वरा, तुझ्याच ठायी सर्व एकवटले आहे. लोक ज्याला गणेश म्हणतात, तोही तूच आहेस. थोडक्यात, सामान्यांच्या गणेशालाही त्यांनी  त्या एकमेव ईश्वरातच पाहिले आहे. त्यांना वेगळा गणेश मानण्याची आवश्यकता पडलेली नाही.
ज्ञानेश्वरांनी स्पष्टपणे गणेशवंदन केले नसावे याला पुरावा खुद ज्ञानेश्वरीचाच देता येईल.
ज्ञानेश्वरीचा अध्याय १३, ओवी क्र. ८१५ ते ८२३ पहा. विविध देवदेवता यांचे पूजन करणाऱ्यांना त्यांनी ‘जाण अज्ञानाचा मूर्तु अवतार तो’ (अज्ञानाचा मूर्त अवतार) असेच म्हटले आहे. या ओव्यांमध्ये त्यांनी गणेशाचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे, तो पुढील प्रमाने.
त्यांच्या अज्ञानाच्या अवताराला उद्देशून त्यांनी म्हटले आहे—“ चौथ मोटकी पाहे, आणि गणेशाचाची होये.”
असे आहे तर, ज्ञानेश्वरांनी दुरान्वयाने तरी गणेशाचा प्रथम उल्लेख का केलेला आहे, हा प्रश्न आहेच. गणेशाला वंदनच कारायाचे नाही, तर त्याचा उल्लेखच का केला?
याचेही उत्तर पुढीप्रमाणे देता येईल.—
ज्ञानेश्वरांच्याकाळी प्रथम गणेशवंदन करणे पूर्णपणे रूढ झालेले होते. त्या काळच्या बहुतेक सर्व ग्रंथकारांनी आपल्या ग्रंथारंभी गणेशवंदन केलेले आहे.
थोडक्यात, परंपरा व लोकमत तर गणेशवंदनाच्या बाजूने. ज्ञानेश्वर तर लिहितात भगवद्गीतेवरील भाष्य. भगवद्गीता तर अनन्य भक्तीचा आग्रह धरते.
ज्ञानेश्वरांनी वरील परिस्थितीतून मार्ग काढला. प्रथम वंदन केले आद्यपुरुष परमेश्वराला आणि त्या परमेश्वराच्या ठायीच गणेशाला कल्पून गणेशवंदनाचाही आभास निर्माण केला.
अशाप्रकारे ज्ञानेश्वरांनी लोकभावना व परंपरा या विषयी आदर दाखवून भगवद्गीतेच्या तत्त्वांशीही सुसंगती प्रस्थापित केली.
ज्ञानेश्वर मुळात बंडखोर नव्हतेच. ते एक समन्वयवादी संत होते. त्यांना परंपरा सांभाळत, सांभाळत समाजाचेही प्रबोधन करायचे होते. त्यांच्या ज्ञानेश्वरीत याचा सातत्याने प्रत्यय येतो.
“ज्ञानेश्वरीतील गणेशवंदन” हा देखील ज्ञानेश्वरांच्या समन्वयवादाचा पुरावाच मानता येईल. 

Saturday 7 September 2013

आज चक्रधर जयंती. आजही महाराष्ट्राला चक्रधरस्वामीबद्दल फारशी माहिती नाही.
त्यांचा परिचय आपण त्यांच्या काही वचनांवरून व त्यांच्या काही कृतीवरून करून घेउयात.
समता --- ब्राह्मण म्हणिजे श्रेष्ठ अन मातंग म्हणिजे कनिष्ठ . परी तोही मनुष्यदेहची असे . परि वृथा कल्पना करी.
स्त्रीपुरुष समता ---- पुरुषाचा जीव अन स्त्रियाचा काई जीउलिया ? थोडक्यात, स्त्रीपुरुष एकाच चैतन्याने युक्त आहेत . त्यात लिंगभेद असू शकत नाही.
मानवता ---१) मनुष्य मात्र होवोनी असावे. थोडक्यात , जात, धर्म, वर्ण, श्रीमंत, गरीब इत्यादींचा विचार न करता प्रत्येक माणसात फक्त मनुष्यत्व पहावे.
वैज्ञानिक दृष्टीकोन--- रज कालावधीत स्त्रियांना अस्पृश्य समजण्याचे कारण नाही. कारण नाक, कान,मुख इत्यादी शरीराद्वारावाटे वाहणाऱ्या मळाप्रमाणे तोही एक मळच आहे.
२) गाय म्हणिजे पवित्र अन सुने (कुत्रे) म्हणिजे अपवित्र . परी तोही पशुदेहची अन वृथा कल्पना करी . गायीच्या पावित्र्याबद्दल प्रश्न उपस्थित करण्याचा उद्देश नसावा. परंतु कुत्रे अपवित्र का?
स्वातंत्र्य ----- स्वातंत्र्य हा मोक्ष , पारतंत्र्य हा बंध . आपण कवनाचे अधीन होऊ नये . तसेच आपल्या अधीन कोणाला करू नये.
प्रयत्नवाद ---- १) यत्ने न पाविजे ऐसे काई असे ? अर्थात - प्रयत्नाने मिळणार नही असे काही नाही.
२) पडे तव धावावे, अन मरे तव करावे .
कृती ---
१) दाकोबा नावाच्या शुद्र व्यक्तीला मठात घेतले . आपल्या शिष्याकरवी त्याचे पाय धूऊन घेतले . स्वत:च्या पंक्तीत बसवून घेऊन सोबत जेवण घेतले.
२) मातंगाने दिलेला लाडू प्रसाद म्हणून आपल्या सोबतच्या ब्राह्मणांना वाटला अन त्यांना खायला लावला.
३) अंधश्रद्धा , रूढी , धार्मिक कर्मकांड इत्यादींचा नि:संदिग्धरित्या विरोध केला.
४) सर्वसामान्य लोकांसाठी मराठीचा आग्रह धरला . आणि मराठी भाषेत एक स्वतंत्र , सुव्यवस्थित, सुसंगत , तत्त्वज्ञानाच्या बहुतेक सर्व अंगांना कवेत घेणारे , आचाराशी सुसंगत आणि मराठीतील एकमेव दर्शन शास्त्र निर्माण केले.

चक्रधरस्वामींनी आपले अंतिम ध्येय मोक्षच मानले असले तरी त्या ध्येयाप्रत जाण्याचा त्यांचा मार्ग हा सामाजिक सुधारणेच्या, वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या, सामाजिक समतेच्या व मानवतेच्या मैदानावरूनच जातो. अन्यथा साधकाला आपले ध्येयच गाठता येणार नाही.
स्वामींच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्याविषयी अपार कृतज्ञता व्यक्त करून त्यांना अनंत दंडवत करतो.
नोट -- सुलभतेसाठी स्वामींच्या वचनाच्या भाषेत अनेक ठिकाणी बदल केलेले आहेत.
Like ·  · Promote ·