Saturday 29 June 2013

मोह आणि संयम यांचा अगदी जवळचा संबंध आहे. मोहाला बळी न पडण्यातूनच संयम सिद्ध होतो. आणि संयमानेच मोहावर नियंत्रण मिळविता येते.
भारतीय तत्त्वज्ञांनी संयम हा जीवनाचा आधार मानलेला आहे.
आधुनिक काळात, निसर्गाच्या शोषणाचा अतिरेक झालेला आहे. तसेच त्यातून पर्यावरणाच्या प्रदूषणाची भयावह समस्या निर्माण झालेली आहे.
मानवी जीवनाचे अस्तित्व टिकविण्यासाठी आणि आपल्या पुढील पिढ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आजही संयमाचे महत्त्व   पुर्विइतकेच , नव्हे, पुर्विपेक्षाही अधिक आहे , यात शंका ती कोणती.  

Wednesday 26 June 2013

प्रेम आणि त्याग हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जिथे खरे प्रेम आहे, तिथे निरपेक्ष त्याग अनिवार्यपणे असतोच . आणि त्याग ही भावना  प्रेमाचीच निष्पत्ती असते. म्हणूनच तथाकथित प्रेम प्रकरणात होणारा छळ खऱ्या प्रेमाचा निदर्शक नसतो.
मग खरे प्रेम कुठे असते ? आध्यात्मिक तत्त्वज्ञानुसार खरे प्रेम ईश्वराजवळ असते. तसे असेल तर त्या ईश्वरीय प्रेमाचा पृथ्वीवरील अवतार म्हणजे आईचे प्रेम होय. 

Tuesday 25 June 2013

कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांची आज जयंती . महाराजांची जयंती महाराष्ट्रामध्ये ''सामाजिक न्याय दिन '' म्हणून साजरी केल्या जाते.

महाराष्ट्राच्या  शिल्पकारांपैकी महाराज एक महान शिल्पकार होते. आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत महाराजांचे फार मोठे योगदान आहे, यात शंका नाही.

जनतेच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सामान्य जनतेमध्ये  शिक्षणाचा प्रसार होणे आणि प्रत्येकाला सामाजिक प्रतिष्ठा मिळणे आवश्यक आहे, हे त्यांनी ओळखले. त्यासाठी त्यांनी शिक्षण प्रसाराला विशेष महत्त्व दिले. नवीन शाळा काढणे , अशा कृतींना सक्रिय प्रोत्साहन देणे, विद्यार्थ्यांसाठी वसती गृहे काढणे, आरक्षणाची तरतूद करणे  या मार्गांनी त्यांनी शिक्षण प्रसाराचे काम केले.

सामाजिक समता निर्माण झाल्याशिवाय उपेक्षीतांकडून  संधींचा   योग्य प्रकारे वापर होऊ शकत नाही, हे त्यांनी ओळखले होते. त्यासाठी त्यांनी जातीयवाद, अस्पृशता या अपप्रवृत्तींविरुद्ध लढा दिला.तसेच त्यांनी  सामाजिक समतेसाठी कार्य करणाऱ्या चळवळींना पाठींबा आणि    आवश्यक वाटल्यास सक्रिय मदत केली.

महाराजांचा या निमित्ताने  ''आर्य समाज'' तसेच ''सत्यशोधक समाज'' या सामाजिक संघटनांशी घनिष्ठ संबंध आला . यातूनच महाराज आर्य समाजाचे की सत्यशोधक  समाजाचे यावर विद्वानांमध्ये वादही झाला किंवा होत आहे.

उघड उघड त्यांनी स्वत:ला आर्यसमाजाचे म्हणवून घेतले. परंतु स्वत:च्या कृतींनी सत्यशोधक समाजाला सक्रिय पाठींबा दिला.   थोडक्यात सांगावयाचे झाल्यास, जिथे जिथे सुधारणा तिथे तिथे महाराज , हेच खरे .

महाराजांच्या जयंती निमित्ताने त्यांना अनंत अभिवादन . 

Tuesday 4 June 2013

दु;खितांना , पीडितांना  मदत करा , त्यांच्यावर दया दाखवा , असे सर्वच धर्म सांगतात . तथापि त्यांच्या जागेवर जाऊन त्यांच्या दु:खांशी समरस होऊन त्यांच्या वेदना समजावून घ्या, असे किती धर्म सांगतात?  दया दाखविण्यामध्ये- दुखितांमध्ये व दया दाखविणाऱ्यामध्ये एक अंतर सुचित होते.एक भेद तयार होतो.  दया घेणाऱ्यामध्ये उपकृततेची जाणीव व दया दाखविणाऱ्यामध्ये अहं भावाची भावना निर्माण होऊ शकते . प्रत्येक माणसाला सुजीवन जगण्याचा हक्क आहे. आपण त्यांना त्या हक्काची जाणीव फक्त करून देत आहोत आणि तो हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहोत , आणि ते आपले कर्तव्य आहे,  अशी जाणीव मदत करणाऱ्याने  ठेवली पाहिजे. 

Monday 3 June 2013

जगातील सर्व प्रकारच्या संघर्षांमध्ये भूमिका संघर्ष अध्याहृत असतो. आपण जर समोरच्या व्यक्तीच्या भूमिकेशी समरस झालो किंवा तिच्या भूमिकेत जाऊन विचार करू लागलो तर जगातील अर्ध्याहून अधिक संघर्ष निरर्थक ठरतील. थोडक्यात, जगातील बव्हंश संघर्ष हे भूमिकासंघर्ष असावेत, असे वाटते.