Friday 12 April 2013

समान उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठी आपापसांमध्ये  समन्वय साधत साधत उद्दिष्टांप्रत जाण्याची प्रक्रिया म्हणजे "संघटन" होय. 
 
उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपल्या सर्वांच्या पुढील समस्या आणि सर्वांच्या नेमक्या गरजा काय आहेत, हे ओळखून त्यांच्या आकलनासाठी आपल्या सदस्यांना मदत करतात, ते संघटनेचे नेते असतात. 
 
संघटनेचा व संघटना सदस्यांचा स्वाभिमान कायमपणे जागृत ठेवणे , तसेच अचूक उद्दिष्टे अभ्यासासाहित वरिष्ठांपुढे मांडणे व त्यांचा ठामपणे पाठपुरावा करणे ,गरज पडल्यास करावयाच्या संघर्षाचे सुयोग्य व्यवस्थापन करणे, हे  नेत्यांचे कार्य आहे. 
 
सर्व संघटना सदस्यांना विश्वासात घेणे ,ही संघर्षाची पूर्वावश्यकता  आहे, हे नेत्यांनी कधीही विसरता कामा नये.
 
संघर्ष करताना,  ध्येयावरील अचल दृष्टी व अढळ निष्ठा, प्रश्नांची अभ्यासपूर्ण मांडणी , सदस्यांना कायम संपर्कात व सोबत ठेवणे , संघर्षाचे नियोजन, डावपेच व ठामपणा , या बाबी नेत्यांसाठी पर्यायाने उद्दिष्टसिद्धीसाठी महत्त्वाच्या असतात , हे सांगायला नकोच. 
 
तथापि आपले नेते वरीलप्रमाणे काम करतात काय , याकडे सातत्याने लक्ष्य ठेवणे हे त्यापेक्षाही  महत्त्वाचे आहे, हे आपल्याला मान्य केलेच पाहिजे.  

Thursday 11 April 2013

उदार अर्थव्यवस्था ही आर्थिक विकास करण्यासाठी प्रत्येकाला समान संधी उपलब्ध करून देते , हे खरे आहे ; तथापि या संधीचा उपयोग करण्यासाठी प्रत्येकजण पुरेसा समर्थ व स्वतंत्र आहे  काय,याचाही  विचार करणे  आवश्यक  आहे.

प्रत्येकजण तसा समर्थ  आणि स्वतंत्र नसेल तर , त्या प्रत्येकाला तसे बनविण्यासाठी तथाकथित उदार अर्थव्यवस्था काय करू शकेल, हा मोठा प्रश्न आहे . 

Tuesday 9 April 2013

         
आपल्या सुखाला सुरक्षित ठेवायचे असेल तर , आपल्या अवती भवती देखील सुख कसे निर्माण होईल व ते कसे टिकून राहील , याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे . 
 
कारण - दारिद्र्य  व दु: खाच्या  महासागरात आपण सुख- समृद्धीची बेटे तयार करू शकत नाहीत आणि ती टिकवूही शकत नाहीत . 
 
दारिद्र्य व दु:खाचा महासागर त्यास केंव्हा गिळंकृत करील , हे कधीही सांगता येणार नाही.  

 

Monday 8 April 2013

ईश्वर सत्य आहे की कल्पना आहे ,या वादात पडण्यात अर्थ नाही. कारण अशा वादाला शेवट नसतो . ईश्वर तर्काने किंवा प्रत्यक्ष सिद्ध होतो किंवा नाही , यावर आस्तिकांचा देवावरील विश्वास अवलंबून नसतो . 
 
ईश्वर म्हणजे सृष्टीमधील संतुलनाचे तत्त्व , असा एक विचार मांडता येईल. त्याला विश्वात्मक चैतन्य असेही संबोधता येईल. सृष्टीचे संतुलन राखणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आणि आवश्यकता आहे. कारण त्याच्याशी आपल्या अस्तित्वाचा प्रश्न निगडीत आहे. 
 
या संतुलनाचे दोन पैलू आहेत . एक म्हणजे भौतिक सृष्टीचे संतुलन तर दुसरे म्हणजे मानवी वर्तनाचे संतुलन .पर्यावरणीय संतुलन  हे भौतिक सृष्टीच्या संतुलनाचे उदाहरण मानता येईल . मानवा-मानावांमधील अंतर-क्रिया अर्थात मानवी वर्तन यांचे संतुलन हा सृष्टीच्या संतुलनाचा दुसरा महत्त्वाचा पैलू आहे . 
 
एकमेकाशी चांगले वागल्यामुळे मानवी वर्तनामध्ये संतुलन निर्माण होते तर वाईट वागल्यामुळे हे संतुलन बिघडते . तथापि चांगले वागणे म्हणजे काय हा एक मोठा प्रश्न आहे.  जगातील तत्त्वज्ञांमध्ये यावर गहन चर्चा चालू असते . परंतु ढोबळ मानाने -आपल्या ज्या कायिक-वाचिक-मानसिक कृत्यांमुळे आपल्यामध्ये किंवा इतरांमध्ये दुख:निर्माण न होता सुखच निर्माण होते त्या कृत्यांना चांगली कृत्ये असे म्हणता येइल. येथे तत्कालीन सुख- दु:खापेक्षा दीर्घकालीन सुख-दु:ख अर्थात हिताहित गृहीत धरले अहे. 
 
दुसरा एक ढोबळ मानदंड आपण मानत असतो . मानवी जीवनासंबंधी निरपेक्षपणे मार्गदर्शन करणारे संत , महापुरुष यांचा उपदेश हाच तो मानदंड होय . त्यांनी ज्या पद्धतीने वागण्यास सांगितले आहे किंवा ते जसे जगले आहेत , तसे किंवा त्यासारखे किंवा त्यांच्याशी सुसंगत वागणे किंवा जगणे म्हणजे चांगले वागणे , असे आपण सर्वसाधारणपणे मनात असतो. 
 
हे तर नक्की की, वरील महापुरुषांचा उपदेश हा सृष्टीचे संतुलन टिकविणारा होता असे ढोबळ मानाने मानता येते. थोडक्यात, चांगले वागणे आणि सृष्टीसंतुलन यांचा काहीतरी संबंध आहे , असे मला वाटते. माणसाचे चांगल्या वागण्याचे निदर्शक ठरणारे सद्गुण पूर्ण स्वरुपात कोणत्याही व्यक्तीमध्ये असणे संभवत नही. म्हणूनच प्रगल्भ माणसाने या सर्व सद्गुणांचा मूर्तिमंत अविष्कार म्हणजे ईश्वर, अशी कल्पना केली असली पहिजे. म्हणूनच अशा सर्व सद्गुणांची आराधना म्हणजेच असे सद्गुण आपल्यामध्ये बिम्बाविण्याची साधना म्हणजेच ईश्वरार्चना होय . 
 
पुर्णस्वरुपातील सद्गुणांचा समुच्चय असणाऱ्या ईश्वरासारखे बनणे तर शक्य दिसत नाही . तथापि तो व आपण यामधील अंतर तर कमी करणे आपल्या हातात आहे . 
 
असे केल्याने विश्वात्मक संतुलन कायम राहील आणि त्यामुळे माणसाच्या सुखाचाही मार्ग मोकळा होइल. 
 

Friday 5 April 2013

सर्वसामान्य  लोकांना आपले हित कशात आहे  किंवा आपले ध्येय काय असायला हवे हे कळत नाही . जी व्यक्ती सर्वसामान्य  लोकांना त्यांचे हित समजावून सांगते आणि त्याकडे प्रवृत्त करते तीच व्यक्ती खरा नेता असते . लोकमताच्या लाटावर स्वार होणारी व्यक्ती खरा नेता असू शकत नाही .

आपल्या देशाची खरी समस्या नेतृत्वाची आहे ,हे आपण समजून घेतले पाहिजे .
 
चांगले  वागने  ही  एक  अतिशय  सोपी  गोष्ट आहे . ती  अतिशय आनंददायक देखिल आहे . तथापि चांगले वागण्याची चव आपल्याला कळली (realise) पाहिजे .